वडगाव जोगे येथील अल्पभूधारक शेतकऱ्याची आत्महत्या.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०७/०१/२०२२
पाचोरा तालुक्यातील अंबे वडगाव येथून जवळच असलेल्या वडगाव जोगे येथील एका अल्पभूधारक शेतकऱ्याने सततच्या नापिकीमुळे व डोक्यावर असलेल्या कर्जाचे बोजाला वैतागून विषारी द्रव सेवन करुन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
संतोषच्या पाश्चात्य पत्नी, दोन मुले व एक मुलगी हा परिवार.
याबाबत सविस्तर वृत्त असे की अंबे वडगाव येथून जवळच असलेल्या वडगाव जोगे येथील संतोष छाजू चव्हाण वय पन्नास वर्ष या अल्पभूधारक शेतकऱ्याकडे चार एकर कोरडवाहू शेतजमीन आहे. निसर्गाच्या सततच्या लहरीपणामुळे व शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने कोरडवाहू शेती करुन घरसंसार चालवणे कठीण जात होते.म्हणून संतोष चव्हाण यांनी कर्ज घेऊन संसाराचा गाडा ओढण्यासाठी सुरवात केली. त्यांनी बँक ऑफ महाराष्ट्र कडून १,७०,००० रुपये कर्ज घेऊन परत उमेदीने शेती करण्यासाठी कंबर कसली व यावर्षी तरी चांगले पिक येईल व आपण कर्जफेड करुन राहिलेल्या रकमेत संसाराचा गाडा ओढू अशी आशा बाळगत पुन्हा नव्या उमेदीने शेती मशागत करुन शेती केली.
मात्र नियतीला ते मान्य नसावे म्हणून निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतातील पिके हातची वाया गेली. कोरडवाहू शेती असल्याने दुबार पिक घेणे शक्य नव्हते याच संकटात संतोष यांना योगेश वय २३ वर्षे, गिरीश वय १३ वर्षे ही दोन मुले कु. भारती वय १७ वर्षे ही एक मुलगी यांचा शिक्षणाचा खर्च तसेच मुलगा उपवर झाला असून त्याच्या व एक वर्षानंतर मुलीच्या लग्नाची चिंता संतोषच्या मनात घर करुन बसली होती. त्यातल्यात्यात पत्नी निर्मला हीला दवाखान्यात खर्च लागला होता. अश्या कठीण परिस्थितीत दोनवेळेच्या भाकरीचा प्रश्न सोडवण्यासाठी संतोषने त्यांच्या ओळखीच्या लोकांकडून कर्ज घेतले होते.
यावर्षीही सततच्या पावसाने शेतातील पिक होत्याचनव्हत झाल्याने शेती मशागत, बि, बियाणे, खते, फवारणी, शेत मशागतीच्या कामासाठी लागलेला खर्च हाती आला नाही व त्यातच बँकेचे व खाजगी कर्ज कसे फेडावे या विवंचनेत व संसाराचा गाडा ओढणे मुश्कील झाल्याने संतोष चव्हाण याने दिनांक २१ डिसेंबर २०२१ मंगळवार रोजी सायंकाळी स्वतःच्या शेतात कोणतेतरी विषारी पदार्थ सेवन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची बाबा संतोष हा सायंकाळी उशीरापर्यंत घरी न आल्यामुळे घरच्यांनी शेतात जाऊन पाहिले असता लक्षात आला.
संतोष हा शेतात बेशुद्ध अवस्थेत पडून आढळून आला. जवळ जाऊन बघीतले असता संतोषने काहीतरी विषारी पदार्थ सेवन केल्याचे लक्षात येताच त्याच्या नातेवाईकांनी संतोषला लगेचच उपचारासाठी पाचोरा येथील सरकारी दवाखान्यात नेले मात्र पाचोरा येथील सरकारी दवाखान्यात डॉक्टर उपलब्ध नसल्याने आर्थिक परिस्थिती नसतांनाही त्याला पाचोरा येथीलच एका खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. तेथे प्रथमोपचार करुन परिस्थिती गंभीर असल्याकारणाने पुढील उपचारासाठी त्याला नातलगांनी पैसा जमा करुन औरंगाबाद येथील कमलनयन बजाज येथे नेऊन उपचार सुरु केले.
औरंगाबाद येथील कमलनयन बजाज दवाखान्यात उपचार सुरु असतांनाच संतोषची प्रकृती अजूनच खालावली तसेच संतोषचे शरीर औषधोपचारला साथ देत नसल्याचे लक्षात आल्यामुळे तज्ञ डॉक्टरांच्या मते आता पुढील उपचार करणे शक्य नसल्याचे सांगत संतोषला घरी घेऊन जाण्याचा सल्ला दिला व दिनांक ०२ जानेवारी २०२२ रविवार रोजी औरंगाबाद येथून दवाखान्यातून सुट्टी करुन घेत पुढील उपचारासाठी मुंबई येथे नेऊन फायदा होईल का ? याचा तपास करतच संतोषला वडगाव जोगे येथे घरी आणून दुसऱ्यादिवशी मुंबईतील दवाखान्यात उपचारासाठी नेण्यासाठी हालचाली सुरु झाल्या पुढील उपचारासाठी नातलगांनी पैशाची जमवाजमव सुरु केली होती मात्र नियतीला ते मान्य नसावे म्हणून की काय ०२ जानेवारी रविवार रोजी रात्री साडेदहा वाजता संतोषने शेवटचा श्वास घेतला व या जगाचा निरोप घेतला.
संतोष एका छोट्याश्या बंजारा वस्तीतील वडगाव जोगे येथील अल्पभूधारक (कोरडवाहू) शेत जमीनीवर काबाडकष्ट करुन निसर्गाच्या लहरीपणाचा सामना करत जीवन जगण्यासाठी धडपड करणारऱ्या कुटुंबातील व्यक्ती परंतु सततची नापिकी, घरात लग्नाच्या वयातील मुलगा व मुलगी सोबतच पत्नी व लहान मुलगा यांच्यासह चार एकर जमीन यात राबराबराबुन मुलांचा शैक्षणिक खर्च, घरसंसारासाठी लागणारा खर्च, त्यातच अधुनमधून दवाखाना, इतर सामाजिक रुढी परंपरेनुसार सगेसोयरे व नातलगांना लागणारा खर्च डोक्यावर दिवसेंदिवस वाढणारा कर्जाचा डोंगर व तो उतरवण्यासाठी कोणताही पर्याय नसल्याने व घरातील सदस्यांची आर्थिक अडचणीमुळे झालेली दयनीय परिस्थीतीत व त्यांची होणारी घुसमट संतोषला पहाणे असाह्य झाल्याने सरतेशेवटी रोज, रोज मेल्यासारखे जीवन जगण्यापेक्षा त्याने सायंकाळी शेतात कुणीही नसतांना एकांतात जाऊन कोणतातरी विषारी पदार्थ घेऊन स्वताच्या जीवनाचा त्याग करण्याच्यादृष्टीने आत्महत्या केली.
या संतोषच्या जाण्यामुळे संतोषची पत्नी, दोन मुले, एक मुलगी आज उघड्यावर आली आहेत. म्हणून शासनाने या कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केलेल्या कुटुंबाला लवकरात लवकर मदत द्यावी अशी मागणी पंचक्रोशीतुन होत आहे.