सोयगावच्या लाकुड व्यापाऱ्यांचा पिंपळगाव हरेश्र्वर येथील हॉटेलमध्ये ठिय्या, वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी करतात त्याच्या भोवती ता,था,थैय्या.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०२/०६/२०२२
धंदा दोन नंबरचा पण इमानदारीने~
*************”********
लाकुड व्यापारी व वखार मालक यांच्याशी हप्तेखोर अधिकारी व कर्मचाऱ्यांची सलगी असून लाकडाने भरलेला ट्रॅक्टर लाकुड वखारीवर गेल्यानंतर वखार मालक संबंधित लाकडाच्या व्यापाऱ्याला लाकडाचे पैसे देतांना वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे ८००/०० प्रति ट्रॅक्टर पैसे कापून घेत हे पैसे इमानेइतबारे वनविभागाच्या अधिकाऱ्यांना पोहच करतात तसेच काही व्यापारी ट्रॅक्टर भरुन पाचोरा शहरात इतर ठिकाणी व तालुक्यातील सुरु असलेल्या विट भट्टीवर विटा भाजण्यासाठी लाकडाचा पुरवठा करतात अशा परस्पर लाकुड विकणाऱ्या व्यापाऱ्यांवर कडक नजर ठेवण्यासाठी नाके कारकुनची नेमणूक करण्यात आली आहे. हे नाके कारकुन रात्रंदिवस गस्तीवर राहून या लाकुड व्यापाऱ्यांकडून पैसे वसुल करत असतांनाच दिसून येतात असेही खात्रीलायक वृत्त आहे.
विशेष म्हणजे सोयगाव तालुक्यातील वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी हे त्यांच्या हद्दीत वृक्षतोड होऊ देत नसल्याने सोयगावच्या एका लाकुड व्यापाऱ्याने पिंपळगाव हरेश्र्वर येथील हॉटेलमध्ये मागील दोन महिन्यांपासून ठिय्या मांडला असून या ठिकाणी पाचोरा वनविभागाचे काही भ्रष्ट अधिकारी व कर्मचारी येऊन या लाकुड व्यापाऱ्यासोबत ता, ता, थैय्या करतांना दिसून येतात. तसेच या हॉटेलमध्ये लाकुड व्यापारी व त्यांच्या हितचिंतकांचे काही फोटो सत्यजित न्यूज च्या हाती लागणार आहेत.
पाचोरा व जामनेर तालुक्यात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड सुरू असून यात दररोज हिरव्यागार शेकडो वृक्षांची कत्तल केली जाते आहे, याबाबत निसर्गप्रेमी व वृक्षप्रेमींनी सत्यजित न्यूज कडे वृक्षतोड होत असलेल्या झाडांची छायाचित्रे पुरावा म्हणून पाठवत ही वृक्षतोड कायमस्वरूपी बंद करुन वनसंपत्ती वाचवण्यासाठी वृत्त प्रकाशित करुन वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना तसेच जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी व तहसीलदार साहेबांना जागे करण्यासाठी विनंती केली होती.
म्हणून निसर्गप्रेमी व वृक्षप्रेमींच्या भावना लक्षात घेऊन मागील एक महिन्यापासून वृक्षतोडीचे विरोधात सत्यजित न्यूज कडून सबळ पुराव्यासह वारंवार वृत्त दिल्यावरही संबंधित वनविभागाकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने याबाबत जनमानसातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
विशेष म्हणजे कोणतीही परवानगी न घेता दिवसाढवळ्या शेकडो हिरव्यागार वृक्षांची कत्तल सुरु असतांनाच वनविभागाचे अधिकारी कारवाई का करत नाहीत याबद्दल जाणून घेण्यासाठी कानोसा घेतला असता संबंधित लाकुड व्यापारी, लाकुड वखार मालक व वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी यांचे साटेलोटे असून ठराविक दलालांच्या मार्फत हफ्ते जमा करुन दरमहा लोखो रुपये कमाई होत असल्याने ही दिवसाढवळ्या वृक्षतोड सुरू असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.