कोरोनाच्या महामारीत नवजात बालिकेला मायेची उब कळण्याआधीच हरवले मातृछत्र.

पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड खुर्द येथील माहेर व चाळीसगाव जवळ असलेल्या पाटणा येथील सासरवाशीन असलेल्या व नुकतेच मागील वर्षी लग्न झालेल्या विवाहितेचा प्रसूतीनंतर कोरणा मुळे मृत्यू झाला. तिने तीन दिवसापूर्वी एका गोंडस मुलीला जन्म दिला होता. नुकत्याच जन्मलेल्या मुलीला आपल्या आईच्या कुशीत जाऊन स्थनपान करतांना आईच्या कुशीत मिळणारी मायेची उब व मायेचा स्पर्श कळण्याआधीच मातृछत्र हरवल्याने कुऱ्हाड गाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की सौ. ज्योती राजेंद्र जमादार वय २० रा. पाटणा ता .चाळीसगाव येथील सासर असलेली विवाहिता प्रसूतीसाठी पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड येथे आपल्या माहेरी आलेली होती. परंतु प्रसूती अगोदरच तीला कोरोनाची लागण झाल्यामुळे तिला तिच्या नातेवाईकांनी उपचारासाठी पाचोरा, जळगाव सारख्या ठिकाणी घेऊन गेले असता तिला संबंधित डॉक्टरांनी टाळाटाळ करत एकाही दवाखान्यात दाखल करून घेतले नाही.
उपचारासाठी गावपातळीपासून तर जिल्हापातळीवरील दवाखान्यात डॉक्टरांच्या विनवण्या करत असतांनाच या भटकंतीत जास्त वेळ गेल्यामुळे कोरोनाचा त्रास जास्त जाणवू लागल्याने घरची आर्थिक परिस्थिती साधारण असतांनाही तीच्या कुटुंबियांनी तीला शेवटी औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात दाखल केले.
तेथे उपचार घेत असतांनाच तीन दिवसापूर्वी प्रसूती होऊन तीने एका गोंडस मुलीला जन्म दिला. एकाबाजुला कन्यारत्न प्राप्त झाल्याचा मनोमनी आनंद होता परंतु दुसरीकडे कोरोनाने त्याचे रुद्र रुप धारण केल्याने उपचारादरम्यान परवा रात्री तिची तब्येत अधिकच खालावल्याने काल सकाळी सौ. ज्योती हिने आपल्या चिमुकलीला सोडून या जगाचा निरोप घेतला.
सौ.ज्योती ही कोरोनाबाधित असल्याने तिच्यावर काल दुपारी औरंगाबाद येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. अवघ्या तीन दिवसाच्या बालीकेचे मातृछत्र नियतीने तिच्यापासून हिरावून घेतल्याने कुऱ्हाड गावपरिसरातील जनमानसातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
विशेष म्हणजे एकच आठवड्यात दोन नवतरुण मातांचा प्रसूतीनंतर मृत्यू झाल्याने कुऱ्हाड गावावर शोककळा पसरली आहे.