ठिकाणावर नाही सरकार, करु कुणाकडे तक्रार, १०,२६,२६ व युरिया खतांची कृत्रिम टंचाई .

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२९/०६/२०२२
सद्यस्थितीत पावसाळा सुरु झाला असून शेतकरी वर्ग बि, बियाणे, खते व कीडनाशके खरेदी करण्यासाठी सरसावले आहेत. परंतु नेमका शेतकऱ्यांच्या मजबुरीचा फायदा घेण्यासाठी टपुन बसलेले कृषी केंद्राचे मालक व संचालक हे बि, बियाणे व खतांची चढ्या भावाने खुलेआम विक्री करुन यात कब्बडी व पंगा या कापूस बियाणांची विक्री पाचोरा तालुक्यासह सगळीकडे चढ्या भावाने विक्री करुन शेतकऱ्यांची दिवसाढवळ्या आर्थिक लुबाडणूक केली तरीही कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी गांधीजींच्या तीन माकडासारखी भुमिका बजावत कृषी केंद्राची एकप्रकारे पाठराखण केली आहे.
नंतरच्या काळात निसर्गाच्या लहरीपणामुळे कुठे जास्त तर कुठे कमीअधिक पाऊस पडला व आजही समाधानकारक पाऊस पडलेला नाही. तरीही शेतकऱ्यांनी गहाण, लहान राहून कसेतरी महागडे बि, बियाणे व खते घेऊन पेरणी केली आहे. आता पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त पिके कोळपणी वर आली असून अल्प पाऊस पडत असला तरी पिके तग धरुन उभी आहेत. व आता पिकांना रासायनिक खते देणे महत्त्वाचे आहे.
परंतु आज संपूर्ण जिल्ह्यासह पाचोरा तालुक्यातील कृषी केंद्रावर शेतकऱ्यांना हवी असलेली रासायनिक खते १०,२६,२६ व युरिया खताची टंचाई भासत आहे. या खतांच्या टंचाई बाबत सविस्तर माहिती जाणून घेतली असता असे लक्षात येते की १०,२६,२६ व युरिया खताचा मुबलक साठा काही धनदांडग्या कृषी केंद्राच्या मालकांनी साठवून ठेवला असून विश्वासू शेतकऱ्यांना हाताशी धरुन खते विक्रीच्या पावत्या फाडून खोटे रेकॉर्ड तयार करुन संपूर्ण खते विक्री झाल्याचे कागदपत्री दाखवण्यात आले आहे.
मात्र दुसरीकडे या साठवणूक केलेल्या १०,२६,२६ व युरिया खताची चढ्या भावाने पावती न देता विक्री सुरु आहे. विशेष म्हणजे ज्या, ज्या गरजू शेतकऱ्यांना या खतांची अत्यंत गरज आहे अश्या शेतकऱ्यांची अडवणूक शेतकऱ्यांना नको असलेले पोटॉश व इतर जैविक खते घेतल्याशिवाय तसेच नव, नवीन कंपनीची खते व इतर औषधी घेतल्याशिवाय म्हणजे जास्त पैसा कमावण्यासाठी (लिंकिंग पद्धतीने) खतांची विक्री करुन जास्त पैसा घेत शेतकऱ्यांची आर्थिक लुबाडणूक करत आहेत.
म्हणून जिल्हास्तरावरील व तालुक्यातील कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी अश्या कृषी केंद्राची तपासणी करुन इतर ठिकाणी लपवून ठेवलेल्या १०,२६,२६ व युरिया खतांचा साठा तपासणी करून तो शेतकऱ्यांना उपलब्ध करुन द्यावा अशी मागणी केली जात आहे.
मात्र सद्यस्थितीत कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच कृषी केंद्राचे मालक (संचालक) यांचे अर्थपूर्ण साटेलोटे असल्याने तसेच खतांचा हा काळाबाजार सुरु असल्याचे मत सुज्ञ शेतकऱ्यांनी व्यक्त केले असून सरकारच ठिकाणावर नसल्याने संबंधित अधिकारी व कृषी केंद्राचे मालक मनमानी करत आहेत. म्हणून आता तक्रार कुणाकडे करायची हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे.