विद्युत वितरण कंपनीकडून अंबे वडगाव ग्रामपंचायतीचा विद्युत पुरवठा खंडित गाव अंधारात.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२६/०५/२०२२
आंबे वडगाव ग्रामपंचायतीने विद्युत वितरण कंपनीचे विद्युत बिल वेळोवेळी भरले नसल्याने मागील बऱ्याच वर्षांपासून सतत थकबाकीची रक्कम दिवसेंदिवस वाढतच आहे. तसेच वारंवार सुचना देऊन सुद्धा ग्रामपंचायत कानाडोळा करत असल्याकारणाने सरतेशेवटी विद्युत वितरण कंपनीने आज दिनांक २६ मे २०२२ शुक्रवार रोजी थकीत बिलापोटी पुरवठा खंडित केल्यामुळे गावातील पथदिवे बंद झाले असून गावात अंधार दाटला आहे.
विशेष म्हणजे मागील काळात स्वर्गीय तात्यासाहेब दिनकरराव पाटील हे सरपंच असतांना मोजकीच थकबाकी होती. नंतरच्या काळात मा. श्री. मच्छिंद्र थोरात व सौ. शांताबाई थोरात यांच्या कार्यकाळात वीज बिल हे काही प्रमाणात का होईना भरले गेले होते. नंतर मात्र प्रत्येक पंचवार्षिक निवडणुकीत सत्तांतर होत गेले व संत्तातराच्या खेळात वेळोवेळी सत्तेवर आलेल्या पदाधिकाऱ्यांनी थोड्याफार प्रमाणात गावात विविध योजना आणून त्या राबवल्या तसेच याच काळात ग्रामस्थांकडून घरपट्टी, पाणीपट्टी, दिवाबत्ती कर असे कर वसुली केली मात्र या पैकी दिवाबत्ती कर व पाणीपट्टी कर वेगळा ठेऊन पाणीपुरवठा योजनेचे विद्युत बिल व दिवाबत्ती कर भरणे क्रमप्राप्त होते परंतु या बाबींकडे कमालीचे दुर्लक्ष झाले म्हणून विद्युत वितरण कंपनीची थकबाकी वाढतच गेल्याने आज रोजी सरतेशेवटी बिलांच्या वसुलीसाठी विद्युत वितरण कंपनीने विद्युत पुरवठा खंडित केल्यामुळे अख्खा गाव अंधारात आहे.
मांजराच्या गळ्यात घंटा बांधणार कोण~
तसेच गावातील रहिवासी नियमितपणे घरपट्टी, पाणीपट्टी, दिवाबत्ती व इतर कर भरत नसल्याने ग्रामपंचायतीची लोखो रुपये थकबाकी घेणे आहे. याकरिता सक्तीची वसुली करणे गरजेचे आहे. मागील काही महिन्यांपूर्वी ग्रामपंचायतीने ध्वनिक्षेपकाव्दारे जाहीर निवेदन (दवंडी) देऊन आपापल्या कडे असलेली ग्रामपंचायतीची थकबाकी भरावी असे आवाहन केले होते मात्र या विषयाकडे कुणीही लक्ष न देता ठरावीक समजदार नागरिकांनी ग्रामपंचायतीचा कर भरला मात्र जवळपास ८० टक्के लोकांनी या सुचनेकडे दुर्लक्ष केले आहे.
अंबे वडगाव ग्रामपंचायत कर वसुलीसाठी, थकबाकीदारांच्या घरासमोर वाजवणार डंका.
म्हणून ग्रामपंचायतीने कायदेशीर बाबींची पूर्तता करुन सक्तीची करवसुली करणे गरजेचे आहे. मात्र ही सक्तीची वसुली करण्यासाठी गरज आहे ती इच्छाशक्तीची व ग्रामपंचायतीचे सरपंच, सदस्यांच्या एकतेची मात्र असे करण्यासाठी जवळपास मागील पंधरा वर्षांपासून अशी सक्तीची वसुली करण्यात आलेली नाही. कारण ही सक्तीची वसुली करतांना थकबाकी वसुली करण्यासाठी आलेल्या ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक व कर्मचाऱ्यांशी थकबाकीदार हुज्जत घालून वादावादी करतात या विषयाला घाबरून सत्ताधारी अश्या सक्तीच्या वसुलीसाठी तयार होत नाहीत कारण गावातील हितसंबंध जपण्यासाठी जो तो अंग राखुन पाच वर्ष सयाजीराव प्रमाणे सत्ता भोगून आपापला कार्यकाळ पूर्ण करुन घेतात.
ही परिस्थिती बदलण्यासाठी सक्तीची वसुली करणे गरजेचे आहे. कारण काही थकबाकीदार लोकांच्या वागणुकीचा फटका नियमितपणे कर भरणारांना सहन करावा लागतो व विविध योजनांपासून वंचित रहावे लागत आहे.