विद्युत वितरण कंपनीच्या निविदा प्रक्रियेत घोळ ? पाचोरा अधीक्षक अभियंता संशयाच्या भोवऱ्यात; आंदोलनाचा इशारा.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०१/०६/२०२२
पाचोरा तालुक्यात विद्युत वितरण कंपनीमध्ये सावळा गोंधळ सुरु असुन गावागावांतील लाईनमन, विद्युत सहाय्यक, हेल्पर यांच्या पैकी काही मस्तावलेले व काही अधिकाऱ्यांच्या मर्जीतील कर्मचारी विद्युत वितरण कंपनी आपल्या बापाचीच असल्याचे समजून वागत आहेत. यात बरेचसे कर्मचारी मुख्यालयात रहात नसून हे दांडी बहाद्दर कर्मचारी कधीतरी पौर्णिमेच्या चंद्रासारखे उगवतात या कारणांमुळे विद्युत ग्राहकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
तसेच ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात विद्युत चोरी सुरु असून याबाबत वारंवार अर्जफाटे व तक्रार करुनही कोणतीही कारवाई होत तर नाहीच उलट तक्रार करणारांची नावे उघड करुन गावात वाद लावण्यासाठी हे कर्मचारी प्रयत्नशील असतात. तसेच बरेचसे कर्मचारी विद्युत चोरी करणारा कडून हप्ते वसुली करतात असीही माहिती समोर येते आहे.
अंबे वडगाव येथील विद्युत सहाय्यक अविनाश राठोड हा मागील चार वर्षांपासून एकाच ठिकाणी कामावर आहे. याची याच गावात विद्युत सहाय्यक पदावरुन लाईनमन पदावर बढती झाली आहे. मात्र हे महाशय अंबे वडगाव येथे कामावर रुजू झाल्यापासून आजपर्यंत कधीच नियमितपणे मुख्यालयात येत नाहीत. याच्या बाबतीत ग्रामपंचायतीने व ग्रामस्थांनी वारंवार तक्रारी करुनही या कर्मचाऱ्याची बदली झाली नाही किंवा त्याला नियमितपणे मुख्यालयात येण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सक्ती केली नाही. यामागील एकमेव कारण म्हणजे पाचोरा कार्यालयात एका उच्च पदावर कुणीतरी राठोड साहेब आहेत म्हणून हे महाशय मनमानी करतात असे खात्रीलायक वृत्त आहे. आता अजून निविदा प्रक्रियेत गैरप्रकार झाला असल्याचा नवीनच लफडा समोर आला असून रिपब्लिकन पार्टी तर्फे लवकरच आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या जळगाव परिमंडळातील पाचोरा विभागात व्यावसायिक व औद्योगिक मीटर (पी सी झिरो) रिडींग निविदा प्रक्रियेत गैरप्रकार झाला असल्याची तक्रार समोर आली असून कंपनीचे नियम डावलून मर्जीतील ठेकेदारांना लाभ पोहचवण्यासाठी येथील कार्यकारी अभियंत्यांनी प्रताप केल्याची तक्रार पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे महानगर जिल्हाध्यक्ष कल्पेश मोरे यांनी केली असून आंदोलनाचा इशारा दिला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, महावितरणच्या जळगाव परिमंडळात सात विभागीय कार्यालये असुन या पैकी सहा विभागांनी वृत्तपत्रात जाहिरात देऊन निविदा प्रक्रिया पूर्ण केली मात्र पाचोरा विभागाने मात्र वृत्तपत्रात जाहिरात प्रसिद्ध न करता निविदा काढली आहे.निविदा रक्कम कमी असेल तर विभागीय अभियंता यांची परवानगी अनिवार्य आहे मात्र नियमांना फाटा देत परस्पर झालेली निविदा प्रक्रिया संशयाच्या भोवऱ्यात आली आहे. त्यामुळे पाचोरा उपविभागाने योग्य निविदा प्रक्रिया राबवावी अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा कल्पेश मोरे यांनी पत्रकान्वये दिला आहे. निवेदनाच्या प्रति पाचोरा भडगाव मतदार संघाचे आमदार किशोर अप्पा पाटील यांना दिली असून त्यांनी यासंदर्भात दखल घेत संबंधितांना जाब विचारला असल्याची माहिती समोर आली आहे.