सांगवी प्रा. लो. शिवारात बिबट्याने केल्या शेळ्या फस्त, वनविभागाचे अधिकारी फक्त हप्ते घेण्यात व्यस्त.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१०/०४/२०२३
(पाचोरा, भडगाव व जामनेर तालुक्यातील राखीव जंगलासह शेतशिवारात अनाधिकृतपणे मोठ्या प्रमाणात अवैधरित्या वृक्षतोड सुरु असल्याकारणाने जंगलातील हिंस्त्र प्राणी गावाकडे धाव घेत असल्यामुळे गावपातळीवरील हिंस्त्र प्राण्यांची भटकंती दिसून येत आहे. तसेच वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात कुठेही काही नुकसान झाल्यास घडलेल्या घटनांचा वृतांत प्रसारमाध्यमांपासून दडवून ठेवला जात असल्याचे निदर्शनास येत आहे.)
पाचोरा तालुक्यात मागील महिन्यापासून बिबट्याने धुमाकूळ घातला असून बऱ्याचशा ठिकाणी बिबट्याने पाळीव प्राण्यांची शिकार केली आहे. हा प्रकार थांबविण्यासाठी बिबट्याला पकडून दुसरीकडे सोडण्यात यावे अशी मागणी वारंवार करुनही पाचोरा वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी वरिष्ठांच्या आदेशानुसार आम्ही आमचे काम करु अशी उत्तरे मिळत असल्याचे नागरिकांनी सांगितले असून यामुळे नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
बिबट्याचा बंदोबस्त होत नसल्याने दिनांक ०९ एप्रिल २०२३ रविवार रात्रीपासून ते १० एप्रिल २०२३ सोमवार सकाळपर्यंतच्या कालावधीत पाचोरा तालुक्यातील सांगवी प्रा. लो. येथील राजेंद्र कडूबा पाटील यांच्या खळ्यातील गोठ्यात प्रवेश करुन पाच शेळ्या, अकरा कोंबड्यावर ताव मारुन ठार केल्याची घटना घडली आहे. ही घटना घडल्यानंतर संबंधित पशुधन मालकाने पाचोरा वनविभाला कळवल्यावर वनविभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सांगवी प्र. लो. येथील घटनास्थळी भेट देऊन बिबट्याच्या हल्यात ठार झालेल्या शेळ्या व कोंबड्यांचा पंचनामा केला आहे.
“वनविभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार”
—————————————————–
पाचोरा व भडगाव तालुक्यात मागील काही महिन्यांपासून बिबट्याचे दिवसाढवळ्या दर्शन होत आहे. तसेच दोन दिवस अगोदर सांगवी प्र. लो. शिवारातील शशीकांत पाटील यांच्या शेतात बिबट्याची मादी व दोन बछडे दिसून आले होते. याबाबत पाचोरा वनविभागाला कळवण्यात आले होते. मात्र पाचोरा वनविभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या सुचनेकडे दुर्लक्ष केल्याने आज ही घटना घडली असल्याचे मत सांगवी प्र. लो. येथील नागरिकांनी व्यक्त केले असून हा बिबट्या एखाद्या मानसाच्या नरडीचा घोट घेईल तेव्हा वनविभाग बिबट्याचा बंदोबस्त करेल का ? असा प्रश्न उपस्थित केला आहे.
पाचोरा, भडगाव तालुक्यात दिवसाढवळ्या वृक्षतोड सुरु.
——————————————————-
पाचोरा व भडगाव तालुक्यातील राखीव जंगलासह शेतशिवारात अनाधिकृतपणे मोठ्या प्रमाणात वृक्षतोड सुरु असून या अवैध वृक्षतोडीत दररोज शेकडो हिरव्यागार वृक्षांची दिवसाढवळ्या स्वयंचलित यंत्राच्या साह्याने कटाई केली जात आहे. विशेष म्हणजे हि दिवसाढवळ्या होणारी वृक्षतोड व हमरस्त्यावरुन दिवसाढवळ्या ट्रॅक्टर मधून वाहतूक केली जाते आहे. या अवैधरित्या वृक्षतोड केलेल्या लाकडांचे मोठमोठे ढीग पाचोरा शहरातील तसेच भोजे येथील लाकुड वखारीवर तसेच पाचोरा, भोजे, पिंपळगाव हरेश्वर, भडगाव या गावाला लागूनच असलेल्या शेतशिवारात साठवून ठेवले आहेत.
तसेच पाचोरा, भडगाव व जामनेर तालुक्यातील वीटभट्टीवर सुध्दा लाकुड व्यापारी दररोज शेकडो टन लाकडाचा पुरवठा करत असल्याने आज तिघेही तालुक्यातील वीटभट्टीवर भेट दिल्यास मोठ्या प्रमाणात लाकुड पडलेले दिसते. तरीही या अवैधरित्या वृक्षतोड करणारांवर कारवाई का होत नाही याबाबत सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी प्रयत्न केला असता वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी यांचे लाकुड वखार मालक व लाकडाचे व्यापारी यांचे अर्थपूर्ण संबंध असून या अवैध वृक्षतोडीतून दरमहा हजारो रुपयांचे हप्ते वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी यांना मिळत असल्याने दिवसाढवळ्या हिरव्यागार वृक्षांची कत्तल सुरु असल्याची जोरदार चर्चा पाचोरा व भडगाव तालुक्यातील नागरिकांमध्ये ऐकायला मिळत आहे.
[वृक्षतोडीचे वृत्त खरे की खोटे याबाबत कोणत्याही नागरीकांना, अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांना शंका असल्यास सत्यजित न्यूज सोबत आल्यास पाचोरा, भडगाव व जामनेर तालुक्यात विरप्पनच्या पिल्लावळीचा चाललेला तमाशा याची देही याची डोळा दाखवून दिला जाईल.]