पुरवठा विभागात सावळा गोंधळ, पाचोरा तालुक्यात तांदूळाचे उत्पादन दाखवा व बक्षीस मिळवा, हरीभाऊ पाटील यांचे आव्हान.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२७/०६/२०२२
ज्या जिल्ह्यात, तालुक्यात किंवा गावागावातून शेतकरी आपापल्या शेतात जो शेतीमाल घेतात तोच बाजारात विकला जातो. परंतु पाचोरा तालुक्यातील नव्हे तर आसपासच्या जिल्ह्यातील शेतकरी तांदूळ हे पिक घेत नसतांना ही पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केटमध्ये चक्क तांदळाचा लिलाव होतो. मात्र याठिकाणी दिवसाढवळ्या तांदळाचा लिलाव होत असला तरी मात्र खरेदीविक्रीची नोंद (पावती) करतांना इतर वाणांची पावती बनवून दिली जाते तसेच स्वस्त धान्य दुकानातून वाटण्यात येणारा गहू सुध्दा येथे विकला जात असल्याने सर्वसामान्य व सुज्ञ नागरिकांनी याबाबत पुरवठा विभागात चाललेल्या भोंगळ कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
तसेच पाचोरा तालुक्यातच काय जळगाव व आसपासच्या धुळे, औरंगाबाद, या जिल्ह्यात कुठेही तांदूळ उत्पादक शेतकरी दाखवा व बक्षीस मिळवा असे खुले आव्हान करत बल्लाळेश्वर युवा फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. हरीभाऊ तुकाराम पाटील यांनी पुरवठा विभाग व धान्य वितरण विभागावर ताशेरे ओढत दरमहा मोफतचे व शासनमान्य दरात मिळणारे धान्य गोरगरिब रेशनकार्ड धारकांना मिळत नाही. तसेच पुरवठा विभागातील तसेच शिक्षण विभागातील शालेय पोषण आहारात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्यचा आरोप केला आहे.
या होणाऱ्या भ्रष्टाचाराबाबत मा. प्रांताधिकारी, मा. तहसीलदार साहेब यांनी जातीने लक्ष घालून हा होणारा भ्रष्टाचार त्वरित थांबवावा अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा बल्लाळेश्वर युवा फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मा. हरीभाऊ तुकाराम पाटील यांनी दिला आहे.