शासनाचा महसूल बुडवून कोल्हे धरण परिसरातून मुरुम, माती, दगडांसह गौण खनिजाची सर्रास वाहतूक.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१५/०६/२०२३
पाचोरा, भडगाव व जामनेर तालुक्यात जे. सी. बी. व ट्रॅक्टर मालक व चालकांनी धुमाकूळ घातला असून हे लोक शासनाच्या मालकीच्या पडिक जमीनी, गावठाण जागा, इनामी जमीन व गायराण जमीनीवर स्वयंचलित जे. सी. बी. मशीन वापरुन थोड्या वेळात वेगाने खोदकाम करुन या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात मुरुम, माती, दगडांचा उचल करुन एका बाजूला हजारो रुपये ब्रास प्रमाणे विक्री करुन लाखो रुपये कमाई करत असल्याचे खात्रीलायक वृत्त असून दुसरीकडे शासनाचा लाखो रुपये महसूल बुडवत असल्याने अशा अवैधरित्या खोदकाम करुन गौण खनिजाची चोरी करणारांवर कठोर कारवाई करण्यात यावी व शासनाचा बुडणारा महसूल कर वसूल करण्यात यावा अशी मागणी सुज्ञ व सर्वसामान्य नागरिकांनी केली आहे.
(धरण परिसरातून माती व मुरमाचा उचल धरणाच्या भिंतीला व सांडव्याला धोका.)
गौण खनिज माफीयांनी उच्छाद मांडला असून धरण व पाझरतलाव परिसर अवैधरित्या खोदकाम करुन माती व मुरमाचा उचल करतांना थेट धरणाच्या भिंतीच्या पायाजवळ तसेच सांडव्याजवळ खोलवर खोदकाम केले जाते यामुळे भविष्यात भिंतीच्या पायाला व सांडव्याला क्षती पोहचून मोठ अनर्थ घडू शकतो असे मत काही जाणकार मंडळींनी व्यक्त केले आहे.
(गावठाण जमीन उध्दवस्त)
तसेच हे गौण खनिज माफिया मुरुम व माती उचल करतांना गावठाण जमीनीवर राजरोसपणे खोदकाम करत असल्याने गावठाण जमीनीवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. यामुळे पावसाळ्यात याठिकाणी पाणी साचून मोठमोठे जलसाठे तयार होतात व याच ठिकाणी पाळीव जनावरे व लहान, लहान मुलांच्या जीवनात धोका निर्माण होतो. तसेच गावागावातील विकासकामे यात दवाखाना, वाचनालय, ग्रामपंचायत कार्यालय, वाचनालय, व्यायामशाळा बांधण्वायासाठी किंवा वाढती लोकसंख्या लक्षात घेता व बेघर लोकांना घरकुल देण्यासाठी ही गावठाण जमीन कामी येऊ शकते म्हणून हे खोदकाम थांबवण्यासाठी महसूल विभागाने त्वरित कारवाई करावी अशी मागणी जोर धरत आहे.
(गायराण जमीनीवर अवैध खोदकाम)
पाचोरा, भडगाव, जामनेर तालुक्याला मोठमोठे गायराण जमीनीचे भुखंड आहेत. परंतु या भुखंडावर गौण खनिज माफीयांनी उच्छाद मांडला असून मोठ्या प्रमाणात अवैधरित्या खोदकाम करुन गौण खनिज उत्खनन करत असल्याने याठिकाणी असलेली निसर्गसंपदा झपाट्याने नष्ट होत आहे. तसेच आसपासच्या गुराढोरांना चरण्यासाठी गायराण शिल्लक रहात नसल्याने पशुधन पालकांना आपली गुरेढोरे चारण्यासाठी कुरण उपलब्ध नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे.
म्हणून आतातरी मा. जिल्हाधिकारी साहेब, मा. प्रांताधिकारी साहेब, मा. तहसीलदार साहेब तसेच मा. सर्कल व मा. तलाठी साहेबांनी अश्या गौण खनिजाची उचल थांबवण्यासाठी कडक कारवाई करावी अशी मागणी जोर धरु लागली आहे.
(विशेष वृत्त~ पाचोरा तालुक्यात सोयगाव तालुक्यातील गौण खनिज माफियांचा धुडगूस.)