पाचोरा तालुक्यातील हजारो शौचालय, शेकडो घरकुल व विकासकामे गेली चोरीला चौकशीची मागणी.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२७/११/२०२२

(बातमीला लाईक करायचं विसरु नका.)

पाचोरा तालुक्यातील हजारो शौचालय शेकडो घरकुल व विकासकामे चोरीला गेली असून याबाबत सखोल चौकशी होऊन गोरगरिबांच्या वाट्याला आलेल्या निधीचा गैरवापर करुन स्वताची पोळी भाजून घेणारे पदाधिकारी, ग्रामसेवक, ग्रामविस्तार अधिकारी, गटविकास अधिकारी यांची चौकशी होऊन या भ्रष्टाचारात सामील असलेल्या सर्व जबाबदार अधिकारी व व्यक्तींची चौकशी होऊन कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी पाचोरा तालुक्यातील सर्वसामान्य जनता व सुज्ञ नागरिकांनी केली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की शासनाच्या धोरणानुसार अन्न, वस्र, निवारा या सुविधा समाजातील सर्व घटकांना मिळाल्या पाहिजेत म्हणून हक्काचे घर देण्यासाठी बेघर लोकांना इंदिरा आवास योजना व विविध योजनेअंतर्गत घरे देण्यासाठी भरघोस निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. या योजनेत गावागावांतील गरजूंना घरे मंजूर करण्यात आली मात्र ही योजना राबवतांना मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. लाभार्थ्यांना घरकुल बांधण्यासाठी धनादेश देण्यात आले परंतु ते धनादेश देतांना नियमांची पायमल्ली केली गेली घरकुलाचे पाया खोदणे किंवा बांधकाम झाल्याचे प्रत्यक्ष पाहून धनादेश देणे क्रमप्राप्त होते परंतु आपला तो बाळ्या समजून पदाधिकारी, ग्रामसेवक, गटविकास अधिकारी यांनी टक्केवारीचा धंदा करत संगनमताने कागदोपत्री घोडे नाचवून धनादेश दिल्यामुळे घरकुल योजनेचा फज्जा उडाला असल्याने शेकडो घरकुल फक्त आणि फक्त कागदोपत्री दाखवल्यामुळे पाचोरा तालुक्यातील शेकडो घरकुल चोरीला गेल्याचे खात्रीलायक वृत्त असून याची सखोल चौकशी होऊन संबंधितांवर कठोर कारवाई करुन दिलेला निधी वसूल करण्यात यावा अशी मागणी केली जात आहे.

तसेच प्रत्येक गाव हागणदारीमुक्त होऊन रोगराई, दुर्गंधी पासून मुक्त व्हावे याकरिता गावागावातून सार्वजनिक शौचालय तसेच वैयक्तिक शौचालय बांधण्यासाठी शासनाने कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता परंतु यातही पदाधिकारी व जबाबदार घटकांनी भ्रष्टाचार करत सार्वजनिक शौचालयाच्या बांधकामे ही मर्जीतील लोकांना देऊन शासनाने ठरवून दिलेल्या अटी, शर्तीनुसार न बांधता थातुरमातुर ढाचे उभारुन निधी लाटुन खात म्हणजे थोडक्यात (शेण खात) सार्वजनिक शौचालय योजनेचा फज्जा उडवल्या मुळे गावागावांतील महिला, पुरुषांना उघड्यावर शौचास जावे लागत आहे. तसेच गावाच्या मुख्य रस्त्यावर घाण व दुर्गंधी दिसून येते. विशेष म्हणजे महिला वर्गासाठी ही बाब अत्यंत अडचणीची ठरत आहे.

तीसरा मुद्दा म्हणजे गाव विकासासाठी शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून गावातील अंतर्गत रस्ते, सांडपाण्याच्या गटारी, सार्वजनिक शौचालय, व्यायामशाळा, सार्वजनिक वाचनालय, पथदिवे, आरोग्यविषयक सुविधा, नविन पाणीपुरवठा योजना, आधीच्या पाणीपुरवठा योजनांसाठी दुरुस्ती व इतर खर्चासाठी येणाऱ्या निधीचा गैरवापर केला असल्याचे खात्रीलायक वृत्त समोर येत आहे. यात ज्या, ज्या योजनांच्या माध्यमातून शासनाने निधी उपलब्ध करून दिला होता तो निधी त्याच कामांसाठी न वापरता दुसरीकडे खर्च झाल्याच्या तक्रारी आहेत. याचे जिवंत उदाहरण म्हणजे काही गावातून दलितवस्तीसाठी आलेल्या निधीचा मोठ्या प्रमाणात गैरवापर झाला असून तो निधी दुसरीकडे खर्च झाल्याचे दिसून येते.

विशेष म्हणजे गावागावांतील बरीचशी विकासकामे फक्त कागदोपत्री दाखवून पदाधिकारी, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, गटविकास अधिकारी, इंजिनिअर यांनी संगनमताने संपूर्ण निधी परस्पर हडप केल्यामुळे पाचोरा तालुक्यातील गावागावांतील विकासकामे, शेकडो घरकुल व हजारो शौचालय चोरीला गेल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. या भ्रष्टाचाराबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी करुनही काही एक कारवाई केली जात नसल्याने गावांचा विकास होण्याऐवजी गावची गाव भकास होत आहेत यामागील कारण म्हणजे या भ्रष्टाचारात पदाधिकारी, अधिकारी सगळेच सामिल असल्यामुळे (हम भी नकटे, तुम भी नकटे, सब नकटोका मेला है, एक अलबेला था वो आज हमारा चेला है.) असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. परंतु या सर्व भ्रष्टाचाराची सखोल चौकशी होऊन संबंधितांवर कठोर कारवाई करुन अपहाराची रक्कम वसूल करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.

ब्रेकिंग बातम्या