स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त गावागावातून दिला जातोय घरघर तिरंग्याचा नारा,शाळकरी चिमुकल्यांच्या पायाखाली मात्र चिखल आणि गारा.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१३/०८/२०२२
आपल्याला स्वातंत्र्य मिळवून ७५ वर्षे पूर्ण होत असल्याने आपल्या भारत देशात १५ ऑगस्ट २०२२ सोमवार रोजी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. यानिमित्ताने हर घर तिरंगा उभारुन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात यावा म्हणून जनजागृती करण्यासाठी शासकीय, निमशासकीय, राजकीय पदाधिकारी, शैक्षणिक विभाग, सर्वसामान्य नागरिक हे हर घर तिरंगा मोहीम राबवण्यात व्यस्त आहे.
एका बाजूला याकरिता गावागावातील ग्रामपंचायत, शाळा, कॉलेज, विद्यालयाचे शिक्षक व विद्यार्थी आपापल्या गावपातळीवरील जनजागृती पर प्रभात फेरी काढून हर घर तिरंगा च्या घोषणा देत घराघरात स्वातंत्र्याच्या अमृत मोहत्सवाचे कार्यक्रमात सामील होण्यासाठी व घरा घरावर तिरंगा फडकवण्यासाठी जिवापाड प्रयत्न करत आहेत.
तर दुसरीकडे पाचोरा तालुक्यातील बऱ्याचशा ग्रामपंचायतीकडून या मोहिमेत पाहिजे तेवढे प्रयत्न होत नसल्याचे दिसून येते आहे. यात महत्वाचे म्हणजे बऱ्याचशा ग्रामपंचायतीकडून फक्त आणि फक्त ग्रामसेवक व कर्मचारी यांच्या भरवशावर कामकाज सुरु असून चालढकल केली जात आहे. यामुळे नळी फुंकली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे असा प्रकार सुरु आहे.
महत्वाचे म्हणजे १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्ताने गावागावातून शालेय विद्यार्थी प्रभातफेरी काढतात व मागील आठ दिवसांपासून जनजागृती करण्यासाठी दररोज हे विद्यार्थी गावातून हर घर तिरंगा, घर घर तिरंगा अशा घोषणा देत मोठ्या उत्साहात प्रभात फेरी (जनजागृती पर फेरी) काढत आहेत. परंतु काही गावांतील ग्रामपंचायतीच्या गलथान कारभारामुळे व पावसाळ्याचे दिवस असल्याने गल्ली, बोळात चिखल आणि गारा झाला आहे.
जेव्हा हे चिमुकले विद्यार्थी प्रभात फेरी काढून गावातून भटकंती करत घोषणाबाजी करतात तेव्हा मात्र एका बाजूला ‘हर घर तिरंग्याचा नारा, चिमुकल्यांच्या पायाखाली चिखल आणि गारा’ असे खेदाने म्हणावे लागेल व खरच आम्हाला स्वातंत्र्य मिळवून ७५ वर्षे झालीत तरीही आम्ही अजूनही चिखलातच आहोत हे मान्य करावे लागेल हे मात्र तेवढेच खरे.
असाच काहीसा गलथान कारभार पाचोरा तालुक्यातील वरखेडी, भोकरी, कुऱ्हाड, वडगाव आंबे, पिंपळगाव हरेश्र्वर व इतर बऱ्याचशा गावातून दिसून येते असून गावातील सांडपाणी व पावसाचे पाणी वाहून जात नसल्याने ठिकठिकाणी मोठमोठे पाण्याचे डबके साचले असून गल्लीबोळात चिखल व गारा झाला आहे. तरीही ही लहान, लहान चिमुकले देशभक्तीपर गीत व घोषणा देत हर घर तिरंगा चे नारे लाऊन येत्या १५ ऑगस्टला आपल्या राष्ट्रीय ध्वजाला (तिरंग्याला) गर्वाने सलामी देण्यासाठी वाट पाहत आहेत. ही परिस्थिती पाहिल्यावर नक्कीच आपण कुठे आहोत हे लक्षात येईल.