पिंपळगाव हरेश्र्वर येथील भुमापन कार्यालयाचा वाली कोण ?
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२६/०५/२०२२
पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्र्वर येथे भुमापन कार्यालय असून या कार्यालयावर कळमसरा, कुऱ्हाड, वरखेडी, शिंदाड, डोंगरी सातगाव, अंबे वडगाव व पिंपळगाव हरेश्र्वर या सात गावांचा समावेश आहे. तसेच या कार्यालयात मंगळवार व शुक्रवार असे दोन दिवस कामकाजासाठी दिलेले आहेत. परंतु जवळपास मागील पाच वर्षांपासून या कार्यालयात ठरवून दिलेल्या दिवशी म्हणजे मंगळवार व शुक्रवार रोजी या कार्यालयात नेमण्यात आलेले अधिकारी, कर्मचारी येत नसल्याने वरील सातही गावातील ग्रामस्थ हैराण झाले आहेत.
कारण वरील गावांपैकी कळमसरा, शिंदाड, डोंगरी सातगाव, वरखेडी व पिंपळगाव हरेश्र्वर ही गावे मोठ्या लोकसंख्येची गावे असून या सात गावांपैकी काही गावांचा सिटी सर्वे झाला असून या गावातील ग्रामस्थांना जीवनावश्यक कामकाजासाठी तसेच विविध कामांसाठी कागदपत्रांची गरज भासत असते. परंतु या कार्यालयात नेमणूक करण्यात आलेले अधिकारी, कर्मचारी मंगळवार व शुक्रवार रोजी येत नसल्यामुळे खेड्यापाड्यातून आलेले गरजु ग्रामस्थ कार्यालयाला कुलूप पाहून हतबल होऊन पश्चात्ताप करत परत निघतात.
यामागील कारणही तसेच आहे. कारण वरील सातही गावे ही ग्रामीण भागातील असून या गावात गोरगरीब, शेतकरी व मजूर वर्ग मोठ्या प्रमाणात असून काही कामानिमित्त कागदपत्रांची गरज असल्यास रोजंदारी बुडवून तसेच हातचे काम सोडून प्रवासखर्च करत पिंपळगाव हरेश्र्वर येथील भुमापन कार्यालयात यावे लागते व कार्यालयाजवळ आल्यानंतर कुलुपबंद कार्यालय पाहून माघारी फिरावे लागत असल्याने व कागदपत्र वेळेवर मिळत नसल्याने आर्थिक झळ सहन करत संबंधित गरजूंना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
हिच अडचण लक्षात घेऊन पिंपळगाव हरेश्र्वर येथील सामाजिक कार्यकर्ते मा. श्री. शालिग्राम मालकर व मा. श्री. विजय काळे यांनी सत्यजित न्यूज कडे कैफियत मांडली व या कार्यालयात मंगळवार व शुक्रवारी नियमितपणे अधिकारी, कर्मचारी हजर पाहिजे तसेच आठवड्यात तीन दिवस हे कार्यालय उघडले पाहिजे अशी मागणी केली आहे. तसेच या कार्यालयाच्या कामकाजात सुधारणा न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
नवीन नियुक्त अधिकारी (कर्मचारी) खरे यांचा खुलासा~
याबाबत या कार्यालयात नव्यानेच नियुक्त करण्यात आलेले अधिकारी मा. श्री. खरे यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून विचारले असता त्यांनी सांगितले की माझी नुकतीच नियुक्ती करण्यात आली असून मी प्रत्येक मंगळवार व शुक्रवारी नियमितपणे हजर राहाणार असून गरजूंना लवकरात, लवकर कागदपत्रांची पूर्तता कशी करता येईल यासाठी प्रयत्नशील राहिल व जास्तीत, जास्त लोकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी मी बांधील आहे असे सांगितले.