पाचोरा गॅंगवार प्रकरणी कोळी बांधवांचे पोलीस निरीक्षकांना निषेधाचे निवेदन.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०१/०२/२०२२
पाचोरा शहर हे शांतताप्रिय शहर असून या शहरात सर्व जाती-धर्माचे लोक एकोप्याने राहत असतात. परंतु काही विकृत असलेल्या लोकांमुळे पाचोरा शहराला अधून-मधून गालबोट लागत असते. असाच काहीसा परंतु गंभीर प्रकार ३० जानेवारी २०२२ रविवार रोजी पुनगाव रस्त्यावरील बुऱ्हाणी इंग्लिश स्कूल जवळ घडला.
या गंभीर घटनेत भुषण नाना शेवरे (कोळी) वय २३ वर्षे या तरुणाचा भररस्त्यात चॉपरने भोसकून खुन करण्यात आला. हा गुन्हा गॅंगवारमुळे घडला असल्याचे जनमानसातून चर्चीले जात आहे. पाचोरा सारख्या शांतताप्रिय शहरात गॅंगवार घडल्यामुळे पाचोरा शहरासह संपूर्ण तालुक्यातून या घटनेबद्दल निषेध व्यक्त केला जात असून चिंता व्यक्त केली जात आहे.
या घटनेची सखोल चौकशी होऊन मयत भुषण शेवरे या तरुणाच्या हत्येमागे असलेल्या सर्वच आरोपींची सखोल चौकशी होऊन कठोरात, कठोर शासन व्हावे म्हणून पाचोरा पोलिस निरीक्षक यांना पाचोरा येथील कोळी बांधवांनी निवेदन देऊन जाहीर निषेध नोंदवला आहे. या निषेधार्थ देण्यात आलेल्या निवेदनावर हजारो कोळी समाज बांधवांच्या सह्या आहेत.
तसेच या घटनेतील आरोपींना कठोर शासन व्हावे म्हणून तसेच या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी सामाजिक संघटना लवकरच मोर्चा काढणार आहेत.