पिंपळगाव हरेश्वर ग्रामपंचायतीचे १७ सदस्य अतिक्रमणच्या भोवऱ्यात, चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे आदेश.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२३/०३/२०२२
पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर हे गाव मोठ्या लोकसंख्येचे गाव असून येथील ग्रामपंचायतीचे १७ सदस्य आहेत. यापैकी बऱ्याचशा सदस्यांनी तसेच त्यांच्या रक्ताच्या नात्यातील व परिवारातील सदस्यांनी शासकीय जागेवर अतिक्रमण करून जागा बळकावून काहींनी पक्की घरे, बंगले बांधली असून काहींनी गरजेनुसार गोडाऊन, पत्री शेड व वेगवेगळ्या मार्गाने सत्तेचा, पदाचा गैरवापर करुन जागा हडप केल्या असल्याची चर्चा मागील काही वर्षांपासून सुरु आहे.
या गैर प्रकारामुळे रहदारीला अडथळा तसेच इतर कामांसाठी जागा उपलब्ध होत नसल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते हीच बाब लक्षात घेऊन भोजे येथील निलेश उभाळे यांनी वरिष्ठांकडे दिनांक २७ ऑक्टोबर २०२१ बुधवार रोजी अर्जाव्दारे तक्रार करुन पिंपळगाव हरेश्वर ग्रामपंचायतीचे १७ सदस्यांच्या अतिक्रमण केलेल्या जागांचे मोजमाप होऊन ज्या सदस्यांचे अतिक्रमण आढळून येईल त्यांच्यावर कारवाई होऊन त्यांचे सदस्यत्व त्वरित रद्द करण्यात यावे अशी मागणी केली होती. या अर्जाची दखल न घेता चालढकल केली जात होती म्हणून निलेश उभाळे यांनी दिनांक ०४ फेब्रुवारी २०२२ शुक्रवार रोजी पाचोरा पंचायत समितीकडे पुन्हा तक्रार करुन कारवाईची मागणी केली होती.
या तक्रारी अर्जाची दखल घेत पाचोरा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी पिंपळगाव हरेश्वर ग्रामपंचायतीवर कार्यरत असलेले ग्रामविकास अधिकारी यांना दिनांक १४ मार्च २०२२ सोमवार रोजी एक पत्र देऊन ग्रामपंचायत सदस्य, त्यांचे नातेवाईक यांची अतिक्रण संदर्भात चौकशी करून कारवाई करणे बाबत. आदेश दिले असून सात दिवसाचे आत अहवाल मागविण्यात आला आहे. हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य वा त्यांच्या परिवारातील व्यक्ती नातेवाईक यांनी शासकीय अतिक्रण केलेले दिसून असल्यास त्यांच्या विरुद्ध पुढील कार्यवाही साठी प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयास सादर करता येईल. या बाबत आपण टाळाटाळ किंवा हयगई केल्यास पुढील होणाऱ्या कार्यवाहीस आपण व्यक्तीशः जबाबदार राहाल याची नोंद घ्यावी असे सूचीत केले आहे.
असे असलेतरी अद्यापपर्यंत एकही ग्रामपंचायत सदस्यांच्या जागेचे मोजमाप झालेले नसल्याने पिंपळगाव हरेश्वर गावातून सूज्ञ नागरिक तसेच तक्रारदार यांचे या विषयाकडे लक्ष लागले असून वरिष्ठांनी दिलेल्या आदेशानुसार ग्रामविकास अधिकारी आदेशाचे पालन करून ग्रामपंचायत सदस्यांच्या जागेचे मोजमाप करुन अहवाल सादर करतात किंवा नाही हे दिसून येईलच
(आज बातमी लिहून होईपर्यंत आदेशाची अमलबजावणी झालेली नसून या बाबतीत खुलासा घेण्यासाठी पिंपळगाव हरेश्वर ग्रामपंचायतीवर कार्यरत असलेले ग्रामविकास अधिकारी यांचेशी संपर्क साधला असता संबंधित ग्रामविकास अधिकारी यांनी फोन न स्विकारता कट केल्याने माहिती मिळू शकली नाही. )