वरखेडी ते लोहारी दरम्यान भररस्त्यावर दररोज भरतोय गुरांचा बाजार, शासनाच्या आदेशाला केराची टोपली.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०१/१०/२०२२
(दिवसाढवळ्या भरणारा गुरांचा बाजार तसेच दिवसाढवळ्या किंवा चोरट्या मार्गाने होत असलेली गुरांच्या वाहतूकीला पोलीस प्रशासन, पशुधन विभागाचे जबाबदार अधिकारी व गुरांचे व्यापारी यांचे अर्थपूर्ण हितसंबंध असल्यानेच गुराढोरांची खरेदी, विक्री व वाहतूक तसेच जातीवंत शेतीपयोगी बैल तसेच दुभते गोधन कत्तलखान्यात नेले जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.)
सद्यस्थितीत सगळीकडे लम्पी स्कीन आजाराचा प्रादुर्भाव दिसून येत असून या आजारापासून गोवंश वाचवण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व गुरांचे भरणारे आठवडे बाजार बंद करण्यात आले असून यातून बकरीला कोंबडी बाजार भरवण्याची परवानगी देण्यात आली आहे.
या आदेशानुसार सगळीकडे बैल बाजार बंद करण्यात अले असलेतरी मात्र पाचोरा ते जामनेर रस्त्यावर दररोज वरखेडी ते लोहारी दरम्यान एका ठिकाणी भररस्त्यावर गुरांची खरेदी, विक्री मोठ्या प्रमाणात सुरु असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
याठिकाणी जणूकाही अनाधिकृतपणे छोटासा बैलांचा बाजारच भरवला जातो आहे असे दृष्य पाहायला मिळते आहे. याठिकाणी असलेल्या बैलांची अनाधिकृतपणे दिवसाढवळ्या खरेदी, विक्री सुरु असून याकरिता बाहेरगावाहून तसेच तालुक्या, जिल्ह्यातूनच नव्हे तर परराज्यातील बैलांची आवक व खरेदी, विक्रीचा व्यवहार झाल्यानंतर या ठिकाणाहून तालुक्यातील गावागावात तसेच जिल्हा व परराज्यात गुरांची जावक होतांना दिसून येत आहे.
विशेष म्हणजे पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड, सार्वे, जामने, वडगाव आंबे, कोकडी तांडा व इतर गावातील गोवंशीय बैल, गोऱ्हे, गाय यांना मोठ्याप्रमाणात लम्पी स्कीन आजाराची लागण झाल्याचे आढळून येत असून बऱ्याचशा गावातील शेतकऱ्यांचे पशुधन यात दगावले आहे. तरीही वरखेडी ते लोहारी दरम्यान भररस्त्यावर गुरांची खरेदी, विक्री मोठ्या प्रमाणात होत असल्याने हा प्रकार पशुधन पालकांसाठी धोकादायक असल्याचे मत जाणकार व सुज्ञ नागरिकांनी व्यक्त केले असून हा अनाधिकृत भरणारा गुरांचा बाजार त्वरित बंद करावा व गुराढोरांची ट्रक, टेम्पो व इतर वाहनांव्दारे होणारी दिवसाढवळ्या व चोरटी वाहतूक त्वरित थांबवावी अशी मागणी केली जात आहे.