तीन महिन्यांपूर्वीच विवाह झालेल्या तरुणीची आत्महत्या.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०३/०६/२०२२
धरणगाव तालुक्यातील भवरखेडा येथील माहेर व पाचोरा तालुक्यातील गाळण बुद्रुक येथील तीन महिन्यांपूर्वीच विवाह झालेल्या २२ वर्षीय विवाहितेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. मात्र, सासरच्या मंडळींना तिचा खून केल्याचा संशय असून त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी मृत मुलीच्या आई-वडिलांनी पोलिसांकडे केली आहे.
याबाबत असे की, धरणगाव तालुक्यातील भवरखेडा येथील सुवर्णा (वय २२) हिचा पाचाेरा तालुक्यातील गाळण येथील योगेश चुडामन पाटील यांच्याशी १९ फेब्रुवारी २०२२ रोजी विवाह झाला. योगेश नाशिक येथे कंपनीत नाेकरीस असून त्याच्या भावाचे व त्याचे नाशिक येथे दोन मेडिकल आहेत. मुलीचे वडिल सूर्यभान सीताराम पाटील यांची सालदारकी करतात. तर आई अनिता पाटील मजुरी करून उदर्निवाह करतात.
मुलगा नाेकरीला असल्यामुळे त्यांनी ७ लाख रुपये हुंडा कबूल केला. कर्ज काढून विवाहाप्रसंगी त्यापैकी ५ लाख रुपये रोख दिले. त्यानंतर माहेरहून २ लाख रुपये आणण्यासाठी तिला सतत शारीरिक व मानसिक त्रास देत असल्याचे सुवर्णा ही माहेरी आल्यानंतर तसेच फाेनद्वारे सांगत हाेती. दरम्यान, १ जूनला रात्री ७ वाजता आईने सुवर्णास फोन केला. त्यावेळी माझी नणंद एक महिन्यापासून येथे आली असून ती २ लाखांसाठी माझ्याशी सतत भांडत असल्याचे सुवर्णा हिने आईला सांगितले. दुसऱ्या दिवशी अर्थात २ राेजी आईने सकाळी १० वाजता पुन्हा सुवर्णाला फोन लावण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिचा फोन बंद होता. यानंतर तासाभरातच सुवर्णाच्या जेठाने फोन करुन सुवर्णाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आईला कळवले. घटनेप्रसंगी सुवर्णा व तिची नणंद या दोन्हीच घरी होत्या.
विवाहितेला फाशी दिल्याचा आरोप
याबाबत नेहमीच मुलगी आई वडिलांकडे सासरच्या मंडळींची तक्रार करत होती. सासरची मंडळी कधी तरी सुधरतील असे सांगुन आम्ही तिला सासरी नांदायला पाठवत होतो. आमची मुलगी आत्महत्या करण्या सारखी नव्हती. मुलीचे निधन झाल्यानंतर घरी असलेले सासरे व नणंद हे पसार झाल्याने तिला अगोदर फाशी दिली व नंतर दोर बांधून छताला लटकविले. यामुळे सासरच्या मंडळींनी तिचा खुन केल्याचा आम्हाला संशय असुन त्यांचेवर खुनाचा गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी मयत मुलीच्या आई, वडिलांनी पोलिसांकडे केली आहे. घटनास्थळी पोलिस उपअधीक्षक भारत काकडे, पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांनी भेट दिली. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पाचोरा पोलिस करत आहेत.