जळगाव जिल्ह्यात ताडपत्रीने झाकून रेशनिंगचा तांदूळ, लाकूड व गुराढोरांची चोरटी वाहतूक जोरात.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२१/११/२०२१
[रेशनिंगचा काळाबाजार.]
जळगाव जिल्ह्यात सद्यस्थितीत कायदा मोडून खाणारांची चलती दिसून येत असून यात १) एक नंबरवर मोठ्याप्रमाणात रेशनिंगचा काळाबाजार सुरु असून या तांदळाची बाहेर राज्यात रवानगी केली जात आहे. आजपर्यंत बऱ्याचशा ठिकाणी रेशनिंगचा तांदूळ काळ्या बाजारात जातांना पकडण्यात आला आहे. विशेष म्हणजे एका बाजूला गोरगरिबांना दोन घास खायला मिळावेत म्हणून शासन पराकोटीचे प्रयत्न करत असतांनाच दुसरीकडे रेशन माफियांनी प्रशासनातील काही भ्रष्ट अधिकाऱ्यांना हातचे धरुन मोठ्या प्रमाणात काळाबाजार सुरु केला आहे. यात काहिंना काही ठिकाणी राजकीय पाठबळ मिळत असल्याने पुरवठा विभागात इमानेइतबारे काम करणारे अधिकारी व कर्मचारी हतबल होऊन हा होणारा प्रकार चुपचाप सहन करत आहेत. तर दुसरीकडे काही भ्रष्ट अधिकारी, कर्मचारी वाहत्या प्रवाहात हात धुऊन घेत आहेत.
[झपाट्याने होणारी वृक्षतोड]
२) तसाच काहीसा प्रकार वनविभागात सुरु असून पावसाळा संपतो न संपतो तोच जळगाव जिल्ह्यात वीरप्पनची पिल्लावळ सक्रिय झाले आहेत. या प्रकाराने सगळीकडे हिरव्यागार मोठमोठ्या वृक्षांची बेसुमार कत्तल केली जात आहे. या अवैध वृक्षतोडीमुळे वनराई झपाट्याने नष्ट होत असून निसर्गाचा समतोल बिघडत आहे. एका बाजूला शासन वृक्ष लावा वृक्ष जगवा यासाठी कोटी रुपये खर्च करत असतांना दुसरीकडे मात्र नंगानाच सुरू असल्याचे दिसून येते. यामुळे बेसुमार वृक्षतोडीमुळे दिवसेंदिवस निसर्गाचा समतोल ढासळत आहे. कधी उन्हाळ्यात पावसाळा तर पावसाळ्यात उन्हाळा कधी अतिवृष्टी तर कधी पावसासाठी वन वन तसेच वातावरणातील झपाट्याने कमी कमी होणारे ऑक्सिजनचे प्रमाण व वातावरणावरील ओझोन वायूचा झपाट्याने कमी होणार स्थर ही समस्या खुपच विचारात घेण्यासारखी आहे. आपणास वेळेवरच सावध होणे गरजेचे आहे. कारण कोरोनाची लागण झाल्यावर आपल्याला ऑक्सिजन मिळवण्यासाठी कायकाय करावे लागले हे न विसरण्यासाठीची आठवण ताजी आहे. म्हणून त्वरीत वृक्षतोड थांबवून निसर्गसृष्टी वाचवणे अतिमहत्वाचे आहे. याकरीता वनविभागात वर्षानुवर्षांपासून एकाच ठिकाणी कार्यरत असलेले वन कर्मचारी व अधिकारी यांच्या तडकाफडकी बदल्या करून वृक्षतोडीला सहकार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी निसर्गप्रेमी कडून होत आहे.
विशेष महत्त्वाचे म्हणजे पैशाच्या मागे लागलेल्या काही लोकांनी दररोज हजारो एकर जमिनीचे बिगरशेतीत रुपांतर करुन त्याठिकाणी प्लॉट, कारखाने उभारतांना मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करत आहेत. तसेच दुसरीकडे महामार्गाचे व मोठमोठ्या प्रकल्पाच्या कामासाठी मोठ्या प्रमाणात वनराई नष्ट होत आहे. एका बाजूला प्रगती होत आहे ही चांगली बाब आहे. परंतु हे करतांना निसर्ग संपत्तीचे जतन करणेही तेवढेच महत्त्वाचे आहे. परंतु ठरलेल्या नियम व अटी प्रमाणे कुठेही वृक्ष लागवडीसाठी प्रयत्न केले जात नाहीत असे दिसून येते.
[पशुधनाची अवैध कत्तल]
३) अजून एक महत्वाची बाब म्हणजे जळगाव जिल्ह्यामध्ये पशुधन झपाट्याने कमी होत असतांना दिसून येत आहे. यामागील कारण म्हणजे पशुधन पालकांमध्ये निराशा पसरली असून पैकी काही शेतकरी यांत्रिकी शेती व रासायनिक व कृत्रिम खतांचा वापर करत असल्याने करत असतांना त्यांना बैल व इतर गुराढोरांची तसेच शेणखताची गरज भासत नाही. तर दुसरीकडे ढेप, कांडी व ईतर पशुखाद्याच्या किंमती गगनाला भिडल्या असून दुसरीकडे दुधाला योग्य भाव मिळत नसल्याने गायी,म्हशी पाळणे परवडणारे नसल्याने गायी,म्हशींची संख्या झपाट्याने कमी होत आहे.
याचा फायदा घेत काही व्यापारी व दलाल जातिवंत जनावरे मातीमोल भावात विकत घेऊन कत्तलखान्यात रवानगी करत आहेत. तसेच जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात गुरांची चोरी होत असून या गुरांचीही चोरट्या मार्गाने कत्तलखान्याकडे रावांनी केली जात आहे. या कारणास्तव पशुधन झपाट्याने कमी होत असल्याचे दिसून येते. भविष्यात भावी पिढीला गाय, म्हैस, बैल यांची ओळख चित्रातून करून द्यावी लागेल असा प्रसंग समोर दिसत आहे. म्हणून जिल्ह्यातील अधिकृत व अनधिकृत कत्तलखाने त्वरित बंद करून चोरट्या मार्गाने वाहतूक करणाऱ्या व्यावसायिकांवर व पशुधन आत्या करणारावर कडक कारवाई होऊन हा प्रकार थांबण्या यावा अशी मागणी जोर धरत आहे.
{हे तिघेही दोन नंबरचे व्यवसाय करतांना व्यवसायिक छायाचित्रात दिसत असलेल्या ट्रकच्या साह्याने ताडपत्रीने बंद स्थितीत तांदूळ लाकूड व गुराढोरांची तस्करी करतांना दिसून येतात म्हणून अश्या ताडपत्रीने बंद असलेल्या वाहनांची सखोल चौकशी करून कारवाई करणे गरजेचे आहे.}