विद्यूत वितरणचे कर्मचारी चारतात उंटावरून शेळ्या, विद्यूत ग्राहक मात्र वाजवत बसतात टाळ्या.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०३/०४/२०२१
पाचोरा तालुक्यातील वडगाव अंबे, वडगाव अंबे खुर्द, वडगाव अंबे बुद्रुक, वडगाव जोगे तसेच कोकडी तांडा ही पाचही गावे वरखेडी येथील कनिष्ट अभियंता कार्यालयाचे कार्यक्षेत्रात येतात. तसेच या पाचही गावांचा विद्युत पुरवठा सुरळीत राहत नसून या पाचही गावांसाठी नियुक्त करण्यात आलेले विद्युत वितरण कंपनीचे कर्मचारी मुख्यालयात राहत नसल्याने विद्युत पुरवठ्यात तांत्रिक बिघाड होऊन विद्यूतपुरवठा खंडित झाल्यानंतर विद्युत ग्राहकांना संबंधित कर्मचारी येईपर्यंत वाट पाहावी लागते.तसेच कर्मचारी मुख्यालयात रहात नसल्याने विद्युतचोरी मोठ्या प्रमाणात सुरु असून या विद्युतचोरांवर कडक कारवाई होत नसल्याने विद्युतचोरी करणारे व विद्युतकर्मचारी यांचे काही साटेलोटे आहे का ? असा संशय येतो. याबाबतीत वरखेडी येथील कनिष्ठ अभियंता मा.श्री. चव्हाण यांच्याकडे वारंवार तक्रारी करुनही मागील दोन वर्षांपासून कोणत्याही सुधारणा झालेल्या नाहीत.
पाचोरा तालुक्यातील वरील पाच गावांसाठी दोन विद्यूतवितरण कंपणीच्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून ते मुख्यालयात राहत नसल्याने तसेच वरील पाचही गावात मोठ्या प्रमाणात विद्युत चोरी होत असल्याने वारंवार विद्युत पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. या कारणास्तव अधिकृत विद्युत ग्राहकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते यात विशेष म्हणजे पिठाची गिरणी बंद पडल्यावर गोरगरीब, हातमजुर लोकांना गिरणीवर दळुन मिळत नसल्याने उपाशीपोटी झोपावे लागते. तसेच दिवसेंदिवस उन्हाचा उकाडा वाढत असून वृद्ध लहान मुले व आजारी लोकांना विद्युत पुरवठा खंडित झाल्याने हवेचे पंखे बंद झाल्यावर दिवसा कुठेतरी झाडाझुडुपांखाली बसावे लागते तर रात्रीच्या वेळी विद्यूतपुरवठा खंडित झाल्यास डासांचा सामना करण्यासाठी टाळ्या टिपत बसावे लागते.विशेष म्हणजे शासनमान्य मिळणारे रॉकेल आता बंद झाल्याने अंधार झाल्यानंतर सायंकाळी स्वयंपाक करणे, दैनंदिन कामे करण्यासाठी खुपच अडचणी येतात. तसेच बऱ्याच विद्यार्थी ऑनलाइन शिक्षण पद्धतीने शिक्षण घेत असून संगणक किंवा मोबाईल रिचार्ज करण्यासाठी वेळेवर विद्यूतपुरवठा न मिळाल्याने त्यांना ऑनलाईन क्लासेस करता येत नाहीत. यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
महत्त्वाचे म्हणजे विद्यूतवितरणचे कर्मचारी मुख्यालयात रहात नसून त्यांनी कायमस्वरूपी मुख्यालयात रहावे म्हणून वडगाव अंबे ग्रामपंचायतीने विद्यूतवितरण कंपनीला वारंवार ठराव देऊनही वरिष्ठ पातळीवरून कोणतीही कारवाई न होता ग्रामपंचायतीच्या ठरावाला केराची टोपली दाखवल्याचे जानवते.वडगाव अंबे येथील टाकोणे नावाचे कर्मचारी पाचोरा येथे तर अविनाश राठोड हे पहूर येथून मनात येईल तेव्हा येतात व मनात येईल तेव्हा जातात तसेच नियमितपणे मुख्यालयात येत नसून काही तांत्रिक बिघाड झाल्यावर एखाद्या झिरो वायरमनला हाताशी धरून फोनवर सुचना देत काम करुन घेतात म्हणजेच विद्यूतवितरण कंपणीच्या कर्मचाऱ्यांनी मुख्यालयाचे गावी रहावे असा नियम असल्यावरही हे (उंटावरून शेळ्या चारतांना)दिसून येतात.
याबाबत जनमानसातून मिळालेल्या माहितीनुसार पाचोरा कार्यालयातील एक राठोड नावाचे वरिष्ठ अधिकारी अविनाश राठोड यांची पाठराखण करतात तसेच अविनाश राठोड यांची बढती झालेली असल्याने त्यांना त्यांच्या बढती प्रमाणे जागेवर नियुक्त करणे क्रमप्राप्त असतांनाही फक्त आणि फक्त विद्यूतवितरण कंपणीच्या वरिष्ठांच्या डोळ्यात धूळफेक करुन सोयीचे जागी राहून जनतेला वेठीस धरले जात असल्याचे बोलले जात आहे.
महत्त्वाचे = एखाद्या वेळेस जिर्ण झालेली विद्यूतवाहीनी तुटल्याने किंवा मोठ्या प्रमाणात तांत्रिक बिघाड झाल्यानंतर जर संबंधित कर्मचारी यांच्याकडून लवकरात लवकर मदत न मिळाल्यास एखाद्या कठीण प्रसंगाला सामोरे जाऊन जिवीतहानी होण्याची शक्यता असल्याने संबंधित विद्यूतवितरणच्या कर्मचाऱ्यांना मुख्यालयातच रहाण्यासाठी सुचना द्याव्यात व अविनाश राठोड यांची त्वरित बदली करण्यात यावी अशी मागणी पंचक्रोशीतील विद्यूत ग्राहकांनी केली आहे.
तसेच आतापर्यंत ज्यांनी, ज्यांनी या विषयावर आवाज उठवण्याचा प्रयत्न केला त्यांना संबंधित व संघटीत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काहीना काही निमित्ताने कायद्याच्या कचाट्यात पकडून तोंड दाबण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे. तरी वरिष्ठ पातळीवरुन चौकशी होऊन कामचुकार कर्मचाऱ्यांची त्वरित बदली होणे अपेक्षित आहे.