वाढदिवसाचे औचित्य साधून कोरोना आजाराने प्राण गमावलेल्या व्यक्तींच्या वारसांना आर्थिक मदत.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२५/०७/२०२२
आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो ही भावना मनात ठेवून पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड येथील दैनिक लोकमतचे पत्रकार मा. श्री. सुनील लोहार यांनी त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कोरोनाची लागण होऊन आपला जीव गमावला आहे अश्या मृत व्यक्तीच्या वारसांना आर्थिक मदत दिली आहे.
कुऱ्हाड येथील लोकमतचे पत्रकार सुनील लोहार यांचा वाढदिवस २० जूलै रोजी साजरा करण्यात आला. या दिवशी सकाळपासून त्यांच्याकडे स्नेही जनांनी भेटी देऊन वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या. याचवेळी सुनील लोहार यांनी आपण समाजासाठी काहीतरी देणे लागतो या भावनेतून कोरोना काळात कोरोनाची लागण होऊन ज्यांनी आपला जीव गमावला अश्या परिवाराच्या वारसांना आर्थिक मदत दिली. सुनील लोहार हे उच्चशिक्षित तरुण असून ते गावात ग्रामस्थांच्या मदतीने विविध सामाजिक उपक्रम राबवत असतात.
या उपक्रमाअंतर्गत रक्तदान शिबीर, शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप, आकस्मिक आलेल्या संकटात मदत तसेच पूरग्रस्त, भुकंप ग्रस्त, आग ग्रस्त, अपघात ग्रस्त व गोरगरिबांच्या औषधोपचारासाठी निधी उपलब्ध करून तसेच स्वता पदरमोड करून मदत करत असतात. अशीच मदत त्यांनी वाढदिवसानिमित्त केल्याने त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सुनील लोहार~
कोरोनाची लागण झाल्यानंतर संपूर्ण भारतावरच नव्हे तर जगावर म्हातारीचे संकट कोसळले होते. हा आजार महाभयंकर असल्याकारणाने माणूस माणसापासून दूर पळत असतांनाच वैद्यकीय यंत्रणा, पोलीस यंत्रणा व सर्व शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घरावर तुळशीपत्र ठेवून स्वताला झोकून देत हजारो कोरोना ग्रस्तांना जीवदान दिले आहे. याचीच जाणीव ठेवून आपणही समाजासाठी काही तरी केले पाहिजे याची जाणीव ठेवून मी फुल नाही परंतु फुलाची पाकळी समजून ही मदत केली आहे.
कारण या महाभयंकर आजाराने कळतनकळत माणसं निघून गेली यात काही कुटुंबातील कर्ता गेला, आई, वडील गेले, काही कुटुंबातील तर पतीपत्नी गेले, सुशिक्षित तरुण, अल्पवयीन मुले, कुणाचा भाऊ, ऐन तारुण्यात कुणाचा पती, तर अंगावर दूध पिणाऱ्या बालकांच्या आईलाही या कोरोनाने हिरावून घेतले कुऱ्हाड गावात कोरोनाची लागण झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात रुग्ण संख्या झपाट्याने वाढत होती. यात बऱ्याच लोकांनी आपला जीव गमावला यासाठी शासकीय मदत जाहीर करण्यात आली परंतु बऱ्याचशा लोकांजवळ योग्य कागदपत्रांची उपलब्धता नसल्याने त्यांना शासनातर्फे देण्यात येणारी मदत मिळाली नाही. त्यामुळे सत्य परिस्थिती असल्यावर ही काही कुटुंबातील सदस्यांना मदतीपासून वंचित रहावे लागले अशी खंत सुनील लोहार यांनी बोलून दाखवली तसेच प्रत्येकाने आपला वाढदिवस साजरा करतांना पाश्चात्य संस्कृती पासून दूर राहून केक कापणे, मेणबत्ती विझवून व इतर बडेजाव करुन वाढदिवस साजरा करण्यापेक्षा तो पैसा समाजहितासाठी खर्च करावा म्हणजे वाढदिवस साजरा करण्याचा खरा आनंद मिळेल असा संदेश दिला.