पिंपळगाव हरेश्वर व वरखेडी परिसरात कारवाईचा धाक दाखवून हप्ते घेणारा तो दारुबंदी अधिकारी कोण ?
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१९/०८/२०२३
सद्यस्थितीत एकाबाजूला जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मा. श्री. आयुष प्रसाद साहेबांनी अवैध दारुबंदीसाठी कडक आदेश काढले आहेत. या आदेशाचे पालन करत जळगाव दारुबंदी विभागाने ज्या, त्या विभागातील पोलिसांची मदत घेत गावठी दारुची निर्मिती व विक्री करणाऱ्यांवर धाडसत्र राबवून दोन दिवसांतच गावठी दारु बनवण्यासाठी लागणारे हजारो लिटर कच्चे रसायन व पक्की दारु नष्ट करत जवळपास १५० अवैध दारु व्यावसायिकांवर कारवाई केली आहे. तसेच पिंपळगाव हरेश्वर पोलीसांनी गावठी दारुच्या विरोधात धडक कारवाई सुरु केली आहे. या कारवाईचे जळगाव जिल्ह्यातील सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे. विशेष करुन महिलावर्ग कमालीचा आनंदीत झाला असून त्यांनी जिल्हाधिकारी मा. श्री. आयुष प्रसाद साहेबांचे आभार मानले आहेत.
तर दुसरीकडे आज दिनांक १९ ऑगस्ट २०२३ शनिवार रोजी दुपारी पाचोरा तालुक्यातील वरखेडी, शिंदाड, पिंपळगाव हरेश्वर परिसरात एक व्यक्तीने मी अधिकारी आहे असे सांगून अवैध दारु व्यावसायिकांच्या अड्ड्यावर, घरी व हॉटेलमध्ये जाऊन हप्ते जमा केले असल्याचे खात्रीलायक वृत्त सत्यजित न्यूजच्या हाती लागले आहे. तसेच या हफ्ते जमा करणाऱ्या व्यक्तीविषयी जोरदार चर्चा सुरु आहे. याबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी प्रयत्न केला असता एका अवैध दारु व्यावसायिकाने सांगितलेली माहिती अशी की आम्ही आजपर्यंत हप्ते देऊन आमचा व्यवसाय करत होतो. म्हणून आजही आम्ही नियमितपणे हप्त्याची रक्कम दिली आहे. मात्र आम्ही तुम्हाला माहिती सांगितली हे उघड होऊ देऊ नका कारण “पाण्यात राहून माशाशी वैर” करता येत नाही असे मत व्यक्त केले.
असे असले तरी एकाबाजूला मा. श्री. जिल्हाधिकारी साहेब संपूर्ण जिल्ह्यात दारूबंदी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत तर दुसरीकडे हप्ते घेणारा हा अधिकार कोण ? असा प्रश्न उपस्थित केला जात असून तसेच हा खरच दारुबंदी अधिकारी आहे कि कोणी तोतया अधिकारी आहे याचा तपास होऊन कारवाई करण्यात यावी अशी मागणी सुज्ञ नागरिकांनी केली आहे.