खाजगी कापूस व्यापाऱ्यांकडून मापात पात, वजन, काटे निरीक्षकाकडून कारवाईची अपेक्षा.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०३/११/२०२२
पाचोरा तालुक्यासह जिल्हाभरात खाजगी कापूस व्यापाऱ्यांनी उच्छाद मांडला असून कापूस व्यवसाय करतांना ताण काटा, वजन काटा म्हणजे (धडी पाच किलो, दहा किलो, विस किलो) लोखंडाच्या वजनाची मापे व इलेक्ट्रॉनिक काट्याच्या सर्रास वापर करत असून यात हेराफेरी करुन कमी वजनात मापात जास्त, जास्तीत कापूस कसा घेता येईल यासाठी काही व्यापाऱ्यांनी चलाखी करत वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवून कापूस उत्पादक शेतकऱ्यांची पध्दतशीरपणे लुट करत असल्याची जोरदार चर्चा गावागावातून शेतकरी वर्गातून ऐकायला मिळत आहे.
कमी वजनात जास्त कापूस मोजून घेण्यासाठी कापूस व्यापाऱ्यांनी इलेक्ट्रॉनिक काट्याची सेटिंग बदलवून तर काहींनी चावीच्या किचैनची डिझाईन बनवून त्यात छुपा रिमोट कंट्रोल बसवून कापूस मोजतांना शेतकऱ्यांच्या लक्षात येणार नाही अश्या पध्दतीने रिमोट कंट्रोल व्दारे वजन, मापात हेराफेरी करत आहेत. तसेच धडी काट्याने कापूस खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांनी पाच किलो, दहा किलो व विस किलो वजनाचे लोखंडी मापात वजण वाढवून घेण्यासाठी धडी मापाच्या आतील पोकळीत हुशार कारागिरांच्या माध्यमातून लोखंड, किंवा शिसे भरुन वजन वाढवले असल्याची जाणीव काही सुज्ञ शेतकऱ्यांच्या लक्षात आली आहे.
असाच काटा सेटिंगचा गैरप्रकार ताण काट्यातही केला असून ताण काट्याच्या मध्ये असलेल्या काही स्प्रिंग काही ठिकाणी आतल्या, आत बारीक तारेच्या साह्याने बांधून कमी वजनाच्या मोजमापात जास्तीत, जास्त कापूस मोजून घेत कापूस उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक करत आहेत. म्हणून प्रत्येक कापूस उत्पादक शेतकऱ्याने आपला कापूस व्यापाऱ्यांना विकतांना वजन माप तपासूनच कापूस विक्री करावी अशी सुचना फसगत झालेल्या शेतकऱ्यांनी केली आहे.