अंबे वडगाव येथे माकडाच्या हल्ल्यात ४२ वर्षीय इसम जबर जखमी, वनविभागाच्या अधिकाऱ्यांचा कानाडोळा.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१३/०२/२०२३
पाचोरा तालुक्यातील अंबे वडगाव येथे दिनांक १२ फेब्रुवारी २०२३ रविवार रोजी सकाळी साडे नऊ वाजता रविंद्र कडू मराठे हा इसम त्याच्या तुर सुकविण्यासाठी त्याच्या राहत्या घराच्या छतावर (धाब्यावर) चढलेला असतांनाच गावात धुमाकूळ घालणाऱ्या माकडाने रविंद्र मराठे याच्यावर अचानकपणे झडप घालून हल्ला चढवला होता. या माकडाच्या हल्ल्यातून स्वताला वाचवण्याच्या प्रयत्नात झटापट होऊन यात रविंद्र मराठे हे छतावर कोसळले व तसेच थेट घसरत जमीनीवर येऊन पडले व जबर जखमी झाले आहेत.
या माकडाने केलेल्या हल्ल्यात रविंद्र मराठे यांच्या जबड्यात व जिभेला जबरदस्त दुखापत होऊन मोठी जखम झाली आहे. रविंद्र मराठे याला गावकऱ्यांनी माकडाच्या तावडीतून सोडवून उपचारासाठी शेंदूर्णी येथील दवाखान्यात नेले असता त्यांच्या जबड्याला आतून सात टाके व जीभेला अकरा टाके टाकून तातडीने उपचार करण्यात आले आहेत. सुदैवाने गावात आसपासच्या परिसरात गावकरी उपस्थित होते म्हणून त्यांनी माकडाला हाकलून लावले व रविंद्र मराठे यांची सुखरुप सुटका केली व पुढील अनर्थ टळला आहे.
“महत्वाचे” ~ पाचोरा व जामनेर तालुक्यातील शेत शिवारात लाकूड व्यापाऱ्यांनी धिंगाणा घातला असून मोठ्या प्रमाणात वृक्षतोड सुरू केली आहे तसेच राखीव चांगलातही विरप्पनची पिल्लावळ सक्रिय असल्याकारणाने माकडासह इतर जंगली प्राणी स्वताचा बचाव करण्यासाठी गावाकडे पळत असल्याकारणाने गावागावात माकड, रानडुक्कर, निलगाय, बिबट्यांचा वावर दिसून येते आहे.
पाचोरा, जामनेर वनविभाग फक्त नावालाच ~
————————————
काल रोजी रविंद्र मराठे यांच्यावर माकडाने हल्ला चढवल्यानंतर दिलीप जैन यांनी पाचोरा वनविभागाचे वनपाल देवरे यांच्या ९०१११४९९८५ या भ्रमणध्वनीवर माहिती देऊन गावात उच्छाद घालणाऱ्या माकडाचा बंदोबस्त करावा अशी विनंती केली होती परंतु आज दुसरा दिवस उजाडला तरीही पाचोरा वनविभागाकडून अंबे वडगाव येथे अद्यापही कुणीही आले नसल्याने या माकडाचा बंदोबस्त कोण करेल असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.