तांड्यावर राहणाऱ्या जे. सी. बी. मालकाची शिरजोरी, दिवसाढवळ्या गौण खनिजाची करतो चोरी. महसूल विभागाकडून कारवाईची मागणी.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०८/०७/२०२३
पाचोरा तालुक्यातील अंबे वडगाव येथून जवळच असलेल्या एका तांड्यावर राहणाऱ्या एका जे. सी. बी. मालकाने कोकडी, कळमसरा, अंबे वडगाव, जोगे वडगाव या गावाजवळील गावठाण जमीन, गायरान जमीन व शासकीय भूखंडावर तसेच शेत शिवारासह मालखेडा, कळमसरा, कोकडी या राखीव जंगलासह, धरण परिसरात धरणाच्या भिंतीपर्यंत इतर तहसील हद्दीत धुमाकूळ घातला असून महसूल विभागाची किंवा वनविभागाची कोणतीही परवानगी न घेता त्याच्या स्वताच्या जे. सी. बी. च्या साह्याने खोदकाम करुन स्वताच्या मालकीचे व इतर ट्रॅक्टर भाड्याने लावून मनाला पटेल तेथे खोदकाम करुन माती, मुरुम, दगडांचा उचल करुन हे गौण खनिज परस्पर विक्री करुन मागील चार महिन्यांपासून लाखो रुपये कमाई केल्याची जोरदार चर्चा पंचक्रोशीतील गावागावातून ऐकावयास मिळते आहे.
संबंधित तांड्यावरील जे. सी. बी. मालकाने वरील परिसरात खोदकाम करुन हजारो ब्रास गौण खनिजाची चोरी केली आहे. अनाधिकृतपणे खोदकाम करुन गौण खनिजाची उचल करतांना शासनाचे सर्व नियम धाब्यावर बसवून नॅशनल हायवेच्या बाजूला, इतर जिल्हा मार्गाच्या हद्दीत, राखीव जंगलासह, धरणाच्या भिंतीला धोका होईल इतक्या जवळ तसेच धरणाच्या सांडव्या जवळपास व वरील दर्शविलेल्या ठिकाणी जे. सी. बी. च्या साह्याने मोठ्या प्रमाणात अवैधरित्या खोदकाम करत गौण खनिजाची उचल करुन शासनाचा महसूल बुडवून चोरी करत आहे.
या जे. सी. बी. मालकाने मनाला येईल तेथे खोदकाम केलेले असल्याने रहदारीला अडथळा निर्माण झाला असून या खेड्यांमध्ये पावसाळ्यात पाणी साचून गुराढोरांना तसेच लहान मुलांना जीवितास धोका निर्माण झाला आहे. म्हणून या महसूल विभागाने या जे. सी. बी. मालकाचा शोध घेऊन कर वसूल करुन कडक कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.