सांडपाण्याच्या गटारी बुजवून टाकल्यामुळे भोजे गावात घाणीचे साम्राज्य ज्ञानेश्वर चौथे यांची तक्रार.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१५/०६/२०२२
पाचोरा तालुक्यातील भोजे गावात काही ग्रामस्थांनी सांडपाण्याच्या गटारीवर अतिक्रमण करुन त्यात मुरुम, मातीचा भराव टाकल्यामुळे सांडपाणी वाहून जात नसल्याने आसपासच्या ग्रामस्थांच्या घरासमोर डबके मोठमोठे डबके तुंबले असल्याकारणाने या डबक्यांमुळे गल्लीबोळात चिखल निर्माण झाला असून या परिसरातील डबक्यात डासांची उत्पत्ती झपाट्याने होत आहे. या कारणांमुळे भोजे येथील नवीन प्लॉट भागातील गट नंबर ७६ मध्ये चिखल, पाण्याचे डबके, दुर्गंधी तसेच डासांचा उपद्रव वाढला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की पाचोरा तालुक्यातील भोजे येथील नवीन प्लॉट भागातील गट नंबर ७६ मध्ये असलेल्या प्लॉट नंबर ३६ मधील रहिवासी बाळकृष्ण गोविंदा जाधव व पांडुरंग दशरथ जाधव यांनी भोजे गावात ग्रामपंचायतीने बनवलेल्या सिमेंटच्या बांधलेल्या पक्क्या गटारीवर अतिक्रमण करुन त्या गटारी बुजवून टाकल्यामुळे या परिसरातील सांडपाणी वाहून जाण्यासाठी मोठा अडथळा निर्माण झाला असल्याकारणाने या परिसरातील सांडपाणी वाहून जात नसल्याने या भागात भररस्त्यावर पाण्याचे डबके साचून याठिकाणी एकप्रकारे तलाव तयार होत असल्याने या सांडपाण्याच्या डबक्यामुळे डासांची उत्पत्ती झपाट्याने होत असून आम्हाला डास तसेच दुर्गंधीमुळे खूपच त्रास सहन करावा लागत असून आमच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. अशी तक्रार भोजे येथील ज्ञानेश्वर गणपत चौथे यांनी निवेदनाद्वारे भोजे ग्रामपंचायतीकडे केली आहे.
तसेच या रस्त्यावर पाणी साचत असल्याने वाहतूकीला अडथळा येत आहे. म्हणून आता या सांडपाण्याच्या गटारीवर अतिक्रमण त्वरित काढण्यात यावे याकरिता आम्ही भोजे ग्रामपंचायतीकडे ०९ सप्टेंबर २०२१ रोजी विनंती अर्ज दाखल केला होता परंतु याची दखल ग्रामपंचायतीने न घेतल्याने दिनांक ३० सप्टेंबर २०२१ पुन्हा कर्ज देऊनही काहीएक फायदा होत नसल्याने आम्ही सरतेशेवटी २९ मार्च २०२२ रोजी पाचोरा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे लेखी स्वरूपात निवेदन देऊनही आजपर्यंत आमची मागणी लक्षात घेऊन सांडपाण्याच्या गटारीवर असलेले अतिक्रमण काढण्यात आलेले नाही.
आता पावसाळा सुरु झाला असून या गटारी वरील अतिक्रमण न काढल्यास पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी मोठा अडथळा निर्माण होईल तरी येत्या आठ दिवसात या गटारींची साफसफाई न झाल्यास आम्हाला नाविलाजस्तव आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल असा इशारा अर्जदार ज्ञानेश्वर गणपत चौथे, अर्जून गणपत चौथे, दत्तु चौथे यांनी दिला आहे.