ग्रामपंचायतीकडून बारा अंकी बारकोड असलेला ऑनलाईन मृत्युचा दाखला मिळत नसल्याने लक्ष्मी रुसली दारात, खायला दोन घास नाही घरात.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०३/०६/२०२२
सगळीकडे संगणकीय (ऑनलाईन) व्यवहार प्रणाली सुरु झाल्यापासून प्रत्येक शासकीय, निमशासकीय, सहकार व इतर कार्यालयात संगणकाचा वापर करून सर्वसामान्य जनतेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. तसेच बऱ्याचशा शासकीय किंवा सहकारी कार्यालयात ऑनलाईन पध्दतीने कामकाज त्वरित सुरु करण्यात यावे असे आदेश शासनाकडून वारंवार काढले जात आहेत.
या आदेशानुसार महाराष्ट्रातील प्रत्येक ग्रामपंचायतीचा आपला व्यवहार व शासकीय कामे त्वरित होऊन गावकऱ्यांना घराचा उतारा, जन्म, मृत्यूची नोंद तसेच इतर सोई सुविधा मिळवण्यासाठी लागणारी कागदपत्रे त्वरित मिळावीत म्हणून शासनाने सन २०१७ मध्ये स्वतंत्र आदेश काढून प्रत्येक ग्रामपंचायतीने आपापल्या ग्रामपंचायतीमध्ये ऑनलाईन प्रणाली त्वरित सुरु करावी असे सक्त आदेश दिले होते व दिलेले आहेत.
मात्र आज सन २०२२ चा जून महिना उजाडला तरीही काही ग्रामपंचायतीने शासनाच्या सन २०१७ च्या आदेशाला केराची टोपली दाखवत आपल्या ग्रामपंचायतींच्या व्यवहारात ऑनलाईन प्रणाली कार्यान्वित केली नसल्याने बऱ्याचशा गावातील सर्वसामान्य जनतेला अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
असाच काहीसा प्रकार पाचोरा तालुक्यातील मोठ्या लोकसंख्येचे म्हणजे नगरपरिषदेच्या बरोबरीने लोकसंख्या असलेल्या पिंपळगाव हरेश्र्वर ग्रामपंचायतीने शासनाच्या सन २०१७ च्या आदेशाकडे दुर्लक्ष करत थोडक्यात (केराची टोपली) दाखवत अद्यापपर्यंत ऑनलाईन प्रणाली व्यवहार सुरु केलेला नसल्याने पिंपळगाव हरेश्र्वर ग्रामस्थांना विशेष करुन विद्यार्थ्यांना वेळेवर अपेक्षित कागदपत्रे मिळत नसल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागत असून कागदपत्रांअभावी बऱ्याचशा योजनांपासून वंचित रहावे लागत आहे.
महत्वाचे~
पिंपळगाव हरेश्र्वर ग्रामपंचायतीचा गलथान कारभार म्हणा किंवा अजून काही म्हणा परंतु एका मोठ्या लोकसंख्येचे गाव असून ही अद्यापपर्यंत ऑनलाईन पध्दतीने कामकाज सुरू नसल्याने एका महिलेच्या पतीचे नुकतेच निधन झाले असून बारकोड असलेला मृत्यूचा दाखला मिळत नसल्याने या महिलेच्या पतीने काढलेल्या एल.आय.सी. जीवन विमा योजनेचे जवळपास (दहा लाख) रुपये मिळत नसल्याने संबंधित महिला हतबल झाली असून आजच्या परिस्थितीत दोन घास मिळवण्यासाठी त्या महिलेवर भिक मागायची वेळ आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की पिंपळगाव हरेश्र्वर येथील एक भूमिहीन व्यक्ती अशोक उखा महाले, त्यांची पत्नी व दोन मुली असे कुटुंब असलेला व्यक्ती कापडाच छोटस गाठोड घेऊन कापड विक्रीचा व्यवसाय करुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होता. या छोट्याशा व्यवसायावर काटकसरीने संसार करत अशोक महाले यांनी त्यांच्या दोन मुलींची लग्ने उरकवून घेत आता पत्नी सोबत पिंपळगाव हरेश्र्वर येथेच रहात होते. परंतु हे जीवन जगत असतांनाच आपल्याला मुलगा नसल्याने तसेच शेतीबाडी नसल्याने आपल्या पाश्चात्य पत्नीला किंवा उतारवयात स्वतासाठी काहीतरी जुगाड पाहिजे म्हणून दुरदृष्टी ठेवून गावातीलच ओळखीचे एल.आय.सी. एजंट प्रवीण तेली यांच्याकडे एल.आय.सी. चा जीवन विमा काढून नियमितपणे हप्ते भरले होते.
असा संसाराचा गाडा ओढत असतांनाच अशोक महाले यांना देवाचे बोलावणे आले व १८ एप्रिल २०२२ रोजी त्यांचे निधन झाले. अशोक महाले यांच्या निधनानंतर दोन मुली व पत्नी असा परिवार आहे. अशोक महाले यांनी एल.आय.सी.चे हप्ते नियमितपणे भरलेले असल्याने एल.आय.सी. कंपनीकडून अशोक महाले यांच्या परिवारातील सदस्यांना अंदाजे दहा लाख रुपयापर्यंत मदत मिळणार आहे.
परंतु ही मदत मिळवण्यासाठी अशोक महाले यांचा बारकोड असलेला मृत्यूचा दाखला एल.आय.सी. कंपनीला देणे नियमानुसार बंधनकारक असल्याने एल.आय.सी.एजंट प्रवीण तेली व मयत अशोक महाले यांच्या पत्नी एप्रिल महिन्यापासून आजपर्यंत ग्रामपंचायत कार्यालयात खेटे घालत आहेत. मात्र पिंपळगाव हरेश्र्वर ग्रामपंचायतीने अद्यापपर्यंत ऑनलाईन प्रणाली कार्यान्वित केली नसल्याने अशोक महाले यांचा बारकोड असलेला मृत्यूचा दाखला जवळपास दिड महिन्याचा कालावधी उलटला तरीही मिळत नसल्याने मयत अशोक महाले यांच्या पत्नी संगीताबाई हतबल झाल्या आहेत.
पिंपळगाव हरेश्र्वर ग्रामपंचायतीच्या गलथान कारभारामुळे दुःखांचा डोंगर कोसळलेल्या संगीताताईंसाठी एल.आय.सी. कंपनीकडून त्यांचा एजंट दरवाज्यावर दहा लाख रुपयांचा धनादेश घेऊन उभा आहे. तर दुसरीकडे घरात दोन घास मिळवण्यासाठी संगीताताईंना केविलवाणी धडपड करावी लागत आहे हे मात्र खरे.