अंबे वडगाव येथील गावठी दारु विरोधात पोलीसांची कारवाई, गावठी दारू विक्रेत्याची खुलेआम शिवीगाळ

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०१/०९/२०२२
पाचोरा तालुक्यातील व पिंपळगाव हरेश्र्वर पोलीस स्टेशनचे हद्दीतील अंबे वडगाव, अंबे वडगाव खुर्द, अंबे वडगाव बुद्रुक येथे गावठी व देशी दारुची विक्री मोठ्या प्रमाणात वाढली होती. याची दखल घेऊन पिंपळगाव हरेश्र्वर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. श्री. वाघमारे साहेब यांनी मागील महिन्यापासून त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने वरील गावात वॉश आऊट मोहीम हाती घेतली आहे. यामुळे अवैध धंदे करणारांची गोची झाली असून त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.
(कायद्यातील पळवाटा व या अवैध धंदे करणारांची पाठराखण करणारे काही स्वयंघोषित प्रतिष्ठित यांच्यामुळे या अवैध धंदे करणारांची हिंमत वाढली असून या अवैध धंदे करणारांनी पोलीसांवर हात उचलण्याची मजल गाठली आहे. म्हणून अशा अवैध धंदे करणारांवर हद्दपारी ची कारवाई का करण्यात येऊ नये असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.)
पिंपळगाव हरेश्र्वर पोलीस स्टेशनचे पोलीस हेड कॉन्स्टेबल मा. श्री. रणजित पाटील व पोलीस कॉन्स्टेबल मा. श्री. संदिप राजपूत यांनी दिनांक ३१ ऑगस्ट २०२२ बुधवार रोजी अंबे वडगाव येथील अवैधरित्या गावठी दारू विकणाऱ्या तसेच जुगार खेळत असलेल्या ठिकाणी धाड टाकली होती. परंतु संबंधित दारु विक्रेता व जुगार खेळणारे पळून जाण्यात यशस्वी झाले होते. या पोलीसांच्या सततच्या कारवाईमुळे अंबे वडगाव गावातील सुज्ञ नागरिक व विशेष करुन महिलावर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे.
मात्र दुसरीकडे पिंपळगाव हरेश्र्वर पोलीसांनी अवैध धंदे करणारांवर सतत धाडसत्र सुरु केल्यामुळे अवैध धंदे करणारांची गोची झाली असल्याने या कारवाईचा मनात राग धरून अंबे वडगाव येथील एका गावठी दारू विक्रेत्याने दिनांक ०१ सप्टेंबर २०२२ गुरुवार रोजी सकाळी साडे आठ ते नऊ वाजेच्या दरम्यान अंबे वडगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर येऊन पिंपळगाव हरेश्र्वर पोलीसांना तसेच ग्रामस्थांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत आमच्या विरोधात गावातून कोण तक्रार करतो त्याला पाहून घेऊ अशी धमकी देत तोंडसुख घेतले व गावात दहशत माजवण्याच्या हेतुने केविलवाणा प्रयत्न केला आहे.