महसूल खात्याशी दिलजमाई असल्याने वाळू माफिया मस्तावले, म्हणून पोलीस अधिकारी कारवाईसाठी पुढे सरसावले.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१८/०६/२०२३
सद्यस्थितीत पाचोरा तालुक्यासह जळगाव जिल्हात वाळू माफिया व गौण खनिज माफीयांनी उच्छाद मांडला असून नद्यांच्या पात्रातून कधी दिवसाढवळ्या तर कधी रात्रीच्या वेळी चोरुन, लपून ट्रॅक्टर व डंपरच्या साह्याने मोठ्या प्रमाणात वाळूची अवैध वाहतूक करत आहेत. तसेच जळगाव जिल्ह्यात व पाचोरा तालुक्यातील गावागावातून मुरुम, खडी, दगड व मातीची विनापरवानगी हजारो ब्रास उचल करुन लाखो रुपये किंमतीच्या गौण खनिजाची चोरी करत असल्याने शासनाचा मोठ्या प्रमाणात महसूल बुडत असल्याचे दिसून येत आहे.
विशेष म्हणजे मुरुम, दगड व मातीचा उचल करतांना गावठाण जमीन, गायरान जमीन, इनामी जमीन, शासनाचे राखीव भुखंड व वनविभागाच्या राखीव जंगलातील वनराई नष्ट करत गौण खनिज वाहून नेले जात असल्याने गावाच्या मालकीची गावठाण जमीन खोदली जात असल्याने भविष्यात गाव विस्तारासाठी किंवा सरकारी दवाखाना, व्यायामशाळा व इतर वास्तू उभारण्यासाठी अडचणी निर्माण होणार आहेत.
तसेच या गौण खनिज माफीयांनी राजाश्रय मिळवून घेण्यासाठी कोणत्या ना कोणत्या पक्षाचा झेंडा हाती घेत आपल्या डोक्यावर एकप्रकारे सुरक्षा कवच निर्माण करुन घेतल्याचे निदर्शनास येत आहे. (यात तथ्यही आहे म्हणून या गौण खनिज माफियांची मुजोर वाढली असून महसूल विभागातील व पोलीस विभागातील इमानेइतबारे काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अंगावर धाऊन जाणे, धक्काबुक्की करणे, त्यांच्या अंगावर वाहन घालुन चिरडण्याचा प्रयत्न करत एकप्रकारे दहशत निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न करणे, तुमची बदली करावी लागेल अशी धमकी देणे असे प्रकार जिल्हाभरात घडले आहेत व या पुढेही घडतील अशी भिती असल्याने इमानेइतबारे काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जे होत आहे त्याबद्दल बोलायचे नाही, बघायचे नाही व ऐकावयाचे नाही अशा पद्धतीने गांधीजींच्या तीन तीन माकडासारखी भूमिका घेतली असल्याचे चित्र दिसून येत आहे.)
तरीही पाचोरा तालुक्यातील अवैध वाळू माफियांची मुजोर व वाळू चोरी थांबण्यासाठी पाचोरा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक मा. श्री. राहुलजी खताळ यांनी पाचोरा तालुक्यात विविध ठिकाणी अवैधरित्या वाळूची चोरटी वाहतूक थांबवण्यासाठी कारवाईचा बडगा उगारला आहे. पाचोरा, भडगाव तालुक्यातील गिरणा नदीच्या पात्रातून रात्रीच्या वेळी अवैधरित्या वाळूची चोरटी उचल करुन मोठ्याप्रमाणात वाहतूक केली जात असून या सोबतच वाळूची चोरटी वाहतूक करतांना आपण कुण्याही अधिकाऱ्यांना सापडायला नको म्हणून भरधाव वेगाने ट्रॅक्टर व डंपर पळवले जातात व यातून एखाद्यावेळेस मोठा अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याची गुप्त माहिती पाचोरा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक मा. श्री. राहुलजी खताळ यांना मिळाली होती.
याची दखल घेत मा. श्री. राहुलजी खताळ यांनी पोलिस उपनिरीक्षक योगेश गणगे, पोलिस काॅन्स्टेबल योगेश पाटील, विनोद बेलदार, नरेंद्र नरवाडे, अशोक पाटील यांचे पथक नेमुन पुढील कारवाईचे आदेश दिले असता, पथकाने सापळा रचत खेडगाव (नंदीचे) गावानजिक वाळूने भरलेल्या एका ट्रॅक्टरचा पाठलाग केला असता सदर ट्रॅक्टर चालकाने पोलीसांना पाहून घटनास्थळावरुन पलायन केले. घटनास्थळावरुन पथकाने २ लाख रुपये किंमतीचे विनानंबर ट्रॅक्टर, ट्राॅली व ट्राॅलीत १ हजार ५०० रुपये किंमतीची एक ब्रास वाळू जप्त केली.
तसेच हडसन गावानजिक २ लाख ५० हजार रुपये किंमतीचे ट्रॅक्टर, ट्राॅली व ट्राॅलीत १ हजार ५०० रुपये किंमतीची एक ब्रास वाळू, पुनगाव ते पाचोरा रस्त्यावरील बुऱ्हाणी इंग्लिश मिडीयम स्कूलजवळ ३ लाख रुपये किंमतीचे ट्रॅक्टर, ट्राॅली व ट्राॅलीत १ हजार ५०० रुपये किंमतीची एक ब्रास वाळू व जारगाव चौफुली जवळ ३ लाख २५ हजार रुपये किंमतीचे ट्रॅक्टर, ट्राॅली व ट्राॅलीत १ हजार ५०० रुपये किंमतीची एक ब्रास वाळू जप्त करण्यात आली आहे.
वरील चारही ठिकाणाहुन ट्रॅक्टर चालक हे पसार झाले असुन चार अज्ञात ट्रॅक्टर चालकांविरूद्ध पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला असुन वरील चारही घटनांचा पुढील तपास पोलिस निरीक्षक मा. श्री. राहुलजी खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली खेडगाव (नंदीचे) येथील तपास पोलिस काॅन्स्टेबल विकास खैरे, हडसन येथील तपास पोलिस काॅन्स्टेबल मुकुंद परदेशी, पुनगाव ते पाचोरा रस्त्यावरील तपास पोलिस काॅन्स्टेबल दिलीप वाघमोडे तर जारगाव चौफुली येथील तपास पोलिस काॅन्स्टेबल सचिन निकम हे करीत आहे.
तालुक्यातील विविध ठिकाणी अवैधरित्या चोरटी वाळुची वाहतूक करणारे चार ट्रॅक्टर (ट्राॅलीसह) जप्त करत चारही अज्ञात ट्रॅक्टर चालकांविरूद्ध पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आल्याने चोरटी वाळुची वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून सर्वसामान्य नागरिकांनी या कारवाईबाबत समाधान व्यक्त केले असले तरी मात्र महसूल विभागाचे काम पोलीसांना करावे लागले असा ठपका ठेवून (महसूल खात्याशी दिलजमाई असल्याने वाळू माफिया मस्तावले, म्हणून पोलीस अधिकारी कारवाईसाठी पुढे सरसावले) असे मत व्यक्त केले आहे.