पाचोरा व जामनेर तालुक्यात अनाधिकृत धर्मस्थळांची निर्मिती, धार्मिकतेचा आधार घेत लाखोंचा चुराडा.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०४/०१/२०२३
पाचोरा तालुक्यातील बऱ्याचशा गावातून धार्मिकतेचा आधार घेत नवनवीन धर्मस्थळांची निर्मिती केली जात असून ही धर्मस्थळे उभारण्यासाठी लोकवर्गणीच्या माध्यमातून लाखो रुपये जमा करुन त्या पैशांचा योग्य पध्दतीने वापर होत नसल्याने तसेच जमाखर्चाचा हिशोब व्यवस्थीत ठेवला जात नसल्याने काही ठिकाणी ही धर्मस्थळे निर्मिती करतांना अपहार होत असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की पाचोरा तालुक्यातील काही गावांमध्ये धर्मसळ निर्मिती करण्यासाठी लागणाऱ्या परवानग्या तसेच इतर कायदेशीर कोणत्याही पुर्तता न करताच स्वमालकीच्या किंवा सार्वजनिक जागेवर अनाधिकृतपणे ताबा घेऊन धार्मिकतेचा आधार घेत लाखो रुपये लोकवर्गणीतून आपापल्या सोयीनुसार वेगवेगळ्या धर्मस्थळांची निर्मिती केली जात असून अश्या या अनाधिकृतपणे निर्माण केलेल्या धर्मस्थळांच्या ठिकाणी मान्यवर, प्रतिष्ठत तसेच काही पदाधिकारी आपापल्या कार्यकर्त्यांना खुश करण्यासाठी हजेरी लावतात व मोठ्या प्रमाणात देणग्या देत असल्याने यात अजूनच भर पडत आहे.
विशेष म्हणजे या धर्मस्थळांची निर्मिती झाल्यानंतर ताबा घेत त्या ठिकाणी पुजारी, भगत बनुन अंधश्रद्धा जोपासत नवस बोलणे, नवस फेडणे, भूतबाधा, करणी, कवटाळ, शारीरिक किंवा प्रापंचिक समस्या सोडविण्यासाठी, धनप्राप्ती किंवा संतान प्राप्ती साठी गरजूंना हाताशी धरून या समस्यांवर उपाय व तोडगा करण्यासाठी नवस करणे, नवस फेडण्यासाठी बोकड बळी, कोंबड्याचा बळी देणे, तावीत, गंडा, दोरा करणे, मंत्रोच्चारात रिंगण भारणे, भानामती, असे विविध गैरप्रकार केले जातात.
विशेष म्हणजे ज्यांना काही शारीरिक व्याधी आहेत किंवा मुलबाळ होत नाही अश्या गरजूंना एकांतात नेऊन विवस्त्र अवस्थेत अंघोळ घालणे अश्या विकृत विधी केल्याजात आहेत. यातुनच महिलांचे विनयभंग, शोषण, बलात्काराच्या घटना बऱ्याचशा ठिकाणी घडल्या आहेत. म्हणून ही अनाधिकृत निर्माण केली जाणारी धर्मस्थळे म्हणजे अंधश्रद्धा वाढीसह भोळ्याभाबड्या जनतेच्या भावनांचा फायदा घेऊन लाखो रुपये कमाईचे अड्डे बनू पहात आहेत.
म्हणून संपूर्ण पाचोरा व जामनेर तालुक्यातील अश्या अनाधिकृत धर्मस्थळांची व त्या, त्या ठिकाणी ठाण मांडून बसलेल्या भोंदू बाबांची व पुजाऱ्यांची चौकशी व्हावी अशी मागणी सुज्ञ नागरीकातून केली जात आहे.