पाचोरा पोलिसांना अंधश्रद्धा निर्मूलन कायदा माहीत नसल्याचे झाले उघड, म्हणूनच या युगात अजूनही बोलतय अंधश्रदेच घुबड.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२८/११/२०२१
पाचोरा तालुक्यातील सारोळा खु।। येथिल ५० वर्षिय शेतीव्यवसाय करणाऱ्या रंजनाबाई रमेश पाटील या महीला कुटूंबावर जादूटोणा करते असा आरोप करत सारोळा येथीलच एका अंधश्रद्धेने पछाडलेल्या देवीदास धोंडू पाटील व त्यांच्या कुटुंबाने रंजनाबाईचा छळ करत मी करणी कवटाळ करत नाही मी तशी नाही हे सिद्ध करण्यासाठी शुद्ध दादागिरी करत दमदाटी करून रंजनाबाई पाटील यांना अंगावर ओले वस्र परिधान करुन गावातिल मारोती मंदिरावर पाणी टाकुन पूजा विधी करणेस भाग पाडल तसेच सदर महिला व तिच्या कुटुंबियांना मानसिक त्रास दिल्याने पीडित रंजनाबाई यांनी त्रासाला कंटाळुन पाचोरा पोलिसात धाव घेतली असता पाचोरा पोलिसांनी रंजनाबाईचा तक्रारी अर्ज घेऊन फक्त आणि फक्त अदखलपात्र गुन्हा नोंदवून घेत अधिक न्याय मागणीसाठी न्यायालयात जाण्यासाठीचा सल्ला दिला आहे. विशेष म्हणजे गावात ही घटना घडत असतांना याच गावातील ग्रामस्थ व पोलीस पाटील या घटनेचे साक्षीदार असतांनासुद्धा पाचोरा पोलिसांनी आपली मती व नीती गहाण ठेवत न्यायालयात जाण्याचा तुघलकी सल्ला दिल्यामुळे पाचोरा पोलिसांना अजूनही कायदेविषयक शिक्षण देण्याची गरज असल्याचे दिसून येते.
कारण या घडलेल्या घटनेप्रमाणे महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन कायद्यांतर्गत गुन्हा होणे गरजेचे असतांना फक्त अदखलपाञ गुन्हा नोंद करून घेत न्यायालयात जाउन दाद मागण्याचा तुघलकी सल्ला दिला असल्याने सारोळे गावासह पाचोरा तालुक्यातील सुज्ञ नागरिक व जनतेतून पाचोरा पोलिसांची विरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
याबाबत सविस्तर वृत्त असे की या घडीला प्रकरणी रंजनाबाई पाटिल यांनी पाचोरा पोलिसांना तक्रारी अर्ज दिला असुन त्यात नमुद करण्यात आले आहे की,त्या त्यांच्या पति,मुलगा व सुन सह सारोळा खु।। येथे राहतात. त्यांचे नातेवाईक देविदास धोंडू पाटील, मंगलाबाई देविदास पाटील, अनिल देविदास पाटील, मयुरी अनिल पाटील, गणेश देविदास पाटील, ज्योती देविदास पाटील व विलास शिंदे हे प्रचंड अंधश्रध्दा पाळणारे आहेत.मला व माझ्या कुटूंबाला कायम विनाकारण त्रास देत आहेत. वरील आरोपींनी माझ्यावर, मी त्यांच्या कुटूंबावर, शेती व पाळीव जनावरांवर जादु टोना करते, करणी करते, भानामती करुन त्यांचे पिकांचे व उत्पन्नाचे नुकसान करते असा आरोप करीत मला व माझ्या पति व मुलांना शिवीगाळ करणे, टोमणे मारुन अपमान करणे, घरासमोर लिंबु वगैरे कापुन टाकणे असे मानसिक त्रास देणे चार वर्षांपासुन सुरु होते.सुमारे ६ महीन्यांपुर्वी अनिल याचे मयूरी हिचेशी लग्न झाले.दोन महिन्यापासुन मयुरी पाटील हिचे अंगात माझा प्रवेश झाला आहे व मी त्याद्वारे आरोपींच्या कुटुंबीयांना त्रास देत असुन करणी,भानामती करुन तीला त्रास देते.तीच्या अंगात येते, ती सर्व कुटूंबाचे नावे सांगुन त्यांचा सुड घेणार आहे असे मी अंगात येवुन सांगते असा माझ्यावर आरोप करुन मला व माझ्या कुटूंबाला त्रास देणे सुरु केले आहे.
त्यानंतर २४ नोहेंबर रोजी गरोदर गाईचा मृत्यु झाला तेव्हा या गाईच्या मृत्यूस मला कारणीभूत ठरवत अनिल यांचे सासरे विलास शिंदे यांनी खालच्या भाषेत मला शिवीगाळ करण्यास सुरवात केली. मला लाज वाटत होती इतक्या खालच्या स्तरावरुन शिवीगाळ केली. तेव्हा गावातील माजी सरपंच शिवदास पाटील यांनी त्यांची समजुत घालण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी काही ऐक ऐकले नाही. व मारहाण सुरू केली आम्ही जीव वाचवण्यासाठी ओरडलो तेव्हा शेजारी व गावचे पोलीस पाटील यांनी मला व माझ्या पतीला वाचवले. व आमच्यामुळे गाय दगावली याचा पुरावा मागीतला असता डोंगरगावचा शंकर कोळी आणि घाटावरचा भगत यांच्याकडुन आम्हाला माहीती मिळाल्याचे समंधित सांगतात.
त्यानंतर त्यांनी मला सांगीतले की तु जर आमच्या सुनेवर करणी केली नसेल तर तुला ओल्या वस्त्रानिशी गावच्या मारुतीच्या मंदीरात येवुन देवावर पाणी टाकावे लागेल. मला व माझ्या कुटूंबाला मी त्यांच्या सांगण्याप्रमाणे वागले तर यापुढे ते त्रास देणार नाहीत व आरोपही करणार नाही असेही त्यांनी सांगीतले. या प्रसंगी गावातील शिवदास पाटील, रविंद्र मधुकर पाटील, पोलीस पाटील सिद्धार्थ युवराज अहीरे, तसेच धनराज महादु इजारे हे हजर होते. त्यांनीच आमचे कुटूंबाची या सर्व घटनेतुन सुटका केली. मी सततच्या त्रासाला कंटाळून आमच्या जिवाच्या भितीमुळे मी त्यांचे सांगण्याप्रमाणे गावातील मारुती मंदीरावर ओल्या वस्त्रानिशी गेले व देवावर पाणी ओतले.
हे करत असतांना आरोपींनी गावातुन माझी धिंड काढून माझा प्रचंड अपमान केला. तेव्हा अनिल यांने मला मारहाण देखील केली. तसेच वरील आरोपी रस्त्याने जातांनाही मला शिवीगाळ करीत होते हीला जीवे ठार मारा असे लोकांना प्रोत्साहन देत म्हणत होता. यावेळी गावातील व बाहेर गावचे भरपुर लोक होते पण दहशतीमुळे मला वाचवायला कुणीही पुढे आले नाही. याप्रसंगी देखील रविंद्र मधुकर पाटील, पोलीस पाटील सिद्धार्थ युवराज अहीरे, तसेच धनराज महादु इजारे व मुरलीधर कोंडीबा भवर हे साक्षीदार हजर होते.
त्यानंतर आज सकाळी मला व माझ्या पतीला व मुलाला शिवीगाळ केली व माझ्या सुनेचे केस ओढून तीला मारहाण केली या सर्व घटनेने माझी प्रचंड आब्रु गेली असुन मला आता बाहेर जायची देखील लाज वाटते.तसेच गावातील लोक देखील वेगळ्या नजरेने माझ्याकडे बघतात. आमच्या कुटूंबाला अश्याप्रकारे प्रचंड माणसिक त्रास देवुन , शिवीगाळ व मारहाण करुन तसेच जादुटोना, करणी सारखे बिनबुडाचे आरोप करुन तसेच मला ओल्या वस्त्रानिशी गावातुन धिंड काढुन मदीरातील मारुती देवाच्या अंगावर पाणी टाकण्यासारखे अघोरी कृत्य मला करायला लावले म्हणुन माझी त्यांचे विरुध्द कायदेशीर
फिर्याद देत असल्याची तक्रार दिली आहे.
या प्रकरणी पाचोरा पोलिसात अदखलपाञ गुन्हा नोंदविण्यात आला असुन पुढिल तपास पोलिस निरिक्षक किसनराव नजनपाटिल हे करित आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी बजावलेल्या भूमिकेबद्दल सगळीकडे तर्क वितर्क लढवले जात असून पाचोरा पोलीस स्टेशन हे कायद्याचे राज्य नसून कायद्यायचे राज्य आहे असा आरोप केला जात आहे. कारण पाचोरा पोलीस स्टेशनला अशा बऱ्याच घटना घडत असून फिर्यादीलाच आरोपी करण्याचे, तसेच भ्रष्टाचार,अन्याय, अत्याचार, अवैध धंदे यांच्या विरोधात आवाज उठवणाऱ्यांना कटकारस्थान करून आरोपी करण्याचे षडयंत्र मोठ्या प्रमाणात सुरू आहे.