पारोळा ते भोंडण रस्त्यावर जिवघेण्या अवैध वाहतूकीला आशिर्वाद कुणाचा.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~११/०९/२०२२
पारोळा तालुक्यात पारोळा ते भोंडण रस्त्यावर खाजगी वाहनधारक आपल्या वाहनातून क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवून तसेच वाहनात खचाखच प्रवासी बसवल्यावरही समाधान होत नसल्याने पैसा कमावण्याच्या नादात बिनधास्तपणे गाडीच्या टपावर बसवून अवैध वाहतूक करत आहेत.
विशेष म्हणजे या अवैध वाहतूकीसाठी वापरण्यात येणारी काही वाहने ही मोठ्या शहरातील वापरुन निकामी झालेली म्हणजे विस वर्षे जुनी भंगारातील तसेच कोणतेही कागदपत्र नसतांना दिवसाढवळ्या पोलीसांच्या व आर. टी. ओ च्या नाकावर टिच्चून क्षमतेपेक्षा जास्त म्हणजे गुराढोरांप्रमाणे भरगच्च भरुन व गाडीच्या टपावर बसवून अवैध प्रवासी वाहतूक करुन सर्वसामान्य गरजू प्रवाशांच्या जीवाशी खेळ खेळत आहेत.
याच अवैध वाहतुकीमुळे जिल्हाभरात बरेचसे अपघात होऊन मोठ्या प्रमाणात जिवीतहानी झाली असून आजही दररोज लहान मोठ्या अपघाताची मालिका सुरूच आहे. म्हणून आतातरी संबंधित पोलिस अधिकारी व आर. टी. ओ. अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे मोहीम राबवून प्रवाशांच्या जीवाशी खेळणाऱ्या अवैध वाहतुकदारांवर कडक कारवाई करावी अशी मागणी सुज्ञ नागरिकांनी केली आहे.