सिंधी कॉलनी परिसरातील पाचोरा ते जामनेर रस्त्यालगत, उद्घाटन न करताच कचरा डेपो सुरु.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०९/०७/२०२३
पाचोरा शहरातील सिंधी कॉलनी परिसरात पाचोरा ते जामनेर रस्त्यालगत मागील काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात असून या ठिकाणी कचऱ्याचे मोठमोठे ढीग तयार झाले असून या पाचोरा ते जामनेर रस्त्याला कचरा डेपोचे स्वरूप प्राप्त झाले असल्याने पाचोरा नगरपरिषदेने ही जागा कचरा डेपो करीता निवडली की काय अशी शंका निर्माण झाली आहे. तसेच पाचोरा नगरपरिषदेने जर ही जागा कचरा डेपो करीता निवडली असेल तर मग या ठिकाणी कचरा डेपो सुरु करण्याअगोदर पाचोरा सिंधी कॉलनी परिसरातील नागरिकांना याची पुर्व सुचना देऊन शानदार उद्घाटन करुन हा कचरा डेपो सुरू केला असता तर सिंधी कॉलनी परिसरातील रहिवाशांना अजूनच आनंद झाला असता अशी संतप्त प्रतिक्रिया या परिसरातील रहिवाशांनी व्यक्त केली जात आहे.
कारण पाचोरा शहरात स्वच्छता अभियान राबविण्यात येत असुन
सिंधी कॉलनी परिसरात दररोज सफाई कर्मचारी घराघरापर्यंत “घंटागाडी” घेऊन कचरा घेण्यासाठी येत असतात मात्र सिंधी कॉलनी परिसरातील नागरिक हे आपापल्या घरातील कचरा वेळेवर घराबाहेर काढून देत नसल्याने तसेच सफाई कर्मचारी निघून गेल्यानंतर घरातील कचरा हा पाचोरा ते जामनेर रस्त्यावर तसेच इतर सार्वजनिक ठिकाणी फेकुन देत असल्याने सिंधी कॉलनी परिसरात व समोरच असलेल्या राम नगर परिसरात ठिकठिकाणी उकीरडे तयार झाले असल्याने या परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले असून आता पावसाळ्याचे दिवस असल्याने हा कचरा ओला झाल्यामुळे सर्वदूर दुर्गंधी पसरली आहे.
“विशेष म्हणजे”
पाचोरा शहरातील कचरा व साफसफाई करण्यासाठी ठेकेदारांकडून काम करुन घेतले जात असल्याने संबंधित ठेकेदार हे लक्षपूर्वक काम करत नसल्याचा आरोप पाचोरा वासियांनी केला आहे. कारण पाचोरा शहरातील सिंधी कॉलनी परिसरातील कचरा संकलन करुन हा कचरा थेट कचरा डेपोच्या ठिकाणी नेऊन टाकणे गरजेचे आहे. परंतु संबंधित ठेकेदार हे सफाई कामगारांना कचरा वाहतुकीसाठी दररोज वाहन उपलब्ध करुन देत नसल्याने सिंधी कॉलनी परिसरातील संकलित केलेला कचरा हा काही दिवस पाचोरा ते जामनेर रस्त्यालगत टाकला जात असल्याने या रस्त्याला कचरा डेपोचे स्वरुप निर्माण झाले असल्याचे दिसून येत आहे.
या पाचोरा ते जामनेर रस्त्याच्या बाजूला मोठमोठे कचऱ्याचे ढीग तयार झाले असून या कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर दिवसभर मोकट गुरे व डुक्करे चरत असतात यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होऊन अपघात होतात. तसेच याच रस्त्यावरून गुरुकुल इंग्लिश मिडीयम स्कूलचे विद्यार्थी तसेच बाहेर गावाहून पाचोरा शहरात येणारा सर्वसामान्य नागरिकांना या उकिरड्यामुळे दुर्गंधीचा सामना करावा लागतो तसेच सिंधी कॉलनी व राम नगर परिसरातील रहिवाशांना या उकिरड्यामुळे निघणारी दुर्गंधी व किटकांचा त्रास सहन करावा लागत असून या दुर्गंधी पासून बचाव करण्यासाठी घरात दिवसभर सुगंधित अगरबत्तीचा वापर करावा लागत आहे.
टिप ~ सिंधी कॉलनी परिसरातील दररोज संकलित केला जाणारा ओला व सुका कचरा हा पाचोरा ते जामनेर रस्त्याच्या कडेला न टाकता हा कचरा दररोज संकलन करुन थेट नगरपरिषदेने ठरवून दिलेल्या कचरा डेपोमध्ये नेऊन टाकावा अशी मागणी सिंधी कॉलनी व रामनगर परिसरातील रहिवाशांनी केली आहे.
“प्रशासकीय कारभार, जनता बेजार”
सद्यस्थितीत पाचोरा नगरपरिषदेचा कारभार मागील वर्षापासून मुख्याधिकारी सौ. शोभाताई बाविस्कर ह्या प्रशासकीय अधिकारी म्हणून पहात आहेत. परंतु संबंधित प्रशासकीय अधिकारी हे पाचोरा मुख्यालयात रहात नसून बाहेर गावाहून येऊन, जाऊन नगरपरिषदेचा कारभार पहात असल्याने पाचोरा नगरपरिषदेचा कारभार हा (अंधार बोले क्या होता, बहिरा बोले ब्याह होता) अश्या पध्दतीने सुरु असल्याचे दिसून येत असल्याने पाचोरा वासियांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.