शेंदुर्णी ते पाचोरा रस्त्यावर मिळते मुबलक दारु, अंबे वडगाव ते वरखेडी रस्त्यावर मद्यधुंद चालकाचा प्रताप, गाडीवरचा ताबा सुटल्याने पाईप रस्त्यावर.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०७/०६/२०२३
जामनेर ते पाचोरा रस्त्यावर अंबे वडगाव ते वरखेडी दरम्यान मानमोडी परिसरातील बंद असलेल्या महाराष्ट्र ढाब्या समोर पाईप घेऊन जाणाऱ्या आयसर गाडीवरील मद्यधुंद चालकाचा ताबा सुटल्याने गाडीत भरलेले पी. व्ही. सी. पाईप जमिनीवर पडून पडल्यामुळे रहदारीला अडथळा निर्माण झाला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की दिनांक ०७ जून २०२३ बुधवार रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास एम. एच. ०४, ई. वाय. ५३४६ या क्रमांकाची आयसर गाडी अंबे वडगाव कडून पाचोरा शहराकडे जात असतांनाच अंबे वडगाव तेथुन तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या महाराष्ट्र ढाब्या समोरून जात असतांनाच वाहनचालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने आयसर गाडी झोकांड्या खात, खात रस्त्याच्या बाजूला जाऊन थांबली, गाडीचा वेग जास्त असल्याने व गाडी झोकांड्या खात असल्याने गाडीत भरलेले पी. व्ही. सी. पाईप भररस्त्यात पडले मात्र सुदैवाने गाडी पलटी झाली नाही. गाडी पलटी झाली असती तर जीवितहानी होण्याची शक्यता टाळता आली नसती असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
गाडी रस्त्याच्या कडेला येऊन थांबली व खाडीतील सर्व पी. व्ही. सी. पाईप रस्त्यावर पडल्याचे पाहून रस्त्याच्या बाजूला शेतात काम करणारे शेतकरी व शेतमजूरांनी घटनास्थळी धाव घेतली व आत्मीयतेने चालकाची विचारपूस करण्यासाठी त्यांच्याकडे गेले असता संबंधित गाडी चालक हा दारु पिऊन मद्यधुंद झालेल्या अवस्थेत आढळून आला. तरीही त्याला पाणी पाजून झाडाखाली सावलीत बसवून योग्य ती मदत करण्यासाठी प्रयत्न करु लागले परंतु मद्यधुंद चालक कुणाचेही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसल्याने काही सुज्ञ नागरिकांनी रस्त्यावर पडलेले पाईप बाजूला करुन रहदारीतला अडथळा दुर करत काढता पाय घेतला.
(शेंदूर्णी पाचोरा रस्त्यावर पाहिजे तेथे मागाल तेथे दारु उपलब्ध असल्याने मोठ्या अपघाताची शक्यता.)
जामनेर ते पाचोरा रस्त्यावर जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी चौफुली पासून तर पुढे (मालखेडा गाव वगळता) अंबे वडगाव, वरखेडी, लोहारी व जारगाव चौफुली परिसरातील रस्त्याच्या कडेला असलेल्या पानटरी, उपहारगृह व हॉटेलमध्ये शुध्द पाण्याची बाटली मिळणार नाही मात्र दिवसाढवळ्या खुलेआम अवैधरित्या दारुची विक्री केली जात असल्याने मद्यपींना पाहिजे तेथे दारु उपलब्ध होत असल्याने काही दारुडे वाहन चालक सर्वसामान्य व्यक्ती चहा किंवा उन्हाळ्यात थंड पेय पितात तसेच दारु पितांना दिसून येत आहेत.
रहदारीच्या भररस्त्यात मागाल तेथे दारु मिळत असल्याने दारु पिऊन वाहन चालवणाऱ्या दुचाकी, चारचाकी किंवा मोठ्या अवजड वाहने चालकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली असून शेंदुर्णी ते पाचोरा दरम्यान दुचाकीस्वार किंवा इतर वाहनधारकांना मध्ये वादविवाद होत असतात तसेच हे मद्यपी वाहनचालक रस्त्यावरुन जाणाऱ्या, येणाऱ्या पादचाऱ्यांना कट बाजी करत वाद घालत असतात या गैरप्रकारांमुळे दररोज भांडणतंटे होत असून लहानमोठ्या अपघातांची मालिका सुरूच आहे. व अश्याच एका मद्यपी वाहन चालकांच्या चुकीमुळे आज अपघात होऊन रस्त्यावर पाईपांचा सडा पडल्यामुळे रहदारीला अडथळा निर्माण झाला आहे.
“मोठ्या अपघाताची शक्यता”
जामनेर ते पाचोरा दरम्यान शेंदुर्णी ते पाचोरा दरम्यान भररस्त्यावर असलेल्या पानटरी, उपहारगृह व हॉटेलमध्ये दिवसाढवळ्या अवैधरित्या विक्री होणारी गावठी, देशी व इंग्लिश दारुची विक्री अशीच सुरु राहिल्यास एखाद्यावेळेस मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून दारुबंदी विभाग व पोलीस विभागाने कुणाच्याही दबावाला बळी न संयुक्तपणे मोहीम राबवून रस्त्यावर खुलेआम अवैधरित्या दारु विकणारांचे कंबरडे मोडले पाहिजे अशी मागणी सुज्ञ नागरिक व असंख्य महिलावर्गासह शालेय विद्यार्थी, विद्यार्थिनी व पालकवर्गाकडून केली जात आहे. कारण आता नुकत्याच शाळा, कॉलेज सुरु होत असून खेड्यापाड्यातील मुले व मुली मोठ्या संख्येने शहरातील शाळा, कॉलेजमध्ये शिकण्यासाठी जात असतात यांनाही या बेवड्यांचा उपद्रव सहन करावा लागतो आहे.