कुऱ्हाड येथे वर्षानुवर्षांपासून महाशिवरात्री व आषाढी एकादशीला मास विक्री बंदची एक आदर्श परंपरा कायम.
सुनील लोहार.(कुऱ्हाड)
दिनांक~२७/०६/२०२३
पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड हे मोठ्या लोकसंखेचे गाव या गावात हिंदू व मुस्लिम बांधवाची वस्ती असून या गावातील मुख्य व्यवसाय म्हणजे शेती याच गावात श्रीराम मंदिर, हनुमान मंदिर, विठ्ठल मंदिर, महादेव मंदिर, सठी माता मंदिर, मरी आई मंदिर, पिरबाबा, मशिद इत्यादी धर्मस्थळे आहेत. विशेष म्हणजे मुस्लिम बांधवांची मशिद ही हिंदू वस्तीच्या अगदी जवळ आहे. या गावातील हिंदू, मुस्लिम बांधवाचा सलोखा वाखाणण्याजोगा आहे. कारण हिंदू, मुस्लिम बांधवांच्या सण, उत्सव हे दोघेही समाजबांधव गोडीगुलाबीने व एकोप्याने साजरे करतात याचेच जिवंत उदाहरण म्हणजे येत्या २९ जून २०२३ गुरुवार रोजी हिंदू बांधवांचा सण आषाढी एकादशी व मुस्लिम बांधवांचा सण बकरी ईद हे योगायोगाने एकाच दिवशी आले आहेत.
विशेष म्हणजे यावर्षी आषाढी एकादशी व बकरी ईद हे सण एकाच दिवशी येत आहेत. हिंदू संस्कृतीनुसार आषाढी एकादशीला हिंदू बांधव हे उपवास करतात व पंढरपूरच्या श्री. विठ्ठल महारांची आराधना करतात तर काही भक्तगण पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी वारीला जातात. ही बाब लक्षात घेऊन दोघंही धर्माचं पावित्र्य राखल जाव व हिंदू, मुस्लिम बांधवांचा भाईचारा अबाधित ठेवण्यासाठी मुस्लिम बांधवांनी स्वयंस्फूर्तीने पुढे येऊन बकरी ईदच्या दिवशी कुर्बानी न करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे कुऱ्हाड गावात हिंदू, मुस्लिम बांधवांच्या एकतेचे अनोखा भाईचारा दिसून आला.
या कुऱ्हाड गावाचे अजुन एक वैशिष्ट्य म्हणजे कुऱ्हाड येथील मास विक्री करणारे खाटीक समाजबांधवांनी एक आदर्श निर्माण केला आहे. असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. कारण हे खाटीक बांधव आपला व्यवसाय करतांना मागील तीन पिढ्यांपासून आषाढी एकादशी, कार्तिकी एकादशी, महाशिवरात्री, श्रीराम नवमी, हनुमान जयंती या दिवशी स्वयंस्फूर्तीने आपला मासविक्रीचा व्यवसाय बंद ठेवतात ही बाब वाखाणण्याजोगी आहे.
दिनांक २९ जून २०२३ गुरुवार रोजी आषाढी एकादशी व बकरी ईद एकाच दिवशी येत असल्याने कुऱ्हाड येथील सर्व मुस्लिम बांधव व आजोबा, पणजोबा पासून मास विक्रीचा पारंपरिक व्यवसाय करणारे हारुन खाटीक, अनीस खाटीक, रईस खाटीक, मोसीन खाटीक, वाईद खाटीक, दानिश खाटीक व सर्व समाजबांधवांनी स्वयंस्फूर्तीने पुढे येऊन बकरी ईदच्या दिवशी कुर्बाणी न देण्याचा निर्णय घेतला असून त्यांनी कुऱ्हाड येथील जेष्ठ पत्रकार सुनील लोहार यांच्या माध्यमातून सत्यजित न्यूज कडे संपर्क साधुन आपला निर्णय कळवला आहे.