पाचोरा ते अंबे वडगाव रस्त्याच्या कामात ठेकेदारांची मनमानी, रस्त्यावर येणाऱ्या समस्यांमुळे वाहनधारकांच्या डोळ्यात पाणी.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०२/०२/२०२२
(ठेकेदार, संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधींचा टक्केवारीचा फंडा असल्याने जनतेच्या तक्रारींना केराच्या टोपलीत टाकले जाते.)
पाचोरा ते जामनेर महामार्ग १९ या रस्त्यावर वरखेडी ते अंबे वडगाव दरम्यान नुतनीकरणाचे काम सुरु आहे. परंतु हे नुतनीकरण करतांना संबंधीत ठेकेदार हे ठरवून दिलेल्या नियम व अटी प्रमाणे काम करत नसून हे मनमानी करत असल्याचा आरोप सुज्ञ नागरिकांनी केला आहे.
रस्त्याचे नुतनीकरण करत असतांना इस्टिमेट नुसार डबर व खडी वापरत नसल्याने तसेच खडीकरण करतांना त्याचेवर व्यवस्थित रोलिंग करत नसून लगेचच सिलकोटचा थर टाकून थोडक्यात वरचेवर मेकअप करुन आपल्या निकृष्ट कामावर पांघरूण घालण्याचे काम करत आहे. तसेच डांबराचे प्रमाण कमी वापरले जात असून डांबराऐवजी दुसरेच रसायन वापले जात असल्याचा आरोप जाणकार नागरिकांनी केला असून या रस्त्याच्या कामाची चौकशी व्हावी अशी मागणी अंबे वडगावचे ग्रामपंचायत सदस्य, कायदेतज्ञ मा.श्री. मंगेशराव गायकवाड व भाजपचे युवा तालुकाध्यक्ष मा.श्री. मुकेश पाटील यांनी केली आहे.
ठेकेदाराचे मनमानी कारभाराबाबत तक्रार करतांना कायदेतज्ञ मा.श्री. मंगेशराव गायकवाड व मा.श्री. मुकेश पाटील.
तसेच पाचोरा ते जामनेर रस्त्यावर ठिकठिकाणी गतिरोधक बनवण्यात आले आहेत. मात्र त्या गतिरोधकांजवळ गतिरोधक असल्याचे सुचना (मार्गदर्शक) फलक लावण्यात अलेले नसल्याने वाहनधारकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तसेच पुढे गाव आहे, शाळा आहे, वळणरस्ता आहे असे सुचना फलक लावणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे रस्त्याचे नुतनीकरणाचे काम सुरु असतांना त्या परिसरात पुढे काम सुरु आहे असा सुचना फलक किंवा मार्गदर्शक असे काहीच नसल्याने तसेच रस्त्याच्या नुतनीकरणाचे काम रात्रीच्या वेळी अंधारात केले जात आहे. यामुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत असून काम व्यवस्थित होतांना दिसून येत नाही. तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने या बाबींचा विचार करुन योग्य त्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी होत आहे.