पाचोरा, जामनेर वनविभागात कुंपणच शेत खातय, लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार साहेब लक्ष देतील का ?
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०२/०६/२०२२
(वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी यांचा भ्रमणध्वनी अहवाल काढल्यावर त्यांचे लाकुड व्यापाऱ्यांशी असलेले हितसंबंध उघड होतील यात तिळमात्र शंका नाही. परंतु गरज आहे ती इच्छाशक्तीची.)
पाचोरा व जामनेर तालुक्यात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली जात आहे. या वृक्षतोडीत दररोज शेकडो हिरव्यागार महाकाय वृक्षांची स्वयंचलीत मशनरीच्या साह्याने काही मिनिटांतच दिवसाढवळ्या कत्तल केली जात असून यात वड, निंब, आंबा व इतर झाडे कापली जात आहेत. या वृक्षतोडीकडे वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी जाणुन, बुजुन दुर्लक्ष करत असल्याचे निसर्गप्रेमी ठामपणे सांगतात कारण जामनेर व पाचोरा तालुक्यातील गावागावांतील शेत शिवारात तसेच राखीव जंगलात मागील तीन महिन्यांपासून स्वयंचलित मशनरीच्या साह्याने दिवसाढवळ्या झाडांची कत्तल सुरु आहे. ही होणारी कत्तल पाहून निसर्गप्रेमी व वृक्षप्रेमींनी पाचोरा वनविभागाचे मुलाने साहेब व इतर कर्मच्याऱ्यांना वारंवार फोन करुन वृक्षतोड थांबवून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे व दररोज अनेक सुज्ञ नागरिक व निसर्गप्रेमी मागणी करत आहेत. मात्र संबंधित अधिकाऱ्यांना या वीरप्पनच्या पिल्लावळीकडून कडून मोठ्या प्रमाणात हप्त्याच्या रुपाने हजारो रुपये मिळत असल्याने संबंधित अधिकारी कारवाई करण्यासाठी धजावत नाहीत असा आरोप जनतेतून केला जात आहे.
पाचोरा वनविभागाचे हद्दीत शिंदाड, पिंपळगाव हरेश्र्वर, वरसाडे तांडा व इतर गाव परिसरातील शेत शिवारात व नद्या, नाल्यांच्या थडीवरील म्हणजे (तहसील हद्दीतील) हिरव्यागार वृक्षांची कत्तल मोठ्या प्रमाणात होत आहे. (विशेष म्हणजे पिंपळगाव हरेश्र्वर येथील रहिवासी व जामनेर वनविभागात महत्वाच्या पदावर कामावर असलेल्या एका वनविभागाच्या कर्मचाऱ्यांची शेत जमीन पिंपळगाव हरेश्र्वर येथुन जवळच असलेल्या कोल्हे शिवारात व बाफणा कृषी विद्यालयाच्या जवळच असून या शेतजमिनीवरील तसेच नाल्यांच्या बांधावरील जवळपास ३० हिरव्यागार वृक्षांची कोणतीही रितसर परवानगी न घेता दिवसाढवळ्या कत्तल होत आहे.
म्हणून पाचोरा व जामनेर वनविभागातील अधिकाऱ्यांना आपण शासनाचा पगार घेत आहोत याची थोडीतरी जान असेल तर त्यांनी आमच्यासोबत यावे आम्ही पाचोरा तालुक्यातील गावागावांतील शेत शिवारात झालेली भरमसाठ वृक्षतोड दाखवतो आज ज्या, ज्या भागात वृक्षतोड झालेली आहे त्यापैकी बऱ्याचशा प्रमाणात लाकुड गायब झाले आहे मात्र पुरावा म्हणून आजही या महाकाय वृक्षांची खोड (बुंधा) जसेच्या तसे आहेत. ते पाहून रितसर पंचनामा करुन कारवाई केली तर अश्या अधिकाऱ्यांचा सत्यजित न्यूज नक्कीच तालुकास्तरावर कार्यक्रम आयोजित करुन जाहीर सत्कार करेल असे खुले आव्हान आम्ही सत्यजितच्या माध्यमातून जाहीर करत आहोत.
वृक्षतोड थांबवणे काळजी गरज~
एका बाजूला दररोज हजारो एकर शेतजमीनीचे बिगरशेतीत रुपांतर होत असून या सुपिक जमिनीवरील हिरवीगार वनराई, झाडं, झुडप नष्ट होऊन त्याजागी सिमेंटची जंगल उभारली जात आहेत. तसेच दररोज नवनवीन कारखाने उभारले जात असून यातून मोठ्या प्रमाणात प्रदुषण निर्माण होत आहे. तसेच दररोज हजारो नव्हे तर लाखो स्वयंचलित वाहनांची भर पडत असून ही वाहने दररोज कार्बनडाय ऑक्साइड ओकत आहेत. हवेतील ऑक्सिजन चे प्रमाण झपाट्याने कमी होत असून ओझोन वायूचा स्तर घटत आहे. या दुष्परिणामुळे व प्रदूषणामुळे उन्हाळा, पावसाळा, हिवाळा या तिघही ऋतूमध्ये कमालीचा बदल झाला आहे. अशा बऱ्याचशा घातक बाबींचा विचार केला तर निसर्ग संपदा वाचवणं महत्वाचे आहे.
परंतु दिल्ली ते गल्लीतील लोकप्रतिनिधी वातानुकुलीत बंगल्यात व वातानुकुलीत गाडीत फिरत असल्यामुळे त्यांना या वृक्षतोडीचे काही एक देणेघेणे नसल्याने ते या होणाऱ्या वृक्षतोडीकडे व ही वृक्षतोड थांबवी म्हणून कोणतेही प्रयत्न करत नसून संबंधित विभागातील अधिकाऱ्यांची कानउघडणी करत नसल्याने हे अधिकारी व कर्मचारी मस्तावले आहेत. म्हणून वनविभागाचे अधिकारी सर्वसामान्य जनतेतून वृक्षतोडीबद्दल वारंवार आवाज उठवून सुध्दा लक्ष देत नसल्याचे जाणवते आहे.
संत तुकाराम महाराजांनी म्हटले आहे, ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे’ इंदिरा संत म्हणतात, ‘जरी वेधिले चार भिंतींनी, या वृक्षांची मजला सांगत. ’सामान्य माणूसही नेहमीच्या दगदगीपासून दूर जाण्यासाठी, हवापालटासाठी थंड हवेच्या ठिकाणी निसर्गाच्या सान्निध्यातच जातो. कितीही करोडपती माणूस असला त्याची लोखो रुपयांची किंमती चारचाकी उन्हाळ्यात झाडाखालीच लावतो हे पाहिल्यावर त्यांच्या श्रीमंतीची चिड येते.
अशा या उपकारकर्त्या वृक्षांचा आज ऱ्हास होत आहे. मानवाने बेसुमार जंगलतोड करून वैराण वाळवंटे निर्माण केली आहेत. ‘After man the desert’ ‘मानवाचे पाऊल नि वाळवंटाची चाहुल’ अशी म्हण आहे. जळणासाठी आणि घरे बांधण्यासाठी बेसुमार वृक्षतोड केली गेली. त्यामुळे उष्णता वाढली. पावसाचे प्रमाण कमी झाले जमिनीची धूप होऊन ती नापीक झाली. दुष्काळाचे प्रमाण वाढले. परिणामी हवेच्या प्रदूषणासारख्या समस्यांना मानवाला तोंड द्यावे लागत आहे.
आपल्या पूर्वजांनी मानवी जीवनात वृक्षांना महत्त्व दिले होते . तुळस, वड, पिंपळ यांची पूजा ते करत असत. त्यांनी तुळस, बेल, दुर्वा, धोतरा या आणि अन्य वनस्पतींना देवतांच्या पूजेत स्थान दिले होते. वने ही राष्ट्रीय संपत्ती आहे ते खनिज संपत्तीप्रमाणे ओहोटीस लागणारे धन नाही. म्हणूनच सरकारने वनमहोत्सव हा राष्ट्रीय सण मानलेला आहे. सामाजिक वनीकरणाच्या मोहिमेखाली वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन व वृक्षसंरक्षणासाठी कसोशीने प्रयत्न होत आहेत.
आज पृथ्वीची अवस्था वृक्षतोडीमुळे दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. पृथ्वीवरील वातावरणाचा तोल ढळत आहे. झाडे जंगले कमी झाली. ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाले. काही शतकांपूर्वी पृथ्वीचा सुमारे ६० % भाग वनांनी व्यापलेला होता, सध्या पृथ्वीचा केवळ २१ % भागातच वने आहेत. निसर्गाच्या साखळीत इतकी गुंतागुंतीची चक्रे आहेत, की माणसाला ती चक्रे निर्माण करणे तर सोडाच, पण ती चक्रे मोडली तर दुरूस्त करणेही जमण्यासारखे नाही. म्हणून प्रचंड प्रमाणात वाढलेल्या वृक्षतोडीमुळे एक दिवस ही पृथ्वी रसातळाला जाईल अशी भीती निर्माण झाली आहे. आज जंगलतोडीचे दुष्परिणाम निर्माण झाले आहेत. बेसुमार जंगलतोडीमुळे प्राणीही बेघर झाले आहेत आणि ते मानवी वस्त्यांमध्ये आसरा शोधात आहेत. त्यामुळे आज अनेक ठिकाणी मानवी वस्त्यांत बिबट्या घुसल्याच्या घटना नेहमीच घडत आहेत. गतवर्षी केदारनाथला झालेली भयावह परिस्थिती जंगलतोडीचे परिणाम असल्याचे तज्ज्ञ सांगतात.
या सर्व गोष्टींचा विचार करून पर्यावरणाच्या संरक्षणासाठी आणि सर्व लोकांना जंगलाचे महत्त्व समजावे म्हणून सत्यजित न्यूज वारंवार आवाज उठवत आहे. या मागील आमचा एकच उद्देश आहे व तो म्हणजे जंगलतोड रोखणे, जंगलतोडीमुळे मानवी व पर्यावरणावर होणारा परिणाम या समस्यांपासून सुटका कशी करावी ? हे सांगण्याचा प्रयत्न करुन जेणेकरून जनमानसातून जनजागृती होऊन जंगलतोड रोखली जाईल.