कुऱ्हाड बुद्रुक गावात विद्युत चोरांची चंगाळ तर विद्युत ग्राहकांना मंगळ, कारवाईची मागणी.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२५/०३/२०२३
पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड खुर्द व कुऱ्हाड बुद्रुक गावात विद्युत वाहिनीवर आकोडे टाकून मोठ्या प्रमाणात विद्युत चोरी सुरु असल्याने आकोडे टाकतांना व काढतांना विद्युत वाहिनीच्या तारांमध्ये घर्षण होऊन मोठमोठ्या ज्वाला निघून तांत्रिक बिघाड होतो व ट्रान्सफॉर्मर जवळीक कटआउट जळून जात असल्याने वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने अधिकृत विद्युत ग्राहकांना अनेक अडीअडचणींचा सामना करावा लागत असल्याने नियमितपणे विद्युत बिल भरणाऱ्या विद्युत ग्राहकांनी विद्युत वितरण कंपनीच्या गलथान कारभाराबाबत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
“विद्युत ग्राहकांची चंगळ तर विद्युत ग्राहकांना मंगळ”
एका बाजूला विद्युत वितरण कंपनीकडून अधिकृत विद्युत ग्राहकांकडून विद्युत बिलाच्या वसुलीसाठी तगादा लावला आहे. जे विद्युत ग्राहक बिल भरणा करत नाहीत त्यांचे वीज कनेक्शन बंद करत आहेत. तसेच थकित वीज बिलाच्या रकमेवर व्याज, दंड, मिटर भाडे आकारुन थकीत बिल वसुलीसाठी कायदेशीर कारवाई करत आहेत. तर दुसरीकडे कुऱ्हाड खुर्द व कुऱ्हाड बुद्रुक गावासह संपूर्ण तालुक्यात विद्युत वाहिनीच्या तारांवर आकोडे टाकून दिवसाढवळ्या विद्युत चोरी केली जात आहे. वीजबिल वसुलीसाठी कारवाई करण्याबाबत आमची कोणतीही हरकत नाही. परंतु आम्ही जर नियमितपणे विद्युत बिल भरत आहोत तर आम्हाला नियमितपणे विद्युत पुरवठा करणे ही विद्यूत वितरण कंपनीची जबाबदारी आहे असे मत विद्युत ग्राहकांनी व्यक्त केले आहे.
तसेच विद्युत वितरण कंपनीचे कर्मचारी कायमस्वरूपी मुख्यालयात रहात नसल्याने संध्याकाळनंतर कुऱ्हाड बुद्रुक व कुऱ्हाड खुर्द गावाचा विद्युतपुरवठा सहाय्यक कर्मचारी किंवा झिरो वायरमनच्या भरवशावर चालतो तसेच जबाबदार कर्मचारी मुख्यालयात रहात नसल्याने विद्युत वाहिनीच्या तारांवर आकोडे टाकून दिवसाढवळ्या मोठ्या प्रमाणात विद्युत चोरी सुरु आहे. कधी, कधी या विद्युत चोरीला आळा घालण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून कारवाई केली जाते मात्र ही कारवाई करतांना स्थानिक कर्मचारी हे मर्जीतल्या विद्युत चोरट्यांना अगोदरच माहीत देतात व कारवाईचा फक्त देखावा दाखवून एखाद्या झोपडीत रहाणाऱ्या चोरट्यावर कारवाई करुन आपली पाठ थोपटून घेण्यासाठी व वरिष्ठांची मर्जी सांभाळण्यासाठी नाटक केले जाते अशीही माहिती कुऱ्हाड गावातील काही नागरिकांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सत्यजित न्यूजला दिली आहे.
“विद्युत पुरवठा सुरळीत न झाल्यास विद्युत बिल न भरण्याचा निर्णय”
विद्युत चोरी थांबवून आम्हाला नियमितपणे सुरळीत विद्युत पुरवठा न केल्यास आम्ही यापुढे एकही बिल भरणार नाहीत. तसेच आमचे कनेक्शन बंद केल्यावर आम्हीच आकोडे टाकून विज वापरण्याच्या विचारात आहोत कारण आम्ही अधिकृत विद्युत ग्राहक आहोत म्हणून आम्हाला कायदा दाखवला जातो, शिकवला जातो, दंडात्मक कारवाई केली जाते मात्र विद्युत चोरीकडे मुद्दामहून डोळेझाक केली जाते असा आरोप करत विद्युत चोरी करणारे व विद्युत वितरण कंपनीमध्ये कार्यरत असलेले काही कर्मचारी यांचे लागेबांधे असल्याचा आरोपही कुऱ्हाड बुद्रुक व कुऱ्हाड खुर्द येथील ग्रामस्थांनी केला आहे.