सणासुदीच्या दिवसात गावात अंधार, निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उसळले लेंढार.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१६/१०/२०२३

पाचोरा तालुक्यातील वडगाव आंबे गृप ग्रामपंचायतीचा कार्यकाळ संपल्यानंतर मागील जानेवारी २०२३ पासून ग्रामपंचायतीचा कारभार प्रशासकांच्या हातात असून प्रशासकीय अधिकारी धस साहेब व ग्रामसेवक म्हस्के हे कामकाज पहात आहेत. परंतु या प्रशासकीय काळात ग्रामस्थांना अनेक समस्या व अडचणींचा सामना करावा लागत आहे.

गावातील एक्वा फिल्टर नावालाच उरला आहे. तसेच गावातील सांडपाण्याच्या गटारीची साफसफाई केली जात नसल्याने गटारींचे पाणी वाहून न जाता ठिकठिकाणी डबके साचले आहेत. तसेच गटारी तुडुंब भरल्यामुळे हे सांडपाणी रस्त्यावरुन वाहत आहे. यामुळे गल्लीबोळात चिखल व डबके साचले असल्याने डासांची उत्पत्ती झपाट्याने वाढत चालली असून ग्रामस्थांना डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. सद्यस्थितीत सगळीकडे डेंग्यू सक्रिय झाला असल्याने गावात जंतुनाशक फवारण्या करणे गरजेचे आहे. मागील काही महिन्यांपासून गावातील अर्ध्याच्यावर स्ट्रीट लाईट (पथदिवे) बंद असल्याने ऐन सणासुदीच्या दिवसात गावात अंधार पडला आहे. नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने महिलांना दांडीया खेळण्यासाठी अडथळा निर्माण झाला आहे. गावात दिवसेंदिवस अतिक्रमण झपाट्याने वाढत चालले असल्याने ग्रामस्थ हतबल झाले आहेत.

या वरील समस्या सोडविण्यासाठी ग्रामस्थांनी वारंवार मागणी करुनही प्रशासकीय अधिकारी धस साहेब व ग्रामसेवक म्हस्के हे गावकऱ्यांना फक्त आश्वासन देऊन दिवस काढत आहेत. यामागील मुख्य कारण म्हणजे गावातील आजी, माजी पदाधिकारी आम्ही या गावचे नाहीत अश्या पध्दतीने वागत असल्याचे दिसून येते त्यांना गावातील समस्या सोडविण्यासाठी काही देणेघेणे नसल्यासारखे वागत असल्याने प्रशासकीय अधिकारी धस व ग्रामसेवक म्हस्के यांना कोणीही काहीही बोलण्यास तयार नसल्याने धस साहेब व ग्रामसेवक म्हस्के यांनी मनमानी कारभार सुरु केला आहे.

‘महत्वाचे’
गावातील समस्या सोडविण्यासाठी पदांची गरज नसते तर त्याकरिता गावाविषयी व गावातील नागरिकांविषयी आपुलकी पाहिजे असते एक म्हण आहे (गाव करील ते राव काय करील) परंतु गावकऱ्यांचे कुणीही ऐकून घेत नाही व आजी, माजी पदाधिकारी बिनधास्तपणे नव्याने होऊ घातलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत उमेदवारी करण्यासाठी उडी वर दुडी मारतांना दिसून येत आहेत. यामुळे “सणासुदीच्या दिवसात गावात अंधार, निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उसळले लेंढार” असे म्हटले तर ते नक्कीच वावगे ठरणार नाही ऐवढे मात्र खरे.

ब्रेकिंग बातम्या