रक्षाबंधनानिमित्त माहेरी आलेल्या मुलीची गळफास घेत आत्महत्या, शेवाळे गावातील घटना.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१३/०८/२०२२
रक्षाबंधन हा सण भावा, बहिणीच्या अतुट नात्याचा पवित्र सण प्रत्येक भाऊ रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीकडून हातावर राखी बांधण्यासाठी आतुरतेने बहिणीची वाट पहात असतो व बहिणीला ही माहेरची ओढ लागलेली असते. याच रक्षाबंधनाच्या सणानिमित्त पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्र्वर पोलीस स्टेशनचे हद्दीतील शेवाळे गावात माहेरी आलेल्या एका विस वर्षीय तरुणीने वडीलांच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली असून या घटनेबाबत पिंपळगाव हरेश्र्वर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की पाचोरा तालुक्यातील शेवाळे येथील नानू शिवदास फादगे यांची एकुलती, एक कन्या उमा फादगे वय वर्षे (२०) हिचा विवाह जळगाव शहरातील खंडेराव नगर येथील रहिवासी सनी प्रेमनाथ उमप यांच्याशी दिनांक १८ मे २०२२ रोजी शेवाळे येथे मोठ्या थाटात पार पडला होता. लग्न झाल्यावर उमा हिचे दोन, तीन वेळा माहेरी येणे, जाणे झाले होते. उमा हि माहेरी आल्यानंतर हसतखेळत सासरी गेली होती. यावरुन ती तीच्या वैवाहिक जीवनात सुखी असल्याचे जाणवत होते. परंतु लग्नानंतरच्या पहिल्याच रक्षाबंधनासाठी आलेल्या उमाने आपल्या वडिलांच्या घरी येऊन गळफास घेऊन आत्महत्या का केली असावी असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
उमाचे वडील नानू फागदे हे रक्षाबंधनाच्या सणानिमित्त उमाला दिनांक १२ ऑगस्ट २०२२ शुक्रवार रोजी माहेरी घेऊन आले होते. उमा हि शेवाळे येथे माहेरी आल्यानंतर शेवाळे येथेच रहात असलेल्या तिच्या मावशी शिलाबाई सोमनाथ गायकवाड यांच्या घरी झोपण्यासाठी गेली होती. मावशीकडे गेल्यावर उमाने झोप येईपर्यंत सगळ्यांशी मनसोक्त गप्पा मारल्या व झोपी गेली. सकाळी १३ ऑगस्ट २०२२ शनिवार रोजी उमा झोपेतून उठून आपल्या स्वताच्या घरी आली व मला अंधोळ करायची आहे असे सांगून घरातील स्नानगृहाकडे गेली. उमा अघोळीला जाऊन बराचसा वेळ झाल्यावर वडिलांनाही अंघोळ करायची होती म्हणून त्यांनी उमाला आवाज देऊन अंघोळ झाली असेल तर लवकर सांग असा आवाज दिला मात्र आवाज देऊनही तिकडून काहिच प्रतिसाद न मिळाल्याने उमाच्या वडिलांनी घरात येऊन स्वयंपाक घरात डोकावून पाहिले असता त्या ठिकाणी दोरीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या परिस्थितीत उमा लटकलेली दिसली. हे दृश्य पाहून उमाच्या वडिलांनी एकच हंबरडा फोडला व जोरजोरात उर बडवत बाहेर निघेल.
नानू फादगे यांचा आक्रोश पाहून घरातील इतर सदस्य व गल्लीतील रहिवाशांनी नानू फादगे यांच्या घराकडे धाव घेतली असता उमाने स्वयंपाकघरात दोरखंड लावून फाशी घेतल्याचे दिसून आले. जमलेल्या लोकांनी लगेचच उमाला खाली उतरवून तातडीने पाचोरा येथील ग्रामीण रुग्णालयात घेऊन गेले असता वैद्यकीय अधिकारी मा. श्री. अमित साळुंखे यांनी तपासणीअंती उमाला मृत घोषित केले. तदनंतर उमा हिचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला असून या घटनेबाबत पुढील तपास उपविभागीय अधिकारी मा. श्री. भरतजी काकडे साहेब यांच्या आदेशावरून पिंपळगाव हरेश्र्वर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. श्री. महेंद्र वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल मा. श्री. राकेश खोंडे हे करीत आहेत.
उमाचे लग्न होऊन तीन महिने उलटले नाही तोवरच उमाने माहेरी येऊन गळफास घेण्याचे टोकाचे पाऊल का उचलले असावे असा प्रश्न उमाचे वडील व माहेरच्या मंडळींनी उपस्थित केला असून या घटनेबाबत शेवाळे गावातून हळहळ व्यक्त केली जात आहे.