मालखेडा, कोकडी तांडा, वडगाव जोगे, अंबे वडगाव शिवारात बिबट्याची दहशत.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१३/०२/२०२२
जामनेर तालुक्यातील मालखेडा तसेच पाचोरा तालुक्यातील कोकडी तांडा, वडगाव जोगे, अंबे वडगाव शेत शिवारात तसेच मालखेडा राखीव जंगलात मागील एक महिन्यापासून बिबट्याने धुमाकूळ घातला असून मागील महिन्यात मालखेडा येथील मा.श्री. विनोद नाईक यांच्या शेतात बिबट्याने दोन गायींचा फडशा पाडला होता.
याबाबत वनविभागाकडे वारंवार तक्रारी करुन सूध्दा काहीएक फायदा होत नसून आज दिनांक १३ फेब्रुवारी रविवार रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास मालखेडा ते अंबे वडगाव दरम्यान मालखेडा राखीव जंगलातील व जामनेर ते पाचोरा रस्त्यावरील खटकाळ नाल्याजवळ बिबट्या वाघाने एका दुचाकी चालकावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला मात्र नशिब बलवत्तर म्हणून मागाहून येणाऱ्या एका वाहन चालकाने जोराने हॉर्न वाजवत लाईट चालुबंद करुन गाडी थेट बिबट्याच्या अंगावर घातल्यामुळे दुचाकीस्वाराला जीवदान मिळाले आहे.
तरी वरील गावातील ग्रामस्थ, गुराखी तसेच शेतकऱ्यांनी सावधगिरी बाळगून आपल्या शिवारात कामकाज करावे अशी सुचना सत्यजित न्यूजकडून करण्यात येत असून लवकरच वनविभागाकडे या बाबत तक्रार करून बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी पाठपुरावा करण्यात येणार आहे.