जारगाव चौफुली जवळ आगीचे तांडव, आग लागली की लावण्यात आली ?
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२७/०५/२०२२
पाचोरा शहरातील जारगाव चौफुली जवळ एका स्वमालकीच्या जागेवर आज अचानकपणे आग लागली आहे. ही आग इतकी भयवाह होती की या आगीचे रुद्र रुप पाहून या परिसरातील नागरिक भयभीत झाले होते. तसेच पाचोरा शहरातील कानाकोपऱ्यातून या आगीचे डोंब दिसून येत असल्याने सगळ्यांनी जारगाव चौफुलीकडे धाव घेतली व सत्य परिस्थिती जाणून घेण्यासाठी प्रयत्न केला.
याबाबत सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी प्रयत्न केला असता असे समजले की जारगाव चौफुली परिसरातील ज्या जागेवर अचानकपणे आग लागली ती जागा आत्ताच काही दिवसांपूर्वी कुणीतरी १६ कोटी रुपये देऊन विकत घेतली आहे. तसेच ही जागा बऱ्याचशा वर्षांपासून याच परिस्थीतीत असतांना आजपर्यंत कधीच येथे आग लागली नाही. परंतु या जागेची विक्री झाल्याबरोबर आग लागणे हा प्रकार वेगळाच असल्याचे जनमानसात चर्चेत आहे.
कारण या जागेची साफसफाई करण्यासाठी अनेक अडचणी व मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागणार होता. म्हणून जागा ताब्यात घेतांना येणारे अडथळे व कमी खर्चात जागेची साफसफाई करण्यासाठी आग लावण्याचा नामी उपाय वापरला गेल्याची चर्चा येथे जमलेल्या जनतेतून ऐकावयास मिळत आहे.
परंतु या आगीमुळे या परिसरातील झाडे, झुडपे जळुन खाक झाल्यामुळे निसर्ग संपत्ती व यावर आश्रयाला असलेले पक्षी नष झाल्यामुळे निसर्गप्रेमी व पक्षीप्रेमींनी संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत.