अज्ञात व्यक्तीने दिड एकर क्षेत्रातील कपाशी पिकावर तन नाशक फवारणी केल्याने शेतकऱ्याचे दिड लाख रुपये नुकसान.

सुनील लोहार.(कुऱ्हाड)
दिनांक~०१/०९/२०२२
(कुत्र्याला गती व माणसाला प्रगती सहन होत नाही)
पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड खुर्द येथील शेतकरी श्री. शंकर शहादू जगदाळे यांच्या मालकीची वाकडी शिवारात गट नंबर २०५ शेत जमीन आहे. या शेतात त्यांनी यावर्षी कपाशीची लागवड केली आहे. हे कापसाचे पिक जोमाने बहरले असतांनाच एका अज्ञात इसमाने वाईट हेतूने सुमारे दीड एकर क्षेत्रावरील कपाशी पिकावर रात्रीच्या वेळेस तन नाशक फवारणी केल्यामुळे कपाशीची झाडे सुकून गेल्याने शेतकऱ्याचे अंदाजे दिड लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले असून आजपर्यंत केलेली मेहनत व या उत्पन्नातून भविष्यात रंगवलेल्या स्वप्नांचा चुराडा झाला आहे.
ही बाब शंकर जगदाळे हे सकाळी शेतात गेले असता उघडकीस आली आहे. शंकर जगदाळे यांनी चतुर शेतकऱ्यासारखी मेहनत केल्यामुळे त्यांच्या शेतातील कापूस पीक हे शिवारात एक नंबर असून पीक ऐन बहरात, फुलपाती, माल पक्व होण्याच्या अवस्थेत असल्या कारणाने कुबुद्धि असलेल्या कोणाकडून हे बघितले न गेल्याने दृष्ठ हेतूने असा प्रकार केला असावा असल्याची चर्चा कुऱ्हाड गावातील शेतकऱ्यांमध्ये सुरु होती.
सद्यस्थितीत कापसाला चांगला भाव मिळणार असल्याची शक्यता असल्याकारणाने शेतकरी स्वता उपाशीपोटी राहुन पीक चांगले यावे म्हणून वेळेवर खत, पाणी, फवारणी, कोळपणी करुन पोटच्या लेकराप्रमाणे कपाशी पिकाला जीव लावत असतो आणि यातून असे प्रकार जर होत असतील तर शेतकऱ्याला आत्महत्याशिवाय दुसरा पर्यायच रहात नाही म्हणून कोणीही असे प्रकार करू नये असे भावनिक आवाहन उपस्थित शेतकऱ्यांनी केले.