कुऱ्हाड बुद्रुक येथील भैरवनाथ बाबा शेत शिवारातील विद्युत चोरांवर धडक कारवाई.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२३/११/२०२१
पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड बुद्रुक सह पाचोरा तालुक्यातील गावागावात व शेती शिवारात विद्यूत वाहिन्यांवर आकोडे टाकून विद्यूतचोरी दिवसाढवळ्या मोठ्या प्रमाणात सुरु आहे. म्हणून विद्यूतचोरी होत असल्याचे संबंधीत अधिकारी व कर्मचाऱ्यांना लक्षात आणून दिल्यानंतर सुध्दा विद्यूतचोरी करणारांवर कोणतीही ठोस कारवाई करुन कायमस्वरूपी विद्यूतचोरी थांबवली जात नसल्याने अधिकृत विद्युत ग्राहकांना कमी दाबाचा विद्युत पुरवठा मिळत असून वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत आहे. तसेच वाढीव बिलासह अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते.
असाच काहीसा प्रकार कुऱ्हाड बुद्रुक येथील भैरवनाथ बाबा शिवारातील ट्रान्सफॉर्मर वर सुरू असून येथील शेतकऱ्यांनी मागील वर्षी या विद्यूत चोरांवर कारवाई होण्यासाठी अर्ज केले होते. परंतु कारवाई न झाल्याने यावर्षीही या भैरवनाथ बाबा शिवारातील ट्रांसफार्मर आजही १५ ते २० शेतकरी आकोडे टाकून वीज चोरी करत असल्याने या शिवारातील डिमांड नोट भरून विद्युत कनेक्शन घेतलेल्या अधिकृत विद्युत ग्राहकांनी सुरु असलेली विद्यूतचोरी थांबवण्यासाठी पाचोरा व वरखेडी येथील संबंधित अधिकारी यांच्याकडे अर्ज करत विद्यूतचोरी कायमस्वरूपी थांबवण्यासाठी वैतागलेल्या शेतकऱ्यांनी एक निवेदन संबंधित अधिकारी यांच्याकडे दिले होते निवेदनावर राजमल राठोड, राजू सखाराम वंजारी, बध्दू समसेद शेख, अशोक सुपडू देशमुख, गणेश वंजारी या शेतकऱ्यांच्या स्वाक्षरी केलेल्या होत्या.
शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदन व सत्यजीत न्यूजची दखल घेत दिनांक २३ नोव्हेंबर २०२१ बुधवार रोजी अंदाजे सकाळी ११ वाजता वरखेडीचे सहाय्यक अभियंता मा.श्री. चव्हाण साहेब, वरीष्ठ तंत्रज्ञ मा.श्री. गोवर्धन लोखंडे, मा.श्री. हितेश गोराडे, आऊटसर्चींग तंत्रज्ञ मा.श्री. आनंदा कोळी व मा.श्री. पंकज रेणुके, ऑपरेटर मा.श्री. संतोष आम्ले, सुरक्षा रक्षक मा.श्री. अमोल बोरसे, मा.श्री. राहुल बोरसे मा. श्री. अविनाश तेली
गोपाल पाटील, गणेश शिंदे व सहकाऱ्यांनी भैरवनाथ बाबा शेत शिवारात जाऊन विद्यूत वाहिनीवर आकोडे टाकून विद्यूत चोरी करणारे शेतकरी यांनी विद्यूत चोरी करण्यासाठी विद्यूत वाहिनीवर लांब, लांब केबल टाकून आकोडे टाकलेले आढळून आल्याने आकोडे टाकण्यासाठी वापरलेली केबल ताब्यात घेत त्यांच्या विरोधात कारवाईचा बडगा उगारल्याने कुऱ्हाड गाव परिसरात तसेच शेतशिवारात विद्युत चोरी करणाऱ्यांच्या उरात धडकी भरली आहे. परंतु विद्यूतचोरी करणाऱ्या विद्यूत चोरांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
विशेष म्हणजे भैरवनाथ बाबा शेतशिवारात एका बाजूला विद्यूत चोरांवर कारवाई सुरु असल्याची कुणकुण लागताच याच शिवारातील जवळपास पंधरा शेतकऱ्यांनी विद्यूतचोरी करण्यासाठी टाकलेले आकोडे काढून घेत केबल वायर घेऊन पळ काढल्याने त्यांच्यावर कारवाई होऊ शकली नाही. म्हणून विद्यूत वितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कारवाईत सातत्य ठेवून कायमस्वरूपी विद्यूतचोरी थांबवावी अशी मागणी अधिकृत विद्युत ग्राहकांकडून होत आहे.