एस. टी. च्या वाहक, चालकाच्या मनमानीमुळे, मालखेडा येथील सावित्रीच्या लेकींची शिक्षणासाठी सहा किलोमीटर पायपीट.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२९/०७/२०२३
(सोयगाव ते अमळनेर एस. टी. बसमध्ये दिवटीवर एक महिला वाहक (कंडक्टर) अधुनमधून येत असते ही महिला वाहक बसमध्ये जागा उपलब्ध असल्यावरही बस थांब्यावर बस थांबवत नाही व थांबवलीच तर ही महिला वाहक विद्यार्थ्यांना दमदाटी व शिवीगाळ करते अशी तक्रार मालखेडा येथील विद्यार्थ्यांनी केली असून अशा मगरुर महिला वाहकावर कारवाईची मागणी केली आहे.
जामनेर तालुक्यातील मालखेडा हे संपूर्ण बंजारा समाजबांधवांचे गाव असून या मालखेडा गावातील जवळपास सत्तर मुली ह्या शेंदुर्णी येथील आचार्य गजाननराव रघुनाथराव गरुड माध्यमिक व उच्च माध्यमिक महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी जातात. परंतु या मुलींना शाळा, कॉलेजमध्ये वेळेवर जाण्यासाठी व शाळा, कॉलेज सुटल्यावर वेळेवर घरी येण्यासाठी एस. टी. महामंडळाकडून वेळेवर बससेवा उपलब्ध करून दिली जात नसल्याने या सावित्रीच्या लेकींना रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांचा धोका पत्करुन उन, वारा व भरपावसात शिक्षणासाठी दररोज येऊन, जाऊन सहा किलोमीटरचा पायी प्रवास (पायपीट) करावी लागत आहे.
मालखेडा येथील शाळा, कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलींसाठी सकाळी मालखेडा येथून शेंदूर्णी जाण्यासाठी साडेदहा दहा वाजता व शेंदुर्णी येथून सायंकाळी परत येण्यासाठी पाच वाजता एस. टी. बस पाहिजे अशी मागणी या शाळकरी मुलींनी केली असून येत्या आठवडाभरात आमच्यासाठी आमच्या वेळेवर बससेवा उपलब्ध करुन न दिल्यास आम्ही पंधरा ऑगस्ट रोजी मालखेडा गावातील बसस्थानक परिसरात रस्ता रोको आंदोलन करणार असल्याचे सांगितले आहे.
विशेष बाब म्हणजे जामनेर, सोयगाव व पाचोरा आगाराच्या बसेस या रस्त्यावरून धावत असतात परंतु या एस. टी. बसचे वाहक (कंडक्टर) व चालक हे मनमानी करत बसमध्ये जागा उपलब्ध असल्यावरही मालखेडा बसस्थानकात तसेच परत येतांना आचार्य गजाननराव रघुनाथराव गरुड माध्यमिक व उच्च माध्यमिक महाविद्यालयात जवळ हात दाखवून सुध्दा एस. टी. बस थांबवत नाहीत. तसेच काही एस. टी. चे वाहक व चालक जोरजोराने हसत बस पळवून नेतात.
सोयगाव ते अमळनेर बस वरील महिला वाहक विद्यार्थीनींना करते शिवीगाळ.
************************************************************
मालखेडा येथील सावित्रीच्या लेकी वेळेवर शाळेत जाण्यासाठी व शाळेतून घरी परत येण्यासाठी रस्त्यावरुन येणाऱ्या एस. टी. बसेस थांबवण्यासाठी हात दाखवून बस थांबवण्यासाठी विनवण्या करतात मात्र या गोष्टींकडे संबंधित एस. टी. वाहक व चालक मुद्दामहून दुर्लक्ष करतात म्हणून ह्या विद्यार्थीनीं रस्त्यावर उभ्या राहुन बस थांबवण्यासाठी प्रयत्न करतात तेव्हा संबंधित वाहक व चालक भरधाव वेगाने बस पळवून नेतात यामुळे एखाद्यावेळेस मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या समस्येला वैतागून बऱ्याचशा मुलींच्या पालकांनी आपल्या मुलींना शाळा, कॉलेजमध्ये न पाठवण्याचा निर्णय घेतला असल्याने मुलींना शिक्षणापासून वंचित रहावे लागणार आहे. या बाबतीत मुलींच्या पालकांशी संवाद साधला असता सद्यस्थितीत सर्वदूर दररोज महिला व मुलींवर होणारे अत्याचार, अपहरण व वाईट घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याने आमच्या मुलींना एस. टी. महामंडळाकडून वेळेवर बससेवा उपलब्ध करुन दिली जात नसल्याने आमच्या मुली शाळा, कॉलेजमध्ये गेल्यावर त्या घरी येईपर्यंत आमचा जीव ठिकाणावर नसतो. परंतु मुली चार पुस्तक शिकुन स्वताच्या पायावर उभ्या राहिल्या पाहिजेत म्हणून आम्ही मुलींना शिकवत आहोत असे मत व्यक्त केले.