वाडी शेवाळे येथे शिवजयंती मिरवणुकीस गालबोट,डीजेच्या गाडीचा धक्का लागल्याने एक बालक ठार तर तीन गंभीर जखमी.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२१/०२/२०२२
पाचोरा तालुक्यातील वाडी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मिरवणूक सुरू असतांना अतिशय विपरीत घटना घडली असून मिरवणुकीत डीजेची गाडी मागे पुढे करत असतांना भिंतीला धक्का लागल्याने भिंतीचा वरील भाग अचानक चार बालकांच्या अंगावर कोसळल्याने इयत्ता सहावीच्या वर्गात शिकणारा १२ वर्षाचा मुलगा जागेवरच ठार झाला. काही भाग कोसळत असतांना एका २२ वर्षाच्या युवकाने भिंतीचा कोसळणारा भाग मानेवर तोलून घरल्याने त्याच्या शरीराखाली असलेले दोन बालकांना किरकोळ जखमा झाल्या मात्र भिंतीला थांबवून धरणारा युवक गंभीर झाल्याची घटना घडली आहे. ह्या विचित्र घटनेमुळे संपूर्ण गावात व परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मयत बालकावर मोठ्या शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.
पाचोरा तालुक्यातील वाडी येथे दरवर्षाप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली. मात्र सायंकाळी सात वाजेच्या दरम्यान सदरील मिरवणूक दिगंबर नथ्थू पाटील यांचे घराजवळ आली असतांना पुढे वाहन जाण्यासारखा रस्ता नसल्यामुळे डीजे असलेले वाहन मागेपुढे घेत असतांना वाहनाचा धक्का भिंतीला लागल्याने भिंती वरील काही भाग अचानक कोसळुन हर्षल गोकुळ पाटील (खंबाट) या १२ वर्षाच्या बालकाच्या अंगावर कोसळला भिंतीला लावलेल्या जुनाट व मोठमोठ्या विटा असल्याने त्या खाली तो दाबला जावून त्याच्या मेंदूला जबरी मार लागल्याने त्याचा जागेवरच मृत्यू झाला. त्याचा मृत देह बाहेर काढल्या नंतर काही युवक पडलेल्या विटा बाहेर काढत असतांना त्यांना हर्षलच्या पायाची हाडे सापडली. तर यात प्रदिप प्रकाश तळेकर (वय – २२), रोहित विनोद गव्हांडे (वय – १२) व साही रामेश्वर शिंदे (वय – १०) हे तीन बालके गंभीर जखमी झाले. जखमीवर पाचोरा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मयत हर्षल गोकुळ पाटील यांचे शवविच्छेदन ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे यांनी केले. त्याचे पाच्छात आई, वडील व एक मोठा भाऊ असा परिवार आहे. मयत बालकावर दुपारी दोन वाजता अतिशय शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे परिसरात मोठी शोककळा पसरली आहे.