भोकरी (वरखेडी) गावात लोंबकळणाऱ्या विद्युत तारा, जिवीतहानी होण्याची शक्यता.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०६/१०/२०२२
पाचोरा तालुक्यातील वरखेडी येथून जवळच असलेल्या भोकरी गावातील विद्युत खांबांवर टाकण्यात आलेल्या विद्युत तारा लोंबकळत असल्याने या गावात एखाद्यावेळेस जिवीतहानी होऊन मोठा अनर्थ होऊ शकतो अशी भिती व्यक्त करण्यात येत आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की भोकरी हे गाव संपूर्ण मुस्लिम समाजबांधवांच्या वस्तीचे गाव असून या गावातील जवळपास नव्वद टक्के लोक हे शेतमजूर व छोटेमोठे व्यवसायीक आहेत. यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती जेमतेम असून यांची रहाण्यासाठी ची घरे ही कच्या वाटा, मातीची तर काहींची फळ्या व पत्रांची असल्याने अत्यंत कमी उंचीची आहेत.
या गावात पथदिवे व व्यक्तिगत वापराच्या विद्युत पुरवठ्यासाठी विद्युत खांब उभारण्यात आले आहेत. परंतु हे विद्युत खांब उभारतांना विद्युत वितरण कंपनीचे अभियंता तसेच संबंधित ठेकेदार किंवा विद्युत वितरण कंपनीकडून कोणत्याही प्रकारची दखल न घेता भररस्त्यावर, घराजवळ, रहदारीच्या ठिकाणी मनमानीपणे उभारले असल्याने या विद्युत खांबांवर विद्युत वाहिनीच्या तारा टाकतांना कोणतीही काळजी न घेता विद्युत वाहिनीच्या तारा टाकून आपले काम करुन मोकळे झाले आहेत.
अश्या या मनमानी कारभारामुळे भोकरी गावातील विद्युत खांब व त्यावर टाकण्यात आलेल्या विद्युत वाहिनीच्या तारा ह्या व्यवस्थीत ओढल्या नसल्याने काही ठिकाणी या तारा जमिनीपासून फक्त आणि फक्त सात ते आठ फुटांवर लोंबकळत आहेत. तर काही ठिकाणी विद्युत वाहिनीच्या तारा थेट कमी उंचीच्या घरांच्या त्यावरुन तर काही तारा काही घरांच्या खिडकी, दरवाजे व वापराच्या हमरस्त्यावर लोंबकळत आहेत. याबाबत विद्युत वितरण कंपनीकडे वारंवार तक्रारी करुनही काहीएक फायदा होत नसल्याने भोकरी ग्रामस्थ वैतागले असून या लोंबकळणाऱ्या विद्युत तारांमुळे दैनंदिन कामकाज करतांना जिव मुठीत घेऊन वावरावे लागत असल्याचे सांगत या विद्युत तारांची व खांबाची दुरुस्ती न केल्यास एखाद्यावेळेस जिवीतहानी होऊन मोठा अनर्थ होऊ शकतो अशी भिती व्यक्त केली जात आहे.