वरखेडी भोकरी येथील पी. जे. रेल्वेच्या रुळावर पडला जिवघेणा खड्डा.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०५/०७/२०२२
जामनेर ते पाचोरा पी. जे. रेल्वे म्हणजे गोरगरिबांची गीतांजली ही मागील काही वर्षांपासून बंद झाली असल्याने जामनेर, भागदरा, शेरी, लोंढरी, पहूर, गोंदेगाव, जंगीपूरा, शेंदुर्णी, मोराड, कोल्हे, मालखेडा, अटलगव्हाण, अंबे वडगाव, अंबे वडगाव खुर्द, अंबे वडगाव बुद्रुक, कोकडी तांडा, वडगाव जोगे, डांभुर्णी, पिंप्री, पिंपळगाव हरेश्र्वर, सावखेडा खुर्द, सावखेडा बुद्रुक, कुऱ्हाड खुर्द, कुऱ्हाड बुद्रुक, सांगवी, लासुरे, लोहारी या गावातील नागरिकांना जामनेर व पाचोरा तालुक्याच्या ठिकाणी तसेच या रेल्वे लाईनवर येणाऱ्या वरील सर्व आसपासच्या गावांना कमी वेळात व कमी खर्चात जाण्यायेण्याची चांगली सुविधा मिळणे बंद झाले आहे.
विशेष म्हणजे खेडेगावातील ग्रामस्थ तसेच मुंबई व इतर ठिकाणी नोकरीनिमित्त बाहेरगावी जाणारे प्रवासी पी. जे. या रेल्वेने पाचोरा पर्यंत जाऊन पाचोरा येथून पुढे मुंबई नागपूर जाण्यासाठी सोयीचे होते. तसेच जामनेर येथून मध्यप्रदेश व मोठ्या शहरांसह भुसावळ येथे जाण्यासाठी सोयीचे होते. परंतु शासन व प्रशासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे ही गरीबांची गीतांजली जनतेने वारंवार मागणी करूनही कायमस्वरूपी बंद करण्यात आली असल्याने सर्वसामान्य जनतेतून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
ही पी. जे. गाडी बंद झाल्यापासून या रेल्वे लाईनवर असलेली रेल्वेच्या मालकीची मालमत्ता, प्रवासी निवारे, मुख्य रस्त्यावर असलेले रेल्वेचे फाटक (गेट) तसेच रेल्वेची धावपट्टी (रुळ) यांची दयनीय अवस्था झाली आहे. ठिकठिकाणी रेल्वेच्या हद्दीतून गौण खनिजांची उचल केली जात आहे. तर काही ठिकाणी अतिक्रमण करण्यात आले आहे. तसेच काही प्रवासी निवाऱ्याची दयनीय अवस्था झाली असून याठिकाणी प्रवाशांना बसण्यासाठी असलेले लाकडी बाक (बेंच) यांची मोडतोड करून लाकडे चोरीला गेली आहेत तर सिमेंटच्या बाकांची तोडफोड करण्यात आली आहे. काही ठिकाणी पत्र्याची तोडफोड करण्यात आली आहे.
तसेच महत्वाची बाब म्हणजे ज्या, ज्या ठिकाणी रेल्वे क्रॉसिंग जवळ मुख्य रस्त्यावर रेल्वेने गेट बनवले आहेत या परिसरातून अवजड वाहनांची सतत वर्दळ असल्याने या रेल्वे लाईनवर (रुळांवर) फाटकाच्या म्हणजे (गेटच्या) परिसरातील रुळांवर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहतूकीस अडथळा निर्माण होत असल्याने वाहनधारक कमालीचे हैराण झाले आहेत. कारण या रेल्वे लाईनवर रुळांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहानांची मोठ्या प्रमाणात मोडतोड होऊन लहानमोठे अपघात होत आहेत.
असाच एक भलामोठा खड्डा वरखेडी येथून जवळच असलेल्या भोकरी गावाजवळील रेल्वे गेट (फाटका) मध्ये पडलेला असल्याने याठिकाणी दररोज कित्येक लहानमोठे अपघात होत असून वाहनांची मोडतोड होत असल्याने वाहनधारकांना नहाकच आर्थिक झळ सहन करावी लागत आहे. तसेच याच रस्त्यावरून वरखेडी येथील पी. डी. बडोला माध्यमिक विद्यालयातील जवळपास दिड हजार विद्यार्थी (मुले, मुली) याच रस्त्यावरून विद्यालयात जातात व येतात पैकी पाचशेच्या जवळपास विद्यार्थी हे सायलीवर शाळेत येत असतात या विद्यार्थ्यांना सुध्दा हा खड्डा जिवघेणा व त्रासदायक ठरत असल्याने येत्या आठ दिवसात रेल्वे प्रशासनाने त्वरित भोकरी फाटका जवळील खड्डा भरून तसेच इतर दुरुस्ती करुन वाहनधारक, विद्यार्थी व वाटसरुंची गैरसोय दुर करावी अन्यथा याठिकाणी एखाद्या वेळी अपघात होऊन जिवीतहानी झाल्यास रेल्वे प्रशासनाला जबाबदार धरुन कारवाई करण्यात येईल असा इशारा वरखेडी, भोकरी येथील ग्रामस्थांनी दिला आहे.