पाचोरा ते वरखेडी दरम्यान आर्वे फाट्याजवळ लाकडाचा भरलेला ट्रक पलटला.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२४/०७/२०२२
पाचोरा, जामनेर रस्त्यावर वरखेडी ते पाचोरा दरम्यान आर्वे फाट्यावर एक लाकडाने भरलेला ट्रक दिनांक २३ जूलै शनिवार ते २४ जूलै रविवार रोजी रात्री पलटी झाल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की पाचोरा, जामनेर व सोयगाव तालुक्यात उन्हाळ्यात यावर्षी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाली आहे. या वृक्षतोडीबाबत वृक्षप्रेमी निसर्गप्रेमी व प्रसारमाध्यमांनी वारंवार अर्जफाटे व तक्रारी करुनही वृक्षतोड थांबण्याची महसूल विभाग व वनविभागाने कोणतीही तसदी घेतली नाही. उलट वृक्षतोड थांबवण्यासाठी होणारा विरोध दर्शवत संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांनी लाकुड व्यापाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात हप्ते घेऊन या विरप्पनच्या पिल्लावळीला पाठबळ दिले आहे.
म्हणून लाकुड व्यापाऱ्यांनी पाचोरा, जामनेर व सोयगाव तालुक्यात धुमाकूळ घालत अवैधरित्या वृक्षतोड करुन जंगलात व अडचणीच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लाकुड साठा करुन ठेवला आहे. आता या अवैध वृक्षतोडीच्या लाकडाची विल्हेवाट लावण्यासाठी हे लाकुड सोन्याच्या भावात विक्री करुन लाखो रुपये कमावण्यासाठी लाकडाची ट्रक मधून ताडपत्री लावून रात्रीच्यावेळी चोरटी वाहतूक करत आहेत. ही लाकडाची वाहतूक करतांना आपले वाहन पकडले जाऊ नये म्हणून कमी वेळात जास्त अंतर कापण्यासाठी हे लाकडाने भरलेले वाहन भरधाव वेगाने पळवत असतात अशाच ट्रक पळवण्याच्या नादात ट्रक क्रमांक एम. एच. २८ ए. बी. ९९९१ हा ट्रक पलटी झाल्याचे सांगितले जात आहे.
या अपघातग्रस्त ट्रक मधून ताडपत्री ने झाकुन लाकुड वाहतूक करतांना आढळून आले असून हे लाकुड अवैध वृक्षतोड करुन नेत असल्याचे जाणवते कारण या ट्रकमधील लाकडावर वनविभागाचा कोणताही परवाना नंबर किंवा मार्क केले नसल्याचे दिसून येत असून या लाकडाचा रितसर पंचनामा करुन मुद्देमालासह ट्रक जप्त करण्यात यावा अशी मागणी जोर धरत आहे.
इकडे ट्रक पलटी तर दुसरीकडे मागील तारखेची परवानगी व अधिकृत लाकुड वाहतूकीचा परवाना मिळवण्यासाठी लाकुड व्यापारी धडपड करत असून या लाकुड व्यापाऱ्यांवर राजाश्रय असल्याकारणाने मुंबई पर्यंत भ्रमणध्वनीवर संपर्क सुरु असून दबाव आणून वनविभागाकडून परवानगी मिळवण्यासाठी धडपड सुरु असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
विशेष म्हणजे प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी या अपघातस्थळी जाऊन छायाचित्र काढत असतांंना आम्ही वनविभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना हप्ते देतो आमचे काहीच होणार नाही असे संबंधित लाकुड व्यापऱी खुलेआम शब्दात बोलत असल्याने वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी किती भ्रष्ट आहेत हे लक्षात येते तरी पोलीस व वनविभागाचे कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांनी या अपघातग्रस्त ट्रक चा पंचनामा करून रितसर कडक कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.