कुऱ्हाड गावातील अवैध धंद्यात, गुमनाम हैं कोई, बदनाम है कोई, अवैधधंदे सुरु ठेवण्यासाठी प्रतिष्ठा पणाला. (भाग २)
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०६/०५/२०२२
आजच्या परिस्थितीत सट्टा, पत्ता, जुगार, विदेशी दारु सह गावठी दारूची निर्मिती व खुलेआम विक्री हे अवैध धंदे भरवस्तीत, हमरस्त्यावर, धार्मिक स्थळांच्या जवळ, शाळा, बसस्थानक व वर्दळीच्या ठिकाणी तसेच खेडेगावातील किराणा दुकान, पान टपरी, किंवा रहदारीच्या रस्त्यावर हॉटेल, उपहारगृह व ईतर व्यवसायाच्या आडून हे अवैध धंदे राजरोसपणे सगळीकडेच सुरु झाल्याचे दिसून येत आहे.
कुठेही अवैध धंद्यांचा विषय आला म्हणजे सर्वसामान्य जनतेच्या नजरेसमोर येतात ते फक्त आणि फक्त पोलिसच परंतु वस्तुस्थिती वेगळीच असते व आहे. कारण दारुबंदी करण्यासाठी स्वतंत्र असा दारुबंदी विभाग म्हणजे अबकारी खातें आहे. या दारुबंदी खात्यात मनुष्यबळ कमी असल्याचा कांगावा केला जातो मात्र इच्छा असली तर मार्ग सापडतो असे म्हणतात परंतु आजच्या परिस्थितीत दारुबंदी खाते हे फक्त आणि फक्त नावालाच उरले असल्याचा अनुभव सगळीकडे दारुचा महापूर पाहिल्यावर लक्षात येतो.
दारुबंदी खात्याला खरच कारवाई करायची असल्यास ते रितसर पोलीसांची मदत घेऊ शकतात परंतु असे होत नाही कारण याकरिता गरज आहे ती इच्छाशक्तीची परंतु दारुबंदी खाते हे मनुष्यबळ कमी असल्याचे कारण पुढे करून पळवाट काढत असले तरी मात्र दुसरीकडे आपल्याच विभागातील काही कर्मचारी व काही ठिकाणी झीरो पोलीस (पंटर) ची नेमणूक करुन नियमितपणे हप्ते वसुली करुन जिल्हाभरातून दरमहा लाखो रुपयांचा मलिदा जमा करत असल्याचा सर्वसामान्य जनतेतून आरोप केला जात आहे.
(गाव करील ते राव काय करील)
**********************
अजुनही महत्वाचे म्हणजे अवैध धंदे कायमस्वरूपी बंद व्हावेत म्हणून कायम बोंबाबोंब केली जाते मात्र स्थानिक ग्रामपंचायत सरपंच, सदस्य व ग्रामपंचायतीच्या विविध कमेट्या स्थापन केल्या जातात तसेच गावातील पोलीस पाटील हा शासन व जनतेतील महत्वाचा दुवा असल्यावर ही हेच घटक जेव्हा आर्थिक फायद्यासाठी किंवा आपली शेखी मिरवून घेण्यासाठी या अवैध धंदे करणारांकडे मुद्दामहून कानाडोळा करुन या अवैध धंदे करणारांची पाठराखण करतात. किंवा सत्ताधारी व विरोधी हे एकमेकांवर कुरघोड्या करण्यासाठी आपली प्रतीष्ठा पणाला लावून अवैध धंदे करणारांना मदत करुन कारवाईत अडथळा निर्माण करतात. तेव्हा मात्र इच्छा असूनही संबंधित विभागातील अधिकारी, कर्मचारी हतबल होऊन हातावर हात ठेवून चुप बसतो यामागील कारण म्हणजे संबंधित बिट हवालद किंवा संबंधित पोलीस स्टेशनला असलेले अधिकारी यांना तथाकथित राजकारणी बदली करण्यापर्यंत धमकावून सोडतात या सगळ्या कारणांचा सारासार विचार केला तर आपल्या गावपातळीवर सुरू असलेले सर्व प्रकारचे अवैध धंदे कधीच बंद होणार नाहीत हे मात्र निश्चित असे वाटू लागते.
असे असले तरी गावातील सरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष, पोलीस पाटील, ग्रामपंचायतीची दारुबंदी कमेटी व सर्व ग्रामस्थांनी ठरविल्यास गावागावात सुरु असलेले अवैध धंदे एका चुटकीसरशी कायमस्वरूपी बंद होतील यात शंका नाही. परंतु जनहिताच्या गप्पा मारत आम्हीच निवडणुकीत मतदान मिळवून घेण्यासाठी दारु पाजून मतदान पदरात पाडून घेतो व येथूनच खरी व्यसनाधीनता गावागावातून फोफावत जाते यात अल्पवयीन, तरुण पिढी ओढली जाते.
असाच काहीसा प्रकार पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड खुर्द या गावात सुरु असून या गावात मागील आठ ते दहा वर्षापासून सट्टा, पत्ता, जुगार सोबतच जिल्ह्यातील कोणत्याही गावात नसेल इतक्या मोठ्या प्रमाणात गावठी दारू निर्मिती व विक्रीचा व्यवसाय दिवसाढवळ्या, रात्रंदिवस सुरु आहे. कुऱ्हाड येथील अवैध धंदे हे आसपासच्या दहा खेड्यांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. तसेच या गावात आजपर्यंत बऱ्याचशा तरुण मुलांचे जीवन बर्बाद झाले असून बरेचसे तरुण बरबादीच्या मार्गावर आहेत. या अवैधधंद्यामुळे आजपर्यंत बरीचशी कुटुंब बर्बाद झाली असून काही बर्बादीच्या मार्गावर आहेत. ही बाब लक्षात घेऊन मागील काळात कुऱ्हाड गावातील सुभाष चव्हाण, प्रभाताई शिंपी व इतर सुज्ञ नागरिकांनी गावातील अवैध धंदे बंद करण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले मात्र याला यश आले नाही.
यामागील मुख्य कारण म्हणजे गावात असलेली दुफळी, सोबतच व्यसनाधीन लोकांच्या जीवावर श्रम न करता पोट भरणारे ऐतखाऊ, तसेच अनाधिकृत सावकारी करणारे काही धनदांडगे तसेच आम्हीच समाजसुधारक आहोत असा आव आणून आपल्या पद प्रतिष्ठेचा गैरफायदा घेणारे काही लोक यांच्याकडून या अवैध धंदे करणारांची केली जाणारी पाठराखण व याच दुफळीचा फायदा घेत आपला हेतू साध्य करण्यासाठी हप्ते घेऊन अवैध धंदे सुरु ठेवण्यासाठी मुक संमती देणारे (सगळेच नाही) काही भ्रष्ठाचारी कायद्याचे रक्षक यांच्या मनमानी पणामुळे आजपर्यंत या गावात अवैध धंदे राजरोसपणे सुरू आहेत.
म्हणून हे अवैध धंदे बंद होण्यासाठी गावातील सुज्ञ नागरिक व महिलांनी वारंवार अर्जफाटे करुन सुध्दा या अवैध धंदे कराणारांवर कडक कारवाई होत नसल्याने म्हणून की काय या अवैध धंदे करणारांच्या डोक्यात दोन नंबरच्या पैशाची हवा भरली तसेच यांचे मोठमोठे पाठीराखे तसेच हप्ते दिले म्हणजे कायदा आमच्याच बापाचा असल्याचे समजून (अधिकारी) आमच्या खिशात आहेत असे समजून वागु लागले आहेत.
(सापाला कितीही दुध पाजल तरी तो चावा घेतोच.)
याचाच अनुभव आता कुऱ्हाड गावातील सुज्ञ नागरिक व सर्व सामान्य जनतेला येत आहे. कारण या अवैध धंदे करणारांच्या विरोधात कोणत्याही व्यक्तीने तोंड उघडल्यावर हे अवैध धंदे करणारे संघटीत होऊन संबंधित व्यक्ती विरोधात खोटेनाटे आरोप करत पोलीस स्टेशनला जाऊन खोट्या तक्रारी नोंदवून संबंधित व्यक्तीवर दबाव आणून त्यांना चुप बसवण्यासाठी केविलवाणा प्रयत्न करत आहेत. असाच प्रकार मागिल आठवड्यात एका अवैध धंदे करणाऱ्या व्यवसायीकाने एका प्रतिष्ठित व्यक्ती सोबत विनाकारण वाद घालून तीन ते चार लोकांनी त्या इसमाला जबरदस्त मारठोक केल्याची घटना घडल्यापासून कुऱ्हाड गावात अवैध धंदे करणारांची दहशत वाढली असल्याने सर्वसामान्य जनतेतून नाराजी व्यक्त केली जात आहे तर महिलावर्ग चिंतीत आहे.
हा प्रसंग घडल्यानंतर कुऱ्हाड येथील जळगाव जिल्हा शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष मा. श्री. अरुण भाऊ पाटील यांच्याकडे गावातील शेकडो महिला व ग्रामस्थांनी गावातील अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करण्यासाठी साकडे घातले होते. त्यानुसार मा.श्री. अरुण पाटील यांनी अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करण्यासाठी एक निवेदन तयार करून कुऱ्हाड गावातील असंख्य महिला व पुरुषांच्या सह्यांचे निवेदन तयार करून पिंपळगाव हरेश्र्वर पोलीस स्टेशनला सहाय्यक पोलीस निरीक्षक मा.श्री. महेंद्रजी वाघमारे तसेच पाचोरा येथील उपविभागीय अधिकारी मा.श्री. भरतजी काकडे यांच्याकडे देऊन ०१ मे महाराष्ट्र दिनाच्या दिवशी आमरण उपोषणाला बसणार असल्याचे जाहीर केले होते.
या निवेदनाची दखल घेत पाचोरा येथील उपविभागीय अधिकारी मा.श्री. भरतजी काकडे साहेब यांनी दाखल घेऊन वरिष्ठांच्या आदेशानुसार पिंपळगाव हरेश्र्वर पोलीसांच्या मदतीने कुऱ्हाड गावातील अवैध धंदे करणारांकडे धाडसत्र सुरु केले असून आजपर्यंत मोठ्या प्रमाणात गावठी दारु निर्मीतीचे अड्डे (हातभट्ट्या) फोडून तसेच गावातील पानटपरी, लहान मोठी व्यवसायाची दुकाने तसेच घरातील अवैध धंदे करणारांच्या घरी धाडसत्र राबवून कारवाई सुरु केली आहे. यामुळे सद्यस्थितीत अवैध धंदे करणारांचे धाबे दणाणले असून कुऱ्हाड गावातील महिला व सुज्ञ नागरिकांनी पोलीसांच्या कारवाई बाबत समाधान व्यक्त केले आहे. मात्र ही कारवाई सातत्याने करुन कुऱ्हाड गावातील अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात असून पोलीसांच्या या कारवाईमुळे व दिलेल्या आश्वासनामुळे मा.श्री. अरुण पाटील व कुऱ्हाड येथील महिला व ग्रामस्थांनी १ मे २०२२ रविवार रोजी पुकारलेले आंदोलन तुर्तास रद्द करण्यात आले आहे.
परंतु एकाबाजूला पोलीस सतत कारवाई करत असले तरी दुसरीकडे मात्र हे अवैध धंदे करणारे लोक पोलीसांनी भट्ट्या फोडल्यानंतर ही पुन्हा, पुन्हा नविन साहित्य आणून परत त्याच जागेवर तोच व्यवसाय सुरू करत असल्याचे दिसून येते आहे. तसेच सट्याच्या पिढ्या राजरोसपणे सुरु आहेत. म्हणून जनमानसात जाऊन यामागील कारण जाणून घेण्यासाठी प्रयत्न केला असता खुपच भयानक वास्तव समोर येत आहे.
कुऱ्हाड या गावात दोन वेगवेगळ्या पक्षाचे भक्कम कट्टर समर्थक व जिल्हा पातळीवर तसेच तालुका पातळीवर काम करणारे कट्टर कार्यकर्ते व पदाधिकारी आहेत. म्हणून ह्या दोघेही पक्षाचे कार्यकर्ते आपापली पकड मजबूत करण्यासाठी व पाठबळ वाढवण्यासाठी सतत प्रयत्नशील आहेत. मग ही स्पर्धा करत असतांना त्यांनी आपली पकड अबाधित रहावी म्हणून ते आपल्या कार्यकर्त्यांना सदा खुष ठेवण्यासाठी वाटेल ते करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
मग याकरिता ही मंडळी निवडणुकीत किंवा इतर सामाजिक कार्यक्रमात आपली प्रतिष्ठा टिकवून ठेवण्यासाठी किंवा भरघोस मतांनी विजयी होण्यासाठी तसेच आपल्या मागील पाठबळ टिकवून ठेवण्यासाठी काम, दाम, दंड, भेद याचा वापर करतांना दारुचा ही सर्रास वापर करतात तसेच आपापल्या कार्यकर्त्यांना टिकवून ठेवण्यासाठी वेगवेगळे प्रलोभने देऊन कमी श्रमात जास्त कमाई कशी करता येईल याकरिता अवैध धंदे सुरु करुन यांना पाठबळ देऊन किंवा सत्ता व सत्तेतून मिळणारी प्रतिष्ठा यांचा गैरवापर करून स्वताहून अवैध धंदे सुरु करुन स्वताची पोळी भाजून घेण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे कुऱ्हाड गावातून जनमानसात चर्चेत ऐकावयास मिळते व दिसून येत आहे.
या सर्व कारणांमुळे कुऱ्हाड खुर्द गावातील अवैध धंदे कायमस्वरूपी बंद होत नसल्याने आजपर्यंत शेकडो संसार उघड्यावर आले आहेत. व काही त्या मार्गावर आहेत. तसेच हे सर्वप्रकारचे अवैध धंदे करणारांचे अड्डे हे बसस्थानक, हमरस्त्यावर, धार्मिक स्थळांजवळ तसेच कुऱ्हाड गावातील विद्यामंदिर म्हणजे जिल्हापरिषद मराठी मुलांच्या शाळेत दारु पिणारे व तेथच लोळण घेणारांची संख्या मोठी आहे. या कारणांमुळे व्यसनाधीन लोकांचा उपद्रव सभ्य लोकांना विशेष करुन महिलांना सहन करावा लागत आहे. कारण कुऱ्हाड या गावात नव्वद टक्के शेतकरी असून या गावात भाजीपाल्याचे व केळीचे पिक मोठ्या प्रमाणात घेतले जाते म्हणून शेतात काम करणाऱ्या मजुर महिलांना शेतात जातात व घराकडे परत येतांना रस्त्यावरील दारुड्या ना उपद्रव सहन करावा लागत आहे
सुज्ञ नागरिक व महिलांच्या प्रतिक्रिया~
आमच्या गावात आपला तो बाळ्या व दुसऱ्याच ते कार्ट असा प्रकार सुरु आहे. तसेच कुणीही समाजहितासाठी चांगले काम केले तर त्यांची प्रतिष्ठा वाढणारच म्हणून एकमेकांना कमी लेखण्यासाठी व एकमेकांवर कुरघोड्या करण्यासाठी काही लोक हा खेळ खेळत आहेत. एखादा व्यक्ती आजारी पडला किंवा अचानक काही संकट आले तर लवकर मदत मिळत नाही. परंतु एखाद्या सट्टा, दारु किंवा जुगाराच्या अड्ड्यावर कारवाई झाली तर बरेचसे हितचिंतक *गुणाला पाय लावून पळतात व त्यांना सोडवून आणतात ही मोठी शोकांतिका आहे.
वारंवार अर्जफाटे करुन व वारंवार कारवाई करुनही जर का अवैध धंदे करणारे जुमानत नसतील तर यांच्यावर कठोर कारवाई करुन हद्दपार का ? केले जात नाही. असाही प्रश्न विचारला जात आहे. कारण दुसरीकडे एखाद्याला साधा धक्का लागून थोडासाही वाद झाल्यानंतर पोलीस लगेचच फटाफट कलमा सांगून व कलमांचा वापर करून गुन्हा दाखल करुन आपली कार्यतत्परता दाखवतात मग या अवैध धंदे करणाऱ्या लोकांवर कारवाई करतांना त्यांना कायद्याचा विसर पडतो की कुणाच दडपण येत की काय असा प्रश्न उपस्थित केला जात असून कायद्याच्या रक्षकांनी कुणाचाही मुलाहिजा न ठेवता व कुणाच्याही दडपणाखाली न येता कडक कारवाई करावी आम्ही तुमच्या सोबत आहोत असे आश्वासन दिले आहे.
कारवाई करतांना येणाऱ्या अडचणी~
जेव्हा, जेव्हा पोलीस किंवा संबंधित अधिकारी कुऱ्हाड गावातील अवैध धंदे बंद करण्यासाठी धाडसत्र राबवण्यासाठी निघतात तेव्हा या अवैध धंदे करणारांनी मुख्य रस्त्यावर तसेच ठिकठिकाणी रोजंदारीवर आपले खबरे ठेवले आहेत ते फोन करुन अवैध धंदे करणारांना सुचत करतात तसेच या अवैध धंदे करणारांचे काही हितचिंतक यांना मदत करत असल्याने कारवाई अडथळा येतो. सट्टा, पत्ता, जुगार सोबतच दारु विक्री करणारांना रंगेहाथ पकडले तरी अवैध धंदे करणारांची गावात दहशत असल्याने पोलिसांना साक्षीदार मिळत नसल्याने अडचणी येतात. सोबतच जागेवरच तडजोड करण्यासाठी रथी, महारथी घोळ घालतात अश्या बऱ्याचशा अडचणी येत असल्याने अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करण्यासाठी प्रयत्न करुनही यश येत नसल्याचा अनुभव जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांना येत आहे.