पंतप्रधान किसान सन्मान निधीसाठी शेतकऱ्यांची वणवण.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२८/०७/२०२३
काल राजस्थान येथुन एका क्लिकवर लाखो शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या चौदाव्या हप्त्याची २०००/०० रुपयांची रक्कम बँक खात्यावर जमा झाली. याबाबत आजुबाजुच्या शेतकऱ्यांकडून रक्कम जमा झाल्याचे समजल्यामुळे व ज्याच्याकडे मोबाईलवर संदेश आलेला नाही अशा प्रत्येक शेतकऱ्याने बँकेमध्ये जाऊन पडताळणी केली परंतु रक्कम जमा नसल्यामुळे शेतकऱ्यांनी तहशिल कार्यालयात संपर्क साधला परंतु तेथे गेल्यावर तहसील कार्यालयातील संबंधित विभागाकडून कार्यालयासमोर पंतप्रधान किसान सन्मान निधी मिळवून घेण्यासाठी तसेच अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी पाचोरा कार्यालयात संपर्क साधावा असा आदेश असलेला फलक दिसून आला.
हा फलक पाहिल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांनी पाचोरा तालुका कृषी अधिकारी कार्यालयात संपर्क साधुन अधिक माहिती जाणून घेतली असता शासनाच्या निर्णयानुसार आमच्या कार्यालयात अद्यापपर्यंत फक्त इ, के. वाय. सी. चे काम आलेले असले तरी या योजनेवर काम करण्यासाठी आवश्यक असलेली संकेतांक व कार्यप्रणाली प्राप्त झाली नसल्याचे सांगितले व यामुळे आम्ही याबाबत काहीही सहकार्य करु शकत नाही असे सांगितले.
यामुळे ऐन पावसाळ्याच्या दिवसात खते, फवारणीसाठी लागणारी औषधे व मजूरांना मजूरी देण्यासाठी पैशाची चणचण भासत असल्याने शेतकऱ्यांना तहसील कार्यालय ते कृषी कार्यालयात फेऱ्या माराव्या लागत आहेत. म्हणून शासनाने याबाबत त्वरित उपाययोजना करुन के. वा. सी. चे कामासोबतच कार्यप्रणाली सुरु करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी केली जात आहे.