राजकारणाच्या वादळात प्रतिष्ठित व्यक्तीचे बॅनर हातोहात रातोरात गायब.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०५/०८/२०२२
सद्यस्थितीत सगळीकडे राजकीय शिमगा सुरु असून पाचोरा तालुक्यात मागील दोन दिवसांपूर्वी ज्यांचा व्यक्तिगत राजकारणात काहीही संबंध नसलेल्या व्यक्तीने अचानकपणे आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून जनहितार्थ राजकारणात प्रवेश करुन सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी भविष्यात पाचोरा तालुक्याची धुरा सांभाळणार असल्याचा निर्णय घेतला होता असे जगजाहीर झाले आहे.
हा निर्णय जाहीर झाल्यानंतर राजकीय व्यक्तीच्या वाढदिवसानिमित्त तसे डिजिटल बॅनर बनवून संपूर्ण पाचोरा शहरात ठिकठिकाणी, महत्वाच्या कार्यालयासमोर तसेच चौकाचौकात लावण्यात आले होते. हे लावण्यात आलेले बॅनर, प्रसारमाध्यमांनी दिलेले वृत्त तसेच संबंधित व्यक्तीने दिलेल्या दुजोऱ्यामुळे पाचोरा तालुक्यात राजकीय वातावरण कमालीचे ढवळून निघाले होते. कारणही तसेच होते. कारण समोरच्यांच्या पायाखालची वाळू सरकली होती.
म्हणून की काय मागील आठवड्यात संबंधित व्यक्तीचे लावलेले बॅनर हातोहात, रातोरात काढून टाकण्यात आल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. हा प्रकार पाहून पाचोरा शहरासह तालुक्यातील राजकीय वातावरणात कमालीची अस्वस्थता व कुतुहल निर्माण झाले असून सगळीकडे राजकीय पक्षप्रमुख व कार्यकर्त्यांमध्ये उलटसुलट चर्चांना उधाण आले असून अशा या गैरप्रकारामुळे जनतेतून संतप्त प्रतिक्रिया ऐकायला मिळत आहेत.